समस्यांच्या डोंगरासमोर विकासाचे आव्हान

समस्यांच्या डोंगरासमोर विकासाचे आव्हान

जिल्ह्यातील पाच नगरपालिकांतील नवनिर्वाचित नगराध्यक्षांसमोर मूलभूत प्रश्‍न सोडवण्याची जबाबदारी

जिल्ह्यातील पाच नगरपालिकांमध्ये प्रथमच थेट नगराध्यक्ष निवडून आले आहेत. यामध्ये इस्लामपूर वगळता सर्व ठिकाणी नगराध्यक्षांचीच सत्ता आहे. इस्लामपुरात काठावर सत्ताधारी आणि विरोधक आहेत. नगराध्यक्षांना प्रथमच स्वतंत्र काम करण्याची संधी मिळाली असली तरी शहरांच्या मूलभूत प्रश्‍नांकडे त्यांना जबाबदारीने लक्ष द्यावे लागेल. कारण ते आता नगरसेवकांना नव्हे तर थेट जनतेला जबाबदार आहेत याचे भान ठेवावे लागेल. त्यामुळे जनतेच्या समस्या केंद्रस्थानी ठेवून काम करावे लागेल.

नागरिक, घटक पक्षांच्या अपेक्षापूर्तीचे आव्हान

इस्लामपूर - सुविधा पुरवण्यात गतवेळचे सत्ताधारी अपयशी ठरल्यामुळे त्यांची ३१ वर्षांची सत्ता उलथवून टाकत विकास आघाडीला नागरिकांनी सत्ता दिली. पूर्वी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीमध्ये सत्तेची सूत्रे विजयभाऊ पाटील व मंत्री जयंत पाटील यांच्या आदेशान्वये फिरत होती. मात्र आता सत्तेवर येणाऱ्या विकास आघाडीमध्ये शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजप, आरपीआय, काँग्रेस, महाडिक गट असे घटक पक्षांचे मिश्रण आहे. या सर्वांचे समाधान करत नागरिकांची अपेक्षापूर्ती करण्याची तारेवरची कसरत निशिकांत पाटील यांना करावी लागेल. निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांपेक्षा प्रत्यक्षात कृती करताना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत विकास आघाडीला काम करावे लागेल.

आव्हाने...
रस्ते, घरकुल, आरोग्य ठेक्‍यात मोठा भ्रष्टाचार
प्रलंबित भुयारी गटार योजना पूर्ण करणे
शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न निकाली काढणे
शहरातील आरोग्याचा प्रश्‍न गंभीर
कचराकुंडी, घंटागाड्यांची समस्या
 

नागरी सुविधा, विरोधकांचा सामना

आष्टा - अटीतटीच्या लढतीत थेट लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची माळ स्नेहा माळी यांच्या गळ्यात पडली. वयाच्या २८ व्या वर्षी ५५ हजार लोकसंख्येच्या शहराचे नगराध्यक्षपद भूषवणाऱ्या त्या राज्यातील सर्वात लहान वयाच्या थेट नगराध्यक्ष असाव्यात. सत्ताधाऱ्यांनी जनतेसमोर मांडलेले शहर विकासाचे व्हिजन पूर्ण करण्याबरोबरच गटांतर्गत कुरबुऱ्या, पहिल्यांदाच पालिकेत प्रवेश केलेल्या विरोधकांचा सामना, ठेकेदारांवर नियंत्रण, कर्मचारी भरती, विकासकामासाठी निधी खेचून आणण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. पहिल्यांदाच पालिकेत तीन बंडखोर, तीन विरोधक अशा सहा जणांचा प्रवेश झाला आहे. पालिकेच्या एकाधिकारशाहीत भ्रष्ट कारभारावर टीका केलेल्या विरोधकांना उत्तरे द्यावी लागतील.

आव्हाने...
घरकुल, भुयारी गटार योजना पूर्ण करणे आवश्‍यक
पालिकेत पहिल्यांदाच विरोधकांचा सामना होणार 
मनमानी ठेकेदारांवर नियंत्रण ठेवावे लागेल
पालिकेत अपुरा कर्मचारी वर्ग
रस्ते, पथदिवे, सांडपाण्याचा प्रश्‍न गंभीर
आष्टा शहर वाय-फाय सिटी करणे

पालिकेची प्रतिमा बदलावी लागेल
तासगाव - तासगाव पालिकेवर भाजपचा झेंडा फडकला. राज्यातील सत्तेचा उपयोग शहराच्या विकासासाठी होऊ शकतो, यावर तासगावकर मतदारांनी शिक्‍कामोर्तब केले. भाजपचे नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत निवडून आले. खासदार पाटील यांनी वर्षभरातील केलेल्या विकासकामांचा मुद्दा प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनविला होता. आगामी पाच वर्षांत तासगाव नगरपालिकेची प्रतिमा बदलण्याचे काम नव्या शिलेदारांना करावे लागेल. शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा दिलेला शब्द पाळण्याचे आव्हान नव्या नगराध्यक्षांना पेलावे लागणार आहे. नगरपालीकेची उत्पन्नाची साधने तोकडी आहेत, पालिकेला आर्थिक स्वयंपूर्ण बनविण्यासाठी शॉपिंग सेंटरसारखे उपक्रम राबविण्याची आवश्‍यकता आहे. 

आव्हाने...
पाणी पुरवठा ठप्पा क्र. ३ पूर्ण करणे 
शहरात योग्य दाबाने पाणी पुरवठा करणे 
सोमवार पेठ, सराफ पेठ रस्त्यांचे रुंदीकरण 
पालिकेची स्वतंत्र स्वच्छता यंत्रणा उभी करणे
रस्ते, पथदिवे, सांडपाण्याचा प्रश्‍न गंभीर
नाट्यगृह आणि बागबगीचे तयार करणे

स्वच्छ पाणी पुरवठ्याची जबाबदारी

पलूस - पलूस पालिकेची पहिली निवडणूक झाली. आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पालिकेवर पहिला झेंडा फडकवला आहे. आता खरी जबाबदारी आहे ती नगराध्यक्ष राजाराम सदामते व निवडून आलेले नगरसेवकांची. पलूसला मॉडेल शहर करण्याची जबाबदारी नवीन कारभारी कसे पेलतात, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

पलूस शहरात अनेक प्रश्‍न आहेत. सर्व प्रभागांत स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले आहे. खरोखरच पलूस व वाड्या-वस्त्यांवर पिण्याचे पाणी मिळत नाही. वर्षभरातून अनेक दिवस नळ पाणीपुरवठा योजनाच बंद असते. त्यामुळे स्वतंत्र नळपाणीपुरवठा योजना तयार करणे हे प्रमुख काम नूतन कारभाऱ्यांना करावेच लागणार आहे.

आव्हाने...
कुंडल पाणी योजना दुरुस्त करणे
शहरात योग्य दाबाने पाणी पुरवठा करणे 
पलूसमध्ये प्रमुख ठिकाणी स्वच्छतागृहे बांधणे,
आठवडा बाजार, शहरात स्वच्छता राखणे
रस्ते, पथदिवे, सांडपाण्याचा प्रश्‍न गंभीर
कारभार भ्रष्टाचारमुक्त करणे

विकासाचा आलेख चढता राहावा

विटा - विटा पालिकेवर काँग्रेसची एकहाती सत्ता आली असली तरी शहराच्या सर्वांगीण विकासाचा आलेख चढता ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. आजवर विटेकर जनतेने स्व. लोकनेते हणमंतराव पाटील, माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील आणि ॲड. वैभव पाटील यांच्याकडे नगराध्यक्षपदाची धुरा दिली आहे. 

नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत प्रतिभा पाटील यांच्यावर मोठा विश्‍वास दाखवून त्यांना नगराध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे जनतेच्या या विश्‍वासाला पात्र राहून सर्व सहकारी नगरसेवकांना बरोबर घेऊन कारभार करावा लागेल. विट्याच्या सर्वांगीण विकासाचा आलेख चढता ठेवण्याची, पारदर्शी आणि आणखी लोकाभिमुख पालिका कारभार जबाबदारी त्यांच्यावर आली आहे.

आव्हाने...
सुवर्णनगरी विट्याला ‘स्मार्ट सिटी’ करणे
शहर व उपनगरात मुबलक पाणी पुरवठा करणे
शहरात सर्वाधिक पार्किंगचा प्रश्‍न गंभीर 
महिलांसाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहे बांधणे
रस्ते, पथदिवे, सांडपाण्याचा प्रश्‍न सोडविणे 
नगरपालिकेचा कारभार पारदर्शी चालवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com