घरच्या पालकमंत्र्यांमुळे विकासाचा पाठपुरावा

घरच्या पालकमंत्र्यांमुळे विकासाचा पाठपुरावा

प्रश्‍न सुटण्याचा आशावाद - २० वर्षानंतर चंद्रकांतदादांच्या रुपाने स्थानिक नेतृत्व 

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्याला २० वर्षानंतर याच जिल्ह्यातील पालकमंत्री मिळाल्याने जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्‍नांचा चांगलाच पाठपुरावा होऊ लागला आहे. पंचगंगा प्रदूषणापासून ते शहरातील वाहतूक व्यवस्था, रखडलेले सिंचन प्रकल्प, विमानतळ हे प्रश्‍न वारंवार चर्चेत येऊ लागले आहेत. यातील प्रश्‍न सुटले कीती, यापेक्षा अशा प्रश्‍नांवर वारंवार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून सुरू असेलला पाठपुरावा आशावादी आहे. 
१९९५ ते १९९९ या युतीच्या पाच वर्षाच्या काळात विद्यमान पर्यावरण मंत्री रामदास कदम पालकमंत्री होते. ते मुळचे कोकणातील. त्यानंतर राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार आल्यानंतर पहिली सात वर्षे सांगलीचे तत्कालिन उद्योगमंत्री डॉ. पतंगराव कदम व त्यानंतरची आठ वर्षे पुण्याचे तत्कालिन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे पालकमंत्री राहीले. पण या तिन्हीही पालकमंत्र्यांनी प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिनाचे ध्वजवंदन व जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीशिवाय अपवादानेच जिल्ह्यात हजेरी लावली. 

जिल्ह्यातील पंचगंगा प्रदूषणापासून ते चित्रनगरीचे विस्तारीकरण, विमानतळ सुरू करणे, यासारखे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. ज्या-त्या वेळी या प्रश्‍नावर जरूर चर्चा झाली. बैठका झाल्या. पण त्यापुढे काही झाले नव्हते. त्याचे मुख्य कारण म्हणजे जिल्ह्याशी ‘ॲटॅचमेंट’ असलेल्या पालकमंत्र्यांचा अभाव हेच म्हणावे लागेल. 

काँग्रेस आघाडीच्या काळात माजी मंत्री जयवंतराव आवळे, प्रकाश आवाडे, कै. बाबासाहेब कुपेकर, कै. दिग्विजय खानविलकर  व त्यांच्यानंतर आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील हेही मंत्री राहीले, पण त्यांच्याकडे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा कार्यभार कधी दिला गेला नाही. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातील मंत्र्यांना या जिल्ह्यातील प्रलंबित कामाविषयी कधी आस्था वाटली नाही. 

गेल्या दोन वर्षापासून मात्र विद्यमान पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रश्‍न सोडविण्यासाठी चांगलाच पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. शहर सौंदर्यीकरण, वाहतूक समस्या सोडवणे, विमानतळ सुरू करणे, रखडलेल्या सिंचन प्रकल्पाची सद्यस्थिती, भविष्यातील उपाययोजना आदी विषयांना त्यांनी हात घातला. या प्रलंबित प्रश्‍नांवर संबंधितांच्या बैठका घेऊन ते मार्गी लावण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. यातील प्रश्‍न सुटले किती? हा महत्त्वाचा प्रश्‍न नाही. पण जिल्ह्यातील मंत्रीच पालकमंत्री असतील तर प्रश्‍नांचा उहापोह होणे, ही चांगली गोष्ट आहे. त्यातून देशातील दुसऱ्या क्रमांकाचा ध्वजाची उभारणी, पोलीस वसाहतीतील घरे दुरूस्तीसाठीचा मोठा निधी, अमृत योजनेतून शहराला मिळालेला निधी, अशी काही कामे प्रगतीपथावर आहेत. 

मतभेदही मिटले नाहीत
जिल्ह्याचे पालकमंत्री पद आठ वर्षे काँग्रेसच्या नेत्यांकडे होते, पण त्यांना जिल्ह्यातील काँग्रेस अंतर्गत असलेले मतभेदही मिटवता आले नाहीत. एवढेच नव्हे तर तत्कालिन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार सतेज पाटील यांच्यातच मतभेद झाले. पालकमंत्री यांनी पालक या नात्याने जिल्ह्यातील पक्षाच्या परिस्थितीकडेही बघण्याची गरज आहे. सुरूवातीला डॉ. कदम यांनी तो प्रयत्न केला, पण त्यांनीही नंतर जिल्ह्यातील नेत्यांसमोर हात टेकले.

पक्षवाढीसाठी फायदा
काँग्रेसच्या काळात सर्वसत्तास्थाने दोन्ही काँग्रेसकडे असल्याने पक्ष वाढीचा फार मोठा विषय त्या काळात नव्हता. पण पालकमंत्री म्हणून चंद्रकांतदादा पाटील यांनी सुत्रे हातात घेतल्यानंतर त्यांनी पहिल्यापासून पक्ष कसा वाढेल, यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. त्यांना यात यशही आले. विधानसभेनंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांनी कोल्हापुरातच ठाण मांडले.

त्यामुळे केवळ एक नगरसेवक असलेल्या महापालिकेत भाजप आज सत्तेच्या जवळपास आहे. नऊपैकी पाच नगरपालिका भाजपाच्या ताब्यात गेल्या. जिल्हा परिषदेत भाजापाचाच झेंडा फडकला. दोन्ही काँग्रेसमधील दिग्गजांना भाजपात घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा सपाटा त्यांनी लावला. त्यात समरजितसिंह घाटगे, राहूल देसाई, अरूण इंगवले, अशोकराव माने, अशोक स्वामी यासारखे ताकदीचे लोक त्यांच्या गळाला लागले. पालकमंत्री त्याच जिल्ह्याचा असल्याचा फायदा यानिमित्ताने भाजपाला झाला. 

टोलचा प्रश्‍न निकालात
शहरातील रस्ते विकास प्रकल्पांत रस्ते झाले, पण त्याचवेळी टोलचे भूतही शहरवासियांच्या मानगुटीवर बसले. काँग्रेसच्या राजवटीत हा प्रकल्प स्विकारला गेला. पण टोलविरोधात सर्वपक्षीयांच्या माध्यमातून अख्खे शहर एकवटले. आंदोलन, बेमुदत उपोषण, मोर्चासह जाळपोळीच्याही घटना घडल्या. निवडणुकीच्या तोंडावर तत्कालिन मंत्री हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांनी टोल पंचगंगेत बुडवण्याचे आश्‍वासन दिले. पण त्यांना ते शक्‍य झाले नाही. निवडणुकीत हाच मुद्दा कळीचा आणि प्रचाराचा प्रमुख भाग ठरला. चंद्रकांतदादांनी हा टोल घालवण्याचे आश्‍वासन दिले. आणि राज्यात सत्ता आल्यानंतर लगेचच त्यांनी दिलेला शब्द पाळून ‘जे बोललो ते करून दाखवले’, असा संदेश लोकांपर्यंत पोहचवला. 

चौकांचे सुशोभीकरण 
शहरातील प्रमुख चौकांची अक्षरशः आभाळ झाली होती. केएसबीपीच्या माध्यमातून पालकमंत्री पाटील यांनी हे चौक सुशोभीकरणाचे काम हाती घेतले. त्यातून एसपी ऑफीस चौक, शिवाजी विद्यापीठ परिसरातील चौकांचे सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले. इतर चौकातील प्रस्तावही तयार आहेत. 

या प्रश्‍नाना मिळाली गती
-शहर सौंदर्यीकरण, 
-वाहतूक समस्येवर उपाययोजना
-विमानतळ सुरू करणे, 
-रखडलेल्या सिंचन प्रकल्पाची सद्यस्थिती, उपाययोजना

मार्गी लागलेली कामे
- देशातील दुसऱ्या क्रमांकाचा ध्वजाची उभारणी 
- पोलीस वसाहतीतील घरे दुरूस्तीसाठी मोठा निधी. 
- अमृत योजनेतून शहराला मिळालेला निधी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com