पत्रकार शिंदे, शेतकरी पोवार यांचा मृत्यू चटका लावणारा - धनंजय महाडिक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

कोल्हापूर - पत्रकार रघुनाथ शिंदे, शेतकरी अनिल पोवार यांना कोल्हापूर प्रेस क्‍लबतर्फे आदरांजली वाहण्यात आली. त्यांचा मृत्यू चटका लावणारा असल्याचे सांगून खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली. प्रेस क्‍लबचे अध्यक्ष लुमाकांत नलवडे, उपाध्यक्ष तानाजी पोवार प्रमुख उपस्थित होते. 

कोल्हापूर - पत्रकार रघुनाथ शिंदे, शेतकरी अनिल पोवार यांना कोल्हापूर प्रेस क्‍लबतर्फे आदरांजली वाहण्यात आली. त्यांचा मृत्यू चटका लावणारा असल्याचे सांगून खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली. प्रेस क्‍लबचे अध्यक्ष लुमाकांत नलवडे, उपाध्यक्ष तानाजी पोवार प्रमुख उपस्थित होते. 

बी चॅनेलचे गारगोटीतील प्रतिनिधी रघुनाथ शिंदे यांचा काल गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांना प्रेस क्‍लबच्या कार्यालयात आदरांजली वाहण्यात आली. त्यांची बातमी पाठविण्यासाठीची धडपड, अनुभव आणि अनेकांशी असलेले कौटुंबिक संबंध याबाबत माध्यम प्रतिनिधींनी भावना व्यक्त केल्या. काहींना अश्रू अनावर झाले. 

खासदार महाडिक म्हणाले,"" रघुचा मृत्यू चटका लावणारा आहे. त्याच्या कुटुंबात विवाह असतानाही तो चित्रीकरणासाठी गेला. त्याची बातमीसाठी असलेली धडपड नक्कीच वाखानण्याजोगी होती. त्याचा दुर्देवी अंत झाला. त्यांच्या कुटुंबियासाठी बी चॅनेलच्या अरुंधती महाडिक यांनी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पालकमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांशीही मी बोललो आहे. त्यांना ईमेल केले आहेत. आठ लाखांची मदत मिळेलच; त्या व्यतिरिक्त आणखी काही मदत देता येईल यासाठी मी प्रयत्नशील आहे. कोल्हापूर प्रेस क्‍लबने एखादा निधी तयार करावा. त्यासाठी आमच्या सर्वांची मदत घ्यावी. माझ्याकडूनही मदत दिली जाईल. कोणावर कोणताही प्रसंग येऊ शकतो. तेंव्हा तातडीने निधी उपलब्ध होणे आवश्‍यक आहे.'' 

अध्यक्ष लुमाकांत नलवडे म्हणाले,"" हाडाचा पत्रकार काय असतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे "रघूमामा' होय. रघूमामा हीच त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने आज पत्रकारांचे डोळे पाणावले. यावरून त्यांची मैत्री दिसून येते. पत्रकारांनी आपल्या कुटुंबियांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कुटुंबियांसाठी आणि पत्रकारांच्या आरोग्यासाठी ठोस निधी उपलब्ध करू.'' 

उपाध्यक्ष तानाजी पोवार, माहिती व जनसंपर्क अधिकारी एस. आर. माने, ज्येष्ठ संचालक विजय कुंभार, शितल धनवडे, उद्धव गोडसे, राजू मकोटे, अमर पाटील, बाळासाहेब उबाळे, किशोर घाटगे यांनी भावना व्यक्त केल्या. सहसचिव पांडुरुंग दळवी, खजिनदार युवराज पाटील, सुनील पाटील, बी.डी. चेचर, दयानंद लिपारे, विजय पाटील, सतीश सरीकर यांच्यासह संचालक आणि माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.