थेट पाइपलाइनचे काम शिवसेनेने बंद पाडले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

कोल्हापूर - थेट पाइपलाइनच्या कामाच्या दर्जाबाबत महापालिकेतील सत्तारूढ आणि विरोध आघाडीमध्ये एकमेकांवर चिखलफेक सुरू असतानाच आज शिवसेनेने थेट पाइपलाइनचे काम निकृष्ट होत असल्याचा निषेध करत बंद पाडले. पुईखडीपासून टिपकुर्लीच्या पुलापर्यंत थेट पाइपलाइनचे सुरू असलेले काम थांबवण्यात आले. तज्ज्ञ समिती स्थापन करून तिच्याकडून कामाच्या दर्जाबाबतचा अहवाल घ्यावा, त्याशिवाय काम सुरू करू नये. थेट पाइपलाइनच्या कामाची जबाबदारी असणारे उपायुक्‍त विजय खोराटेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली.

थेट पाइपलाइनच्या कामावरून गेल्या आठ दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. "कामाचा दर्जा चांगला नसल्याबद्दल महापालिकेतील विरोधी आघाडीने या कामाच्या चौकशीची मागणी केली आहे. त्याला सत्तारूढ गटानेही उत्तर दिले आहे. हा आरोप-प्रत्यारोपांचा फड रंगलेला असतानाच आज शिवसेनेने थेट पाइपलाइनच्या कामाच्या दर्जाबाबत आंदोलन सुरू केले. सकाळी कार्यकर्ते लक्ष्मीपुरी येथे जमले. त्यानंतर साडेअकरा वाजता सर्व कार्यकर्ते वाशी येथे पोचले. तेथे "जय भवानी, जय शिवाजी', "निकृष्ट कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या धिक्‍कार असो' अशी घोषणाबाजी करण्यात आली. तेथे काम करणाऱ्यांना हाकलून देण्यात आले. तेथील सुपरवायझरला बोलावून घेऊन त्याला काम बंद ठेवण्याबाबत सांगण्यात आले. त्यानंतर त्याने काम थांबवून खुदाईचे, तसेच इतर मशिनरी तेथून काढली. त्यानंतर बारा वाजता कांडगाव येथे सुरू असलेले काम बंद पाडण्यात आले. तेथील सर्व मशिनरी बाहेर काढण्यात आली. देवाळे येथील काम बंद पाडले. तेथे वापरलेल्या लोखंडी पाइपवरील कॉंक्रिट फुटल्याचे आढळून आल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी येथील कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.

त्यानंतर ज्यावरून महापालिकेत थेट पाइपलाइन गाजत आहे त्या अडीच कोटी रुपयांच्या पुलाकडे शिवसेनेने आपला मोर्चा वळविला. पूल पाहिल्यानंतर त्यासाठी अडीच कोटी खर्च न करता जास्तीत जास्त पंचवीस लाख रुपयेच खर्ची पडले असण्याची शक्‍यता वर्तविली. येथे पुलावर उभे राहत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

कोल्हापूरला परतताना आंदोलक पुईखडी येथील ठेकेदाराच्या कार्यालयात घुसले. येथे एकच व्यक्‍ती होती. तिला बाहेर काढण्यात आले व कार्यालय बंद ठेवण्यात आले. या वेळी संजय पवार यांनी जोपर्यंत आयुक्‍त व संबंधित घटकांसोबत आमची बैठक होत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा आग्रह धरला. त्यावर ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी, स्लॅब निम्मा टाकला आहे, थोडा टाकायचा बाकी आहे. जर काम थांबवले तर नुकसान होईल. त्यामुळे स्लॅबचे काम फक्‍त पूर्ण करून घेतो, असे सांगितले. त्याला श्री. पवार यांनी परवानगी दिली. मात्र उद्यापासून येथे काहीही काम सुरू होता कामा नये, असे सुनावले.

ठेकेदार कंपनीनंतर आंदोलकांनी कन्सलटंट म्हणून काम पाहणाऱ्या युनिटी कन्सलटंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कार्यालयाचा ताबा घेतला. या कार्यालयातही कंपनीचे श्री. कदम नावाचे एकच अधिकारी होते. त्यांना कार्यालयातून बाहेर काढण्यात आले. कंपनीच्या बोर्डाला चिखल फासण्यात आला.

युनिटीचे श्री. कदम या वेळी श्री. पवार यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू लागले. ते म्हणाले, ""मला कोल्हापूरबद्दल प्रेम आहे. माझे थोडं ऐकून घ्या.'' त्यावर तुमचे ऐकायला आम्ही येथे आलो नसल्याचे, श्री. पवार यांनी सुनावले. दोघांत या वेळी वादही झाला. कार्यकर्ते कदम यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा श्री. पवार यांनीच त्यांना अडवले. त्यानंतर श्री. कदम तेथून निघून गेले.