पुतळा उभारणीवरून वाद अनाठायी

पुतळा उभारणीवरून वाद अनाठायी

कोल्हापूर - आहे त्या पुतळ्यांची देखभाल नाही, उभ्या केलेल्या काही पुतळ्याच्या उभारणीचे नियम पाळलेले नाहीत, तोवर शिवाजी विद्यापीठासमोर सार्वजनिक चौकात नव्या पुतळ्याची बेकायदेशीर प्रतिष्ठापना म्हणजे बसवेश्‍वरांसारख्या महापुरुषाचा अवमान करण्याचाच प्रकार घडला आहे. कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वगळता अन्य कोणत्याही पुतळ्याची दैनंदिन देखभाल होत नाही. करवीर संस्थान संस्थापिका ताराराणीच्या पुतळ्यासमोरचा जीर्ण ध्वज बदलण्याचीही कोणी तसदी घेत नाही. अशा परिस्थितीत रात्री अनधिकृतपणे बसवेश्‍वरांचा पुतळा व त्या इर्षेवर दुसऱ्या दिवशी त्याच चौकात विवेकानंद चौक असा अनधिकृत फलक, हा तेढ वाढवण्याचा प्रकार घडला आहे. तेढ निर्माण झाल्यावर पुतळा उभारणीच्या नियमाचे पुस्तक उघडण्याऐवजी अनधिकृतपणे कोणताही पुतळा, धार्मिक स्थळ, धार्मिकतेचे प्रतीक रस्त्यावर, रस्त्याकडेला उभे राहणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज आहे.

पुतळा हे केवळ निमित्त आहे. पण त्यामागे खूप चांगले-वाईट कंगोरे आहेत. राष्ट्रपुरुष, वीरपुरुष किंवा अतुलनीय कामगिरी केलेल्या व्यक्तीचा पुतळा हा प्रेरणेचा स्रोत ठरावा, अशी मूळ अपेक्षा आहे. पण एकूणच पुतळ्याची अवस्था बघता जयंती, पुण्यतिथी दिवशीच बहुतेक पुतळ्यांच्या गळ्यात हार दिसतो. पुतळ्याच्या उद्‌घाटनानंतर पुतळा समितीचा एकही सदस्य पुतळ्याकडे फिरकत नाही, अशी अवस्था आहे.

कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू, डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची नित्य देखभाल होते. कारण या पुतळ्याबाबत हयगय झाल्यास समाजातले घटक प्रक्षुब्ध होतात हा अनुभव आहे. पण इतर काही पुतळ्यांच्या गळ्यात वर्षभर एकच सुकलेला हार असला किंवा त्या पुतळ्यावर धुळीचा थर बसला असेल तरीही कोणाला त्याचे काही वाटत नाही, अशी स्थिती आहे.

शासन निर्णय व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुतळा उभारणीसाठी नियम निश्‍चित केले आहेत. पुतळा उभा करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्यानंतर त्यांनी महापालिका आयुक्त, पोलिसप्रमुख, सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता, निवासी उपजिल्हाधिकारी यांची समिती स्थापन करून पुतळा उभारणीस मान्यता द्यायची आहे. शासकीय, निमशासकीय, ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका किंवा शासनाशी संबंधित जागेवर पुतळा उभारण्यापूर्वी या समितीची मान्यता आवश्‍यक आहे. या शिवाय एखादा पुतळा उभारल्यास त्यातून भविष्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्‌भवणार नाही याबाबतचा पोलिसांचा ना हरकत दाखलाही आवश्‍यक आहे. विशेष हे की पुतळ्याच्या दैनंदिन देखभालीची जबाबदारी पुतळा समितीवर आहे. पण आता पुतळा थाटामाटात उभा करायचा व त्याची जबाबदारी प्रशासनावर सोपवून हात वर करायचे प्रकार वाढतत आहेत. पुतळा व त्याची विटंबना हा अतिशय संवेदनशील प्रश्‍न असल्याने पुतळा समितीऐवजी प्रशासनालाच पुतळ्याकडे लक्ष द्यावे लागते, अशी स्थिती आहे.

तरच महापुरुषांचा सन्मान
अनधिकृतपणे बसवलेल्या बसवेश्‍वरांच्या पुतळ्याच्या निमित्ताने हा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. अलीकडच्या काळात बसवलेले सर्वच पुतळे शासन नियमाच्या चौकटीत आहेत, असेही नाही. पण त्यांनी उभारला तर आम्ही का उभारू नये, अशी इर्षेची भावना बहुतेक ठिकाणी पुतळा उभारणीमागे आहे. बसवेश्‍वरांचा पुतळा उभारल्यानंतर रात्री त्याच चौकाला विवेकानंद चौक, असे नाव देण्याचा प्रकार याच इर्षेतून घडला आहे. त्यामुळे बसवेश्‍वरांचा पुतळा उभा करताना शासकीय नियमांच्या चाकोरीतून उभारला तरच त्या महापुरुषांचा तो सन्मान ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com