दीपांनी दिपल्या दिशा...

शर्मिष्ठा ताशी
गुरुवार, 27 ऑक्टोबर 2016

हस्ताच्या पावसाने झाकोळलेले आभाळ स्वच्छ होतं. हसरं हवंहवंसं ऊन चराचरामध्ये चैतन्य निर्माण करतं. अगदी सोन्याचं वाटावं असं पिवळ धम्मक सोनेरी ऊन, हिरवाईने नटलेला भवताल, हवेत हवीहवीशी वाटणारी गुलाबी थंडी, लहान होत जाणारे दिवस आणि काळोखाने दाटलेल्या दिवसापेक्षा मोठ्या असणाऱ्या रात्री, हा ऋतूचा बदल जाणवला की समजावं 'दिवाळी आली'. 'दिवाळी' हा शब्दच मनावर केवढी तरी जादू करतो. सारं बदलून टाकतो. 

मला आठवतंय तिथंपासून आजच्या दिवाळीपर्यंत बदललेले तिचे स्वरूप पाहता असं वाटतंय की, कितीतरी बदल झाले हा सण साजरा करण्यात, संदर्भ बदलले तरी दिवाळीची जादू मात्र आजही आहेच! 

हस्ताच्या पावसाने झाकोळलेले आभाळ स्वच्छ होतं. हसरं हवंहवंसं ऊन चराचरामध्ये चैतन्य निर्माण करतं. अगदी सोन्याचं वाटावं असं पिवळ धम्मक सोनेरी ऊन, हिरवाईने नटलेला भवताल, हवेत हवीहवीशी वाटणारी गुलाबी थंडी, लहान होत जाणारे दिवस आणि काळोखाने दाटलेल्या दिवसापेक्षा मोठ्या असणाऱ्या रात्री, हा ऋतूचा बदल जाणवला की समजावं 'दिवाळी आली'. 'दिवाळी' हा शब्दच मनावर केवढी तरी जादू करतो. सारं बदलून टाकतो. 

मला आठवतंय तिथंपासून आजच्या दिवाळीपर्यंत बदललेले तिचे स्वरूप पाहता असं वाटतंय की, कितीतरी बदल झाले हा सण साजरा करण्यात, संदर्भ बदलले तरी दिवाळीची जादू मात्र आजही आहेच! 

पूर्वी प्रत्येकाच्या घरी साजरी होणारी दिवाळी आणि आजची दिवाळी यात भलेही कितीही फरक असला तरी या सणामुळे तुम्हा-आम्हाला, साऱ्या समाजमनाला होणारा आनंद आजही तितकाच शाश्‍वत आहे. 

आपट्याच्या पानाचा चरचरीत स्पर्शच दिवाळी उंबरठ्यावर आली आहे याची जाणीव करून द्यायचा. लहानपणी दसरा संपला की आई-आजी भाजणी भाजायला घेत. भाजणीचा वास घरभर दरवळत राही. दोघी मिळून घरीच दळत. मग घर झाडून पुसून लख्ख करायचं, आकाशकंदील करायचा, पणत्या काढून धुऊन ठेवायच्या. अशा कामाला वेग येई. चकली, कडबोळे, करंज्या असे पदार्थ दिवाळीतच होत असत. आता आपण हे बारा महिने खातो. फराळाचे पदार्थ करायला शेजारच्या काकू यायच्या. त्यांच्याकडे आई, काकू जायच्या. असा सारा उत्साह असायचा. अंगण शेणाने सारवायचे. दर दिवशी काढतो त्यापेक्षा मोठी, भरपूर ठिपक्‍यांची रांगोळी काढायची. या दिवसात पाना-फुलांच्या रांगोळीपेक्षा ठिपक्‍यांची रांगोळी काढून रंग भरून त्यावर पणत्या पेटवून ठेवल्या की दिवाळीला खरा रंग चढत असे. आम्ही मैत्रिणी एकमेकींकडून मोठ्या, ठिपक्‍यांच्या रांगोळ्या जमा करून वहीत काढून ठेवत असू. 

सारवलेल्या, रांगोळीने सजलेल्या अंगणात आई वसुबारसेपासून शेणाच्या गवळणी, कृष्ण, पेंद्या, गोवर्धन पर्वत, गाईगुरे, नंदाचा वाडा असे घालत असे. त्याच्या भोवती रांगोळी काढून हळदी-कुंकू-फुले वाहून त्याची पूजा करून घरदार दही-दूधदुभत्याने समृद्ध ठेव, अशी प्रार्थना करायची. आम्हीपण तिला हौसेने मदत करत असू. नरकचतुर्दशीला भल्या पहाटे अभ्यंगस्नानानंतर ओवाळायला परटीण, रामोशीण येत असे. त्यांच्यासाठी ओवाळणी, फराळाचे पुडे माई अगत्याने देत असे. नरकचतुर्दशीच्या आधी आम्ही काकाला आकाशकंदील बनवायला मदत करत असू. लाल-हिरव्या जिलेटिन पेपरचा आकाशदिवा, त्यामध्ये पणती ठेवण्यासाठी जागा केलेली असे. नंतर त्यामध्ये विजेचा बल्ब आला. आकाशात टांगलेला, मंद दिव्याने झगमगणारा आकाशदिवा मनावर विलक्षण जादू करे. आकाशदिवा टांगून झाला की नबीलालकडून शोभेची दारू आणायला केव्हा एकदा जातो असे होऊन जाई. दारू अगदी मोजकीच असे. पण आम्ही त्यात खूश होत असू. 

नरकचतुर्दशीला भल्या पहाटे उठल्यावर पाहावं तर आईने सडा रांगोळी करून अंगणात, उंबऱ्यात दिवे लावून, सुगंधी तेल उटण्याची तयारी करून ठेवलेली असे. रेडिओवर नरकासुराचं आख्यान लागलेलं असे. सूर्योदयापूर्वी स्नान झालंच पाहिजे, असा तिचा दंडक असे. अभ्यंगस्नानानंतर ओवाळायला परटीण, रामोशीण येत असे. माई त्यांना अगत्याने ओवाळणी, फराळाचे पुडे देत असे. त्या दाराला तोरण बांधत असत. आमच्या भल्याची कामना करून तृप्त होऊन पुढच्या घरी जात असत. 

लक्ष्मी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी घराचा कोपरा न्‌ कोपरा अगदी संडास-बाथरूमसुद्धा पणत्याने उजळून टाकून लक्ष्मीची-कुबेराची यथासांग पूजा करून तिचा कृपाशीर्वाद मागायचा. या दिवशी देवळात श्री रुक्‍मिणी मातेच्या खजिन्याची पूजा केली जाई. त्या पूजेसाठी, आरतीसाठी आम्ही आवर्जून उपस्थित राहात असू. लक्ष्मीस्वरूप रुक्‍मिणी माता विलक्षण तेजस्वी सुंदर दिसत असे. 

बलिप्रतिपदेला म्हणजे पाडव्याला तांदळाने बळीची प्रतिमा बनवून त्यात सुवर्णाची अंगठी ठेवून त्याची पूजा करायची. 'इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो', अशी प्रार्थना करायची. या दिवशी आईला, काकूला पाडव्याची ओवाळणी काय मिळणार याची उत्सुकता असे. त्यावेळी वर्षातून एकदाच अशी भेट मिळत असल्याने त्याचे त्यांना आणि आम्हालाही अप्रुप असे. 

भाऊबीजेला आम्हा मुलींना भावाकडून भेटवस्तू मिळे. ती काय असेल हे आनंदमिश्रित कुतूहल आम्हाला वाटे. 

अशी ही केव्हा एकदा येते असं वाटणारी दिवाळी आली की भरकन निघून गेली असं वाटत राही. आमच्या लहानपणीची दिवाळी झगमगाटापेक्षा लहान सहान आनंदाने भरलेली, मंद दिव्याने उजळणारी आणि माणसा-माणसांच्या मनातली किल्मिषं जाऊन सद्‌भावाचे, प्रेमाचे दीप पेटवणारी होती. 

Web Title: Diwali celebrations all over India