दीपोत्सव तेजोमय अन्‌ तेजीमयही...!

दीपोत्सव तेजोमय अन्‌ तेजीमयही...!
दीपोत्सव तेजोमय अन्‌ तेजीमयही...!

आज लक्ष्मीपूजन : कडकडाटाशिवाय उजाडली मंगलमयी दिवाळी पहाट

कोल्हापूर - मनामनांतील अंधाराचे सावट दूर करून घराघरांत सुरू असणारा तेजोमय आनंदोत्सव आणि मंदीची जळमटे दूर सारून बाजारपेठेत सुरू असणाऱ्या तेजीमय आतषबाजीने दीपोत्सवाला उधाण आले आहे. गोमातेचे पूजन करून वसुबारसने सुरू झालेल्या या सणातील आजचा मुख्य दिवसही सर्वत्र मंगलमय वातावरणात साजरा झाला. दरम्यान, आजची दिवाळी पहाट फटाक्‍यांच्या कडकडाटाशिवाय उजाडली. फटाक्‍यांच्या वाढलेल्या किमती आणि फटाकेमुक्त दिवाळीचा जागर या पार्श्‍वभूमीवर हे सकारात्मक चित्र अनुभवायला मिळाले. गेल्या दोन दिवसांत बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली.

दिवाळी म्हणजे सद्‌गुण, सद्‌भावना, सद्‌वर्तन, सदाचार, सद्विचार हीच सुसंस्कृत मनांची बीजे आहेत, असा संदेश देणारा हा दीपोत्सव. साहजिकच घराघरांत पहाटे सडा टाकून रांगोळी सजली. "भावदीप हे मनामनांचे दिव्यादिव्यांनी उजळायचे, अखंड दीप हे स्नेहाचे दीपावलीला फुलवायचे,' अशा शुभेच्छांचे मेसेजीस सोशल मीडियावरून शेअर होऊ लागले. अभ्यंगस्नानानंतर सहकुटुंब फराळाचा आस्वाद घेतल्यानंतर वेध लागले ते पै-पाहुणे, मित्रांना फराळ देण्यासाठीचे. फराळाचे डबे घेऊन सकाळपासूनच लोक बाहेर पडले. घराघरांत दीपोत्सव साजरा करतानाच अनाथालये, वृद्धाश्रमांसह विविध सामाजिक संस्थांना अनेकांनी देणग्याही दिल्या. फराळ देण्यापेक्षा धान्य आणि रोख रकमेच्या स्वरूपात मदत करण्याच्या संस्थांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला. सायंकाळनंतर पुन्हा घराघरांत लगबग सुरू झाली. रांगोळीने अंगण सजले. पणत्या, आकाशकंदील, आकर्षक विविधरंगी रोषणाईमुळे घराघरांत सळसळते चैतन्य निर्माण झाले.

आज लक्ष्मीपूजन
लक्ष्मीपूजन उद्या (रविवारी) होणार असून, त्यासाठी लागणारी झेंडूची फुले, केरसुणी, तसेच नैवेद्यासाठी लागणारे बत्तासे, लाह्या हे साहित्य खरेदीसाठी आजपासून गर्दी झाली. महालक्ष्मी मंदिर परिसर, शिंगोसी मार्केट, कपिलतार्थ, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, राजारामपुरी आदी ठिकाणी हे साहित्य उपलब्ध आहे. पाच फळे तीस ते पस्तीस रुपयांपासून उपलब्ध आहेत.

उद्या गुंतवणूक डे...!
बाजारपेठेत यंदा तेजीचे वातावरण आहे. साहजिकच सोमवारी (ता. 31) दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीच्या उत्सवाबरोबरच गुंतवणूक डे साजरा होणार आहे. त्यासाठी गुजरीबरोबरच मोबाइल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, टू व्हीलर-फोर व्हीलरच्या शोरूम, रिअल इस्टेटसह शेअर मार्केटही सज्ज झाले आहे.

माणुसकीची भिंत
दसरा चौकातील शाहू स्मारक भवनाजवळ माणुसकीची भिंत व्हॉटस्‌ ऍप ग्रुपतर्फे "माणुसकीची भिंत' हा उपक्रम सुरू आहे. सकाळपासूनच कपडे व इतर साहित्य नेण्यासाठी गरजूंची झुंबड उडाली. गंगावेस जैन मंदिराजवळही कसबा तरुण मंडळ, कॉर्नर मित्र मंडळ आणि स्वाभिमान संघटनेतर्फे "पाऊस माणुसकीचे' हा उपक्रम सुरू असून, तेथेही गरजूंनी गर्दी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com