ज्ञानोबा-तुकोबारायांसह संतांचे पालखी सोहळे पंढरपुरात दाखल

पीतांबर लोहार - सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

पंढरपूर - आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्‍वर महाराज, संत तुकाराम महाराज यांसह राज्यातील तीर्थक्षेत्रांवरून निघालेले सकल संतांचे पालखी सोहळे बुधवारी सायंकाळी वारकऱ्यांचे माहेर असलेल्या पंढरीत दाखल झाले. "संत भार पंढरीत...‘ याची अनुभूती लाखो भाविकांनी आज घेतली. ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजराने पंढरी दुमदुमून गेली.

संत तुकाराम महाराज पालखीने 28 जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले होते. मंगळवारी सायंकाळी वाखरी तळावर संतमेळा भरला होता. आळंदीहून निघालेल्या संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखीसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या अन्य संतांच्या पालख्याही वाखरीत मुक्कामी होत्या. टाळ-मृदंगाच्या गजरात अभंग गात, नाचत वाटचाल केलेले वारकरी पंढरपूर जवळ आल्याने आनंदात होते. पालखी तळावर कीर्तने झाली. तर दिंड्या मुक्कामी असलेल्या ठिकाणी अभंग, गवळणी, भारूड रंगले. पालखी प्रस्थानापासून सुरू असलेली पायी वाटचाल सुखकर झाली होती. "भाग गेला, शीण गेला। अवघा झालासे आनंद।।...‘ अशीच सर्वांची भावना झाली आहे.

संत तुकोबारायांचा पालखी सोहळा बुधवारी दुपारी पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. वाखरीतळावर सकाळपासून प्रखर ऊन पडले होते. भाविकांनी रांग लावून पादुकांचे दर्शन घेतले. पालखी मार्गस्थ झाल्यानंतर दिंड्यांमध्ये अभंग म्हणत वारकरी आनंदात चालत होते. विसबावीजवळ उभे रिंगण रंगले. तुकोबारायांच्या पालखीपुढे अन्य संतांच्या तर मागे संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा होता. संध्याकाळी पंढरीत नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर तुकोबारायांची पालखी संत तुकाराम महाराज मंदिरात पोचली. समाज आरती झाल्यानंतर रात्री देहूकरांचे कीर्तन झाले. भोळ्या संतांची पंढरी, आज आम्हास पावली अशीच सर्वांची भावना झाली आहे.

परतीचा प्रवास पौर्णिमेपासून
संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम पंढरपूरमधील संत तुकाराम महाराज मंदिरात आहे. पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास पौर्णिमेपासून अर्थात मंगळवार, 19 जुलैला सुरू होईल. शनिवारी, 30 जुलैला पालखी देहूत पोचणार आहे.