कोणत्याही दारू दुकानास शाहूपुरीत परवानगी नाही 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

सातारा -  शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये कोणत्याही दारू दुकानास परवानगी न देण्याचा ठराव आज ग्रामसभेत एकमताने मंजूर झाला. दरम्यान, सातारा पालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीत सहभागी होण्यास तीव्र विरोध दर्शविण्यात आला. 

सातारा -  शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये कोणत्याही दारू दुकानास परवानगी न देण्याचा ठराव आज ग्रामसभेत एकमताने मंजूर झाला. दरम्यान, सातारा पालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीत सहभागी होण्यास तीव्र विरोध दर्शविण्यात आला. 

शाहूपुरीच्या सरपंच रेश्‍मा गिरी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीच्या हॉलमध्ये आज ही ग्रामसभा झाली. या वेळी पंचायत समिती सदस्य संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून विशिष्ठ अंतराच्या आतील दारू दुकाने तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले. या आदेशाबाबतची माहिती ग्रामसभेत देण्यात आली. काही दुकानदारांनी आपली दुकाने अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ओघाने काही दुकानदारांची शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीत दारूदुकान सुरू करण्याबाबत मागणी येऊ शकते. या पार्श्‍वभूमीवर ग्रामसभेने आज नव्याने कोणत्याही दारू दुकानास ग्रामपंचायतीच्या हद्दीत परवानगी न देण्याचा निर्णय घेतला. उपस्थितांनी टाळ्या वाजवून या निर्णयाचे स्वागत केले. या वेळी उपसरपंच अमित कुलकर्णी, सदस्य सुधाकर यादव, शंकर किर्दत, पांडुरंग वर्णेकर, तसेच सुरेश साधले, आर. के. जाधव, जनार्दन मांढरे, भाऊ तिखे, ग्रामविस्तार अधिकारी एस. बी. निकम, सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

नगरपंचायतीसाठी पाठपुरावा 

सातारा पालिकेच्या हद्दवाढीची प्रारंभिक अधिसूचना गेल्या महिन्यात प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये सातारा पालिका क्षेत्रात शाहूपुरीसह शाहूनगर, विलासपूर, दरे खुर्द व खेडचा काही भाग समाविष्ट करण्याचा इरादा शासनाने व्यक्त केला आहे. यास शाहूपुरीच्या ग्रामस्थांनी आजच्या ग्रामसभेत विरोध दर्शविला. ग्रामपंचायतीने 2013 मध्ये शाहूपुरी नगरपंचायत करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव अद्याप जिल्हाधिकाऱ्यांकडून शासनाकडे पुढे पाठविण्यात आलेला नाही. या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याचा निर्णय ग्रामसभेत करण्यात आला.