हद्दवाढीची अन्यायी अधिसूचना काढूच नका

हद्दवाढीची अन्यायी अधिसूचना काढूच नका

कोल्हापूर - हद्दवाढीसाठी शहरातील जनता नाही, तर काही नेतेच पुढाकार घेत आहेत. शहरात असणारे आरक्षण उठवून, गावची शेती संपवायला निघाले आहेत. शहरातील नेत्यांनी शहर सुधारण्याऐवजी बिघडण्याचेच काम केले आहे. शहराचे अतिक्रमण गावात नको, शहरातील बागांचे आरक्षण कोणी, कसे उठविले? ते कोणाकोणाला दिले याची महापालिकेने श्‍वेतपत्रिका काढावी, अशी मागणी करत ग्रामीण जनतेवर अन्याय करणारी शहर हद्दवाढीची अधिसूचना काढूच नये, अशी मागणी हद्दवाढीतील प्रस्तावित 18 गावांतील नागरिकांनी आज केली.
 

शहर हद्दवाढीला विरोध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकप्रतिनिंधीसह 18 गावांतील सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी आज ठिय्या आंदोलन केले.
 

खासदार राजू शेट्टी म्हणाले, ‘शहर हद्दवाढीतील प्रस्तावित 18 गावांतील ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. ही गावे आधीपासूनच सक्षम आहेत. त्यांना महापालिकेच्या विकासाची गरज नाही. केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या योजनांमुळे गावे आता सक्षम झाली आहेत. त्यामुळे महापालिकेने या गावांचा विकास करावा, अशी काय परिस्थिती नाही. वास्तविक शहरातील सर्व रिकाम्या जागा, सार्वजनिक उपयोगासाठी येणाऱ्या जागा संपलेल्या आहेत. आता या खेड्यांना शहरात समाविष्ट करून त्यांच्या शेती आणि गावातील रिकाम्या जागांवर काही लोकांचा डोळा आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकायचे, त्यासाठी त्याला वेगवेगळी नावे टाकायची, शेतकऱ्यांना भीती घालायची आणि ती शेतजमीन खरेदी करायची. हाच महापालिकेतील काही लोकांचा धंदा आहे.‘‘ हद्दवाढीमुळे शेती आणि शेतकरी धोक्‍यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी शेतकरी संघटनेसह रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही श्री. शेट्टी यांनी दिला.
 

आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, ‘शहरात राहणाऱ्या लोकांना हद्दवाढ नको आहे. महापालिकेतील काही पुढाऱ्यांनाच यात रस आहे. हद्दवाढ नको म्हणून ग्रामीण जनता रस्त्यावर उतरत आहे, तर महापालिकेतील काही पुढारीच हद्दवाढ करा म्हणत आहेत. शहर सुधारता येत नाही आणि ग्रामीण भाग सुधारण्याच्या वलग्ना करत आहेत. आधी महापालिकेचा कारभार चांगला करा. त्यानंतर गावे घेण्याचा विचार करा. दमदाटी, दंडूकशाही आणि दबावाने हद्दवाढ होत नाही. शासनाने याचा सांगोपांग विचार केला पाहिजे. शहरात पाण्याची गैरसोय आहे. याची शहरवासीयांना जाणीव आहे. महापालिकेचा विद्युत साहित्य खरेदीचा घोटाळा नुकताच चव्हाट्यावर आला आहे. हद्दवाढ झाल्यानंतर चांगल्या बागा, सोयी सुविधा देणार म्हणून सांगितले जाते; पण शहरात कुठेही स्वच्छता नाही, नागरी सुविधांची वाणवा आहे आणि हद्दवाढीचा भाषा केली जात आहे. याला ग्रामीण जनता कधीच मान्य करणार नाही.‘‘
 

आमदार अमल महाडिक म्हणाले, ‘हद्दवाढीला आपला कायम विरोधच राहणार आहे. शहराच्या विकासासाठी आम्ही सर्व आमदार नेहमीच पुढाकार घेतो. शहराला वेगवेगळ्या योजनांमधून निधी मिळाला पाहिजे. यासाठी पाठपुरावा करत आहे. जसा ग्रामीण भाग सुधारला पाहिजे, तसे शहरही सुधारले पाहिजे; पण तोडफोड करून किंवा हिंसक मार्ग अवलंबून आम्ही कोणतेही काम करणार नाही. यासाठी न्यायिक बाजू घेऊनच हद्दवाढी विरोधाची लढाई लढली जाईल.‘‘
 

आमदार सुजित मिणचेकर म्हणाले, ‘कोणत्याही परिस्थिती हद्दवाढ होऊ देणार नाही. शहराच्या सोयी-सुविधांसाठी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासोबत आमदार चंद्रदीप नरके व आपण स्वत: विधानभवनासमोर आंदोलन केले आहे; पण शहर हद्दवाढ करताना त्यांनीही शहरातील परिस्थितीचा आढावा घेऊन हद्दवाढीची मागणी केली पाहिजे.‘‘
 

माजी आमदार संपतराव पवार-पाटील म्हणाले, ‘हद्दवाढीची शहराला आवश्‍यकता नाही. महापालिकेच्या नेत्यांना आहे. त्यामुळेच उठाठेव केली जात आहे. लोकांची बाजू मांडली म्हणून महापालिकेचे पदाधिकारी आमच्या तीन आमदारांचा निषेध करतात; पण आम्हाला त्यांचा निषेध करायचा नाही. कारण हे शहर आमचेही आहे; पण निषेध करण्याचा मुर्खपणा आम्ही करणार नाही. 40 वर्षांपासून हद्दवाढ झाली नाही, हे सांगणाऱ्यांना चाळीस वर्षांत शहराला काय दिले? याचाही आढावा घ्यावा. एवढ्या मोठ्या शहरात त्यांना केशवराव भोसले नाट्यगृहाव्यतिरिक्त दुसरे नाट्यगृह उभारता आले नाही. भोसले नाट्यगृहाची दैनीय अवस्था किती तरी वर्ष आपण पाहिली आहे. यात अतिरिक्त गावे घेऊन करणार काय? हाच मोठा प्रश्‍न आहे. त्यामुळे शहराचे गावात होणारे अतिक्रमण रोखलेच पाहिजे.‘‘
 

नाथाजीराव पवार म्हणाले, ‘हद्दवाढ लोकांविरुद्ध लादू नये. महापालिकेने केलेले कृषक-अकृषचे सर्वेक्षण चुकीचे आहे. ते नव्याने झाले पाहिजे. कोण तरी म्हणतोय म्हणून "चला हद्दवाढ करा‘ असे होऊ नये. हद्दवाढ ही काही लोकांचा खेळ आहे. ज्यांनी शहर संपवे तेच आता गावे संपवायला निघाले आहेत. हद्दवाढ करताना शासनाने याचाही विचार केला पाहिजे.‘‘
 

कुंभी बॅंकेचे अध्यक्ष अजित नरके म्हणाले, ‘हद्दवाढ करताना ग्रामविकास खात्याचीही मदत घ्यावी. गावांना किती निधी मिळतो, याबाबत माहिती घेऊन निर्णय घेतला पाहिजे.‘‘
 

भाजपचे संघटनमंत्री बाबा देसाई म्हणाले, ‘महापालिकेचे मूळ दुखणे बाजूला राहिले आहे. महापालिकेत बसून आमदारांची मापे काढली जात आहे. महापालिकेला भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे. ती आता गावांत पसरू नये. ग्रामपंचायतींकडून चांगला कारभार केला जात आहे. याचा विचारही शासनाने करावा.‘‘ शिवसेना महिला जिल्हाप्रमुख शुभांगी पवार म्हणाल्या, ‘शहराचे गावात होणारे अतिक्रमण चालू देणार नाही. शिवसेनेची ग्रामीणमधील सर्व ताकद हद्दवाढविरोधी कृती समितीच्या मागे उभी केली जाईल.‘‘ यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, एस.आर. पाटील, बाजीराव पाटील, मधुकर जांभळे आदी उपस्थित होते.

महापालिकेची श्‍वेतपत्रिका काढा :
हद्दवाढीचे समर्थन करणाऱ्यांनी पहिल्यांदा महापालिकेच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या रिकाम्या जागा होत्या, त्यांच्यावर आरक्षण होती, अशा जागांचे आरक्षण टाकण्यापूर्वी मालक कोण होते? आरक्षण उठल्यानंतर त्या जमिनी कोणी घेतल्या, याची महापालिकने श्‍वेतपत्रिका काढावी. त्यानंतर हद्दवाढीचा हट्टाहास कोणाचा आहे हे उघड होईल, असेही खासदार शेट्टी यांनी आवाहन केले.

शेतकऱ्यांच्या जमिनीवर डोळा :
शहरातील जमीन संपल्यानंतर आता काहीही शिल्लक नाही. त्यामुळे शहराशेजारी असणारी गावे घेऊन शेतकऱ्यांच्या जमिनीवर डोळा ठेवून काही नेते हद्दवाढीसाठी सक्रीय झाले असल्याची टीकाही खासदार शेट्टी यांनी केली.

आमची गटारे तुंबलेलीच
शहराचे लोकप्रतिनिधी म्हणतात, की नरकेंच्या घराजवळील गटारी तुंबवा म्हणजे त्यांना कळेल; पण त्या लोकप्रतिनिधींनी स्वत: पाहावे आमच्या घराजवळचे गटार तुंबवावे लागत नाही, ते कायम तुंबलेलेच असते, असे आमदार नरके यांनी सांगितल्यावर हशा पिकला.

दहा टक्के कामाची शंभर टक्के प्रसिद्धी
टोलच्या आंदोलनात काही लोकप्रतिनिधींनी दहा टक्केच काम करून शंभर टक्के प्रसिद्धी मिळवली. आम्हाला तसे जमत नाही, हे आमचे चुकतयच म्हणावे लागेल, असे आमदार नरके यांनी सांगितले.

शिवाजी पुलावरून तुम्ही पन्हाळ्यावर आपल्या फार्म हॉऊसवर जसे जाता. तसे ग्रामीणमधील लोकही शहरासह आपल्या कामासाठी येतात. शिवाजी पूल वाहतुकीसाठी खुला केला याचा फायदा ग्रामीणमधीलच लोकांना झाला असा नाही, तर शहरातील लोकांनाही झाला; पण शहरी आणि ग्रामीण जनतेत भेदभाव करून तेढ निर्माण करणाऱ्या महापालिकेच्या नेत्यांना हे समजले पाहिजे, असे आमदार नरके यांनी सांगितले.

माजी महापौर, नगरसेवक नाईलाज म्हणून आंदोलनात
शहरात सुविधांची वाणवा आहे. हे जगजाहीर आहे. तरीही, हद्दवाढ करून कोणता विकास होणार नाही, त्यामुळे अनेक माजी महापौर व नगरसेवक नाईलाज म्हणून आंदोलनात उतरलो असल्याचे सांगत असल्याचे आमदार नरके यांनी नमूद केले.

हद्दवाढील ग्रामीण भागात तीव्र विरोध आहे. हद्दवाढ करावी की नको, यासाठी शहर आणि ग्रामीणमधील जनमत चाचणी घ्यावी. जनमत चाचणी घेतल्यास प्रस्तावित गावांतील एकाही नागरिकाचा हद्दवाढीसाठी होकार मिळणार नसल्याचेही श्री. पवार यांनी सांगितले.

लाटकरांनी काय दिवे लावले
राजू लाटकारांनी शहरात काय दिवे लावले. गावाचे गावपण त्यांना काय समजणार. शहरात बसून गाव काबीज करण्याच्या प्रवृतीला आळा घातला पाहिजे, असे आवाहन शिरोलीचे उपसरपंच गोंविद घाटगे यांनी केले.

रस्ता जाम : हद्दवाढीला विरोध करण्यासाठी आलेल्या 18 गावांतील नागरिकांमुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच संपूर्ण रस्ता गर्दीने जाम झाला. यावेळी, हद्दवाढ पाहिजे म्हणणाऱ्यांनी ही गर्दी पाहूनच आपला निर्णय थांबवावा, अशी भावना उपस्थितांमधून व्यक्त होत होती.

18 गावांनी केले हद्दवाढ विरोधाचे ठराव
हद्दवाढीला विरोध करण्यासाठी शिये, वडणगे, सरनोबतवाडी, गोकुळ शिरगाव, पाचगाव, उजळाईवाडी, कळंबे तर्फ ठाणे, शिरोली, शिंगणापूर, गडमुडशिंगी, नागाव, मोरेवाडी, नवे बालिंगे, उचगाव, वाडीपीर, नागदेववाडी, वळीवडे व गांधीनगर या 18 गावांनी हद्दवाढीला विरोध करणारे ठराव काल (ता. 15) झालेल्या ग्रामसभेत केले आहेत. 15 ऑगस्टला झालेल्या ग्रामसभेला सर्वोच्च स्थान आहे. त्यानुसार या सभेत झालेले ठराव हे सर्वोच्च आहेत. याचा विचार शासन जरूर करेल, असे आमदार नरके यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com