डॉक्टर नव्हे; हा तर क्रुरकर्मा...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑगस्ट 2016

मंगल जेधे खून प्रकरणाला वेगळे वळण; चार मृतदेह सापडले; जिल्ह्यात खळबळ

मंगल जेधे खून प्रकरणाला वेगळे वळण; चार मृतदेह सापडले; जिल्ह्यात खळबळ
वाई - अंगणवाडी सेविका संघटनेच्या राज्य अध्यक्षा मंगल जेधे खून प्रकरणातील आरोपी संतोष पोळ सिरियल किलर असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. त्याने एका पुरुषासह आणखी पाच खून केल्याची कबुली दिली आहे. त्यातील चौघांचे पुरलेले मृतदेह पोलिसांनी बाहेर काढले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) संयमाने केलेल्या तपासाने जिल्ह्यातील आजवरचा सर्वांत मोठा गुन्हा उघडकीस आला आहे. मिसिंगच्या गुन्ह्याचा गांभीर्याने तपास न केल्याने संतोषचे धाडस वाढले आणि पहिला खून केल्यानंतर 13 वर्षे तो मोकाट राहिल्याचेही या घटनेतून समोर येत आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
 

सुरेखा किसन चिकणे (वय 30, रा. वडवली, ता. वाई), वनिता नरहरी गायकवाड (वय 40), जगुबाई लक्ष्मण पोळ (वय 40, रा. धोम, ता. वाई), नथमल धनाजी भंडारी (वय 68, रा. ब्राह्मणशाही, वाई) व सलमा शेख (रा. वाई) अशी संतोष पोळने खून केलेल्यांची नावे आहेत. वनिता गायकवाड यांचा मृतदेह धोम कालव्यात फेकल्याचे संतोष पोळने पोलिसांना सांगितले. तसेच सुरेखा चिकणे यांचा मृतदेह धोम येथील त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागे, तर जगाबाई पोळ, नथमल भंडारी आणि सलमा शेख यांचे मृतदेह पोल्ट्री फार्मच्या पाठीमागील मोकळ्या जागेत पुरून ठेवल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार त्याने रविवारी ठिकाणेही दाखविली.
 

काल पोलिसांनी जेसीबी मशिन आणि वाई पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने चारही मृतदेह बाहेर काढले. या वेळी पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार, उपअधीक्षक खंडेराव धरणे, पोलिस निरीक्षक विनायक वेताळ, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक निरीक्षक तृप्ती सोनावणे, प्रांताधिकारी अस्मिता मोरे, तहसीलदार अतुल म्हेत्रे, उपनिरीक्षक शिरीष शिंदे आदी उपस्थित होते. मृत व्यक्तींच्या हाडांचे सांगाडे पुणे येथील न्याय सहायक वैद्यक प्रयोगशाळेत डीएनए तपासणीसाठी पाठवून त्याबाबत अभिप्राय घेण्यात येणार आहे.

पहिला बळी सुरेखा चिकणे
संतोष पोळने पहिला खून सुरेखा चिकणे यांचा केला. त्या 23 मे 2003 रोजी बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर वनिता गायकवाड या 12 ऑगस्ट 2006 रोजी बेपत्ता झाल्या. जगाबाई पोळ या त्याच्या चुलत चुलती आहेत. त्या 15 ऑगस्ट 2010 रोजी गायब झाल्या होत्या. नथमल भंडारी 10 डिसेंबर 2015 रोजी, तर सलमा शेख ही नर्स 17 जानेवारी 2016 रोजी गायब झाली होती. यातील सलमा शेख यांना नातेवाईक नसल्याने त्यांची बेपत्ता झाल्याबाबत तक्रार नाही. मात्र, इतर चौघांच्या बेपत्ता झाल्याबाबत वाई पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल आहेत.

मिसिंगच्या गुन्ह्याकडे दुर्लक्ष
मिसिंगच्या गुन्ह्याचा पोलिस फारशा गांभीर्याने तपास करत नाहीत. नातेवाईकांनीच शोध घेतला तर, कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करण्याचेच काम पोलिसांकडून होत असते. मात्र, त्यामुळे एखादा आरोपी सिरियल किलर बनू शकतो. अनेकांना आपला जीव गमवावा लागतो, हे या घटनेने पुढे आले आहे. सुरेखा चिकणे यांच्या मिसिंगचा तपास पोलिसांनी सखोल केला असता तर, संतोष पोळ 13 वर्षे मोकाट राहिला नसता. पुढचे बळी त्यामुळे टळले असते. पोलिस दलाने यातून बोध घेणे आवश्‍यक आहे.

पोळचे दबावतंत्र
आरोपी पोळ याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तसेच सखोल तपास होऊ नये, यासाठी वेळोवेळी दबावतंत्राचा वापर केला. मंगल जेधे या सोने डबल करून देतो, असे सांगून माझ्याकडून 20 तोळे सोने घेऊन गेल्या, असा खोटा तक्रारी अर्ज त्याने स्थानिक गुन्हे शाखेकडे केला होता. त्याचबरोबर 24 जून 2016 रोजी अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याचा खोटा बनावही केला होता. त्याची साथीदार ज्योती मांढरे हिने त्याच्या सांगण्यावरून वाई येथील फौजदारी न्यायालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. वाई पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनायक वेताळ यांच्या विरोधातही त्याने तक्रार केली होती. त्यांना कुठे ना कुठे अडकविण्याचा प्रयत्न तो करीत होता.

एलसीबीचा संयम आणि धाडस
बेपत्ता महिलांच्या तपासामध्ये यापूर्वी वाई पोलिसांचा संतोष पोळवर संशय होता. दोन प्रकरणात त्याचा जबाबही घेण्यात आला. मंगल जेधे प्रकरणातही त्याची चौकशी झाली; परंतु लाचखोरीच्या कारवायांत अडकवतो, तक्रारी करतो म्हणून वाई पोलिसांमध्ये त्याची भीती बसली होती. त्यामुळे या प्रकरणांमध्ये खोलवर हात घालण्यास ते कचरत होते. मात्र, एलसीबीचे पद्‌माकर घनवट व त्यांच्या उपनिरीक्षक रमेश गर्जे, प्रसन्न जराड, सहायक फौजदार सुरेंद्र पानसांडे, हवालदार मोहन घोरपडे, उत्तम दबडे, त्रिंबक अहिरेकर, विजय कांबळे, शरद बेबले, रामा गुरव या पथकाने मंगल जेधे खून प्रकरणाचा मागोवा सोडला नाही. तब्बल दोन महिने या प्रकरणावर ते बारकाईने लक्ष ठेवून होते. संपूर्ण माहिती गोळा केल्यानंतर त्यांनी संतोष पोळला हात घातला. त्यांना अधीक्षक पाटील यांनी खंबीर साथ दिली. त्यामुळे एलसीबीने दाखवलेल्या धाडसाने सहा खून उघडकीस येण्यास मदत झाली.

नागरिकांची गर्दी
संतोष पोळने पाच खून केल्याचे समोर आल्यानंतर कालपासूनच वाई पोलिस ठाणे व धोम परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. आजही त्याला पाहण्यासाठी तसेच विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील येणार असल्याने वाई पोलिस ठाण्यात नागरिकांची गर्दी होती. बेपत्ता झालेल्या व्यक्तींचे कुटुंबीय, नातेवाईक, विविध राजकीय पक्षांचे व संघटनांच्या कार्यकर्त्यांचा त्यात समावेश होता. संतोष पोळला कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, दुपारी विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. नांगरे-पाटील यांनी वाई पोलिस ठाणे व धोम येथे घटनास्थळाची पाहणी केली. संशयित संतोष पोळकडेही त्यांनी चौकशी केली.

खुनामागील नेमक्‍या कारणांचा शोध सुरू
संतोष पोळ व त्याची साथीदार ज्योती मांढरे या दोघांनी पाच महिला आणि एक पुरुष अशा एकूण सहा व्यक्तींचा खून केला आहे. परंतु, या खुनांमागील नेमके कारण काय, या खुनांमध्ये अन्य कोणाचा सहभाग आहे काय, तसेच अन्य कोणाचा खून केला आहे का? याबाबत पोलिस कसून तपास करीत आहेत. जमिनीच्या विक्रीच्या प्रकरणात त्याने चुलत चुलती जगाबाई पोळ यांचा खून केल्याचे समोर येत आहे. इतर खुनांमागे सोने, पैशाचे आमिष, अनैतिक संबंध लपविणे अशी विविध कारणे समोर येत आहेत. परंतु, प्रत्येक खुनामागची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

अन्य बेपत्ता व्यक्तींबाबतही चौकशी
‘अत्यंत संवेदनशील असा हा गुन्हा आहे, सर्व बाजूने पोलिस त्याचा कसून तपास करीत आहेत. खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. जमिनीच्या वादातून तसेच सोने व आर्थिक लाभातून त्याने हे कृत्य केले असावे. प्रत्येक गुन्ह्याचा सखोल तपास केल्यानंतर नेमके कारण समजू शकेल. डॉ. पोळ चलाख होता. प्रशासनावर दबावतंत्राचा वापर करायचा. त्यामुळे त्याची मोठी दहशत होती. तो खरंच डॉक्‍टर आहे का, याचा तसेच या गुन्ह्यांशी सर्व संबंधितांचा तपास करण्यात येणार आहे. वाई तालुका व जिल्ह्यातून 2003 पासून बेपत्ता झालेल्या व्यक्तींची त्याच्याकडे चौकशी करण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.‘‘

 

Web Title: Doctors not; This is the cruel karma ...