डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे काम सोमवारपासून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

इस्लामपूर - शहरातील गेले अनेक दिवस रेंगाळलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरणाचे काम लवकरच सुरू होण्याचा मार्ग आज मोकळा झाला. सोमवारपासून पुतळा सुशोभीकरणाचे काम सुरू करण्याचा निर्णय आज येथे घेतला.

इस्लामपूर - शहरातील गेले अनेक दिवस रेंगाळलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरणाचे काम लवकरच सुरू होण्याचा मार्ग आज मोकळा झाला. सोमवारपासून पुतळा सुशोभीकरणाचे काम सुरू करण्याचा निर्णय आज येथे घेतला.

नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुतळा सुशोभीकरण समितीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. प्रत्यक्ष जुन्या तहसील चौकातील पुतळ्याच्या ठिकाणी जाऊन सुशोभीकरणाच्या अर्धवट अवस्थेत असलेल्या कामाची पाहणी केली. बैठकीत कॉन्ट्रॅक्‍टरच्या कामाचे मूल्यमापन करणे, येत्या १४ एप्रिल २०१७ पर्यंत काम पूर्ण करणे, ठेकेदार काम करत नसेल अथवा दाद देत नसल्यास पर्यायी व्यवस्था करणे आदी विषयांवर चर्चा झाली.

गेले वर्षभर पुतळा सुशोभीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. दोन-तीन वेळा काम पूर्ण बंद पडले होते. आरपीआय, एमआयएम आणि दलित संघटनांशी संबंधित कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आंदोलन, निवेदन, मोर्चे या माध्यमातून पालिकेकडे पाठपुरावा केला होता. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि विकास आघाडी दोघांनी या कामाच्या पूर्तीचे आश्वासन दिले होते. आज हे काम विचारात घेऊन बैठक झाली आणि त्यात ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरल्याने पुतळा समिती सदस्यांनी समाधान व्यक्त केले.

बैठकीला समिती सदस्य प्राचार्य विश्वास सायनाकर, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, संजय कोरे, प्रा. सतीश चौगुले, मुकुंद कांबळे, संजय बनसोडे, जालिंदर कांबळे, अरुण कांबळे यांच्यासह पालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Dr ambedkar statue