दुष्काळी तालुके टंचाईच्या उंबरठ्यावर 

दुष्काळी तालुके टंचाईच्या उंबरठ्यावर 

सांगली - जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला. सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. मात्र परतीच्या पावसाने दांडी मारल्याने दुष्काळी तालुके पुन्हा टंचाईच्या उंबरठ्यावर आहेत. गतवर्षी डिसेंबरमध्येच टॅंकर सुरू झाले. यावर्षी जानेवारीपासूनच टॅंकरची मागणी सुरू झाली आहे. पाचपैकी चार मध्यम प्रकल्प कोरडेच आहेत. लघुप्रकल्पांमध्ये 26 टक्‍के पाणीसाठा असला तरी दुष्काळी तालुक्‍यांतील लघुप्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. 

जास्त पाऊस 
यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. सन 2015 मध्ये 70.1 टक्के पाऊस होता. तर 2016 मध्ये 119 टक्के पाऊस झाला. चांगला पाऊस झाल्याने टंचाई जाणवणार नाही, अशी आशा होती. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत अनुक्रमे 132, 200 व 137 टक्के पाऊस झाला. दोनवेळा कृष्णा नदी पुराच्या उंबरठ्यावर आली होती. 

परतीच्या पावसाची दांडी 
पहिल्या तीन महिन्यांतच वार्षिक सरासरी गाठल्याने परतीचा पाऊसही चांगला होईल, अशी आशा होती. मात्र सप्टेंबर व ऑक्‍टोबरच्या पावसाने दगा दिला. सप्टेंबर महिन्यात 94 टक्के पाऊस झाला. तर ऑक्‍टोबर जवळजवळ कोरडाच गेला. या महिन्यात 12 टक्के पाऊस झाला. दुष्काळी तालुक्‍यांला वरदान ठरणारा परतीचा मॉन्सून कोरडा गेल्याने जत, कवठेमहांकाळ, खानापूर तालुक्‍यांना टंचाईचा फटका बसणार आहे, अशी चिन्हे आहेत. आटपाडी, तासगाव या तालुक्‍यांत पावसाने सरासरी गाठली, तर जत आणि खानापूरमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. 

मध्यम प्रकल्प कोरडे 

जिल्ह्यात पाच मध्यम प्रकल्प आहेत. साठवण क्षमता 75.92 द. ल. घ. मी. आहे. चार प्रकल्प दुष्काळी तालुक्‍यांत असून ते सर्व आजमितीस कोरडेच आहेत. शिराळा तालुक्‍यातील मोरणा प्रकल्पात 65 टक्के पाणी आहे. गतवर्षीही चार प्रकल्प कोरडे होते. त्यातील तीन प्रकल्प जत तालुक्‍यातील, तर तासगाव तालुक्‍यातील एक प्रकल्प आहे. 

लघुप्रकल्पात 26 टक्के साठा 

जिल्ह्यात 79 लघुप्रकल्प आहेत. साठवण क्षमता 172.56 द.ल.घ.मी. आहे. मात्र सध्या 44.70 द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. हे 26 टक्के आहे. दुष्काळी तालुक्‍यांत असणारे लघुप्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. 54 तलाव दुष्काळी तालुक्‍यांत असून त्यातील 35 तलाव कोरडे पडलेत. तर उर्वरित तलावांत मार्चनंतर साठा राहण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळेच टॅंकरची मागणी वाढू लागली आहे. 

तासगाव तालुक्‍यातील 6 पैकी 2 तलाव कोरडे आहेत. तर खानापूर तालुक्‍यात 9 पैकी 5 कोरडे आहेत. कवठेमहांकाळ तालुक्‍यात 10 पैकी 6 तलाव कोरडे होण्याच्या मार्गावर आहेत. जतला 17 तलाव कोरडे पडलेत. वाळवा, शिराळा, मिरज आणि कडेगाव तालुक्‍यांत लघुप्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणी आहे. आटपाडीला टेंभूचा लाभ झाला. तेथे 13 पैकी 3 तलाव कोरडे आहेत. उर्वरित तलावांत चांगला साठा आहे. 

"म्हैसाळ'चे पाणी सोडा 

जत, कवठेमहांकाळ तालुक्‍याला टंचाईचा सामना करावा लागणार आहे. म्हैसाळचे पाणी सोडण्याची मागणी आहे. मात्र थकीत वीज बिलामुळे पाणी सोडण्यात अडचणी आहेत. परंतु थकीत वीज बिल भरण्याबाबत आणि वसुलीबाबतही गतवर्षीप्रमाणे मार्ग काढून पाणी सोडावे लागण्याची चिन्हे आहेत. तरच टंचाईचा सामना या दोन तालुक्‍यांना होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com