चला, साजरी करू कोरडी रंगपंचमी...! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

कोल्हापूर - यंदाही पाण्यात नव्हे तर कोरड्या रंगांत कोल्हापूर न्हाऊन निघणार आहे. गेल्या वर्षीच्या दुष्काळाच्या झळांचे सावट अजूनही दूर झालेले नाही. त्यामुळे कोणाच्याही तोंडचे पाणी पळवून सण साजरा करण्यापेक्षा रंगांच्या उधळणीला पसंती देऊन पाण्याच्या अतिवापरावर "पाणी' सोडू या आणि खऱ्या अर्थाने सहसंवेदना जपत सामाजिक बांधिलकीचे प्रत्यंतर घडवू या, असा निर्धार यंदाही विविध सेवाभावी संस्थांसह तरुण मंडळांनी केला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली असून तरुणाई त्यात आघाडीवर आहे. 

प्रत्येक वर्षी रंगपंचमीला लाखो लिटर पाण्यात डुंबणारे नागरिक दिसतात. पाण्याच्या बादल्यांनीच अनेक ठिकाणी रंगपंचमीला उधाण येते. हे चित्र आता खऱ्या अर्थाने बदलायला सुरवात झाली आहे. यंदा मार्चमध्येच उन्हाच्या झळा इतक्‍या वाढल्यात की पुढे दोन महिने तीव्र उन्हाची चाहूल लागली आहे. पाण्याअभावी राज्यात ठिकठिकाणी जगणे महाग होण्याची शक्‍यता असून, पाण्याची नासाडी न करता रंगपंचमी खेळावी, असे आवाहन आता सर्वत्र होऊ लागले आहे. कुठल्याही प्रकारच्या रासायनिक रंगाला पसंती न देता सहज जाणाऱ्या नैसर्गिक रंगांचा वापर करावा. त्यामुळे रंग धुण्यासाठीही कमी पाणी लागेल. महागड्या रंगांवरील खर्च कमी करून तो गरजूंना देता येईल, अशा विविध सूचना आणि त्याअनुषंगाने आवाहन पत्रकेही वितरित होत आहेत. 

बाजारपेठ सज्ज 
विविधरंगी पिचकाऱ्यांसह बाजारपेठ सज्ज झाली असली तरी यंदा नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक रंगांनाच अधिक पसंती मिळते आहे. बालमित्रांच्या हट्टाखातर पिचकाऱ्या खरेदी केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात पाण्याचा वापर कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. त्याशिवाय पिवडी आणि फुग्यांचा वापरही कमी होणार आहे. 

अशा आहेत विविध संकल्पना 
- यंदा रंगपंचमी न खेळता "व्हॉट्‌स ऍप'वर एकमेकांना रंगपंचमीवर आधारित विविध चित्रपटगीते शेअर करू आणि त्याचा आनंद लुटू. 
- आपल्याला रांगोळी, चित्र, कॅलिग्राफी, मेंदी अशा ज्या कलाकृती साकारता येतात, त्या साकारून अनोखी रंगपंचमी साजरी करू. 
- रंगपंचमीचा सण म्हणजे जल्लोष आणि पाण्याचा अतिवापर हे चित्र आता बदलायला हवे. सर्वांनी मिळून वनभोजन, एका दिवसाची सहल किंवा ट्रेकिंग असे उपक्रम घेऊनही आपल्याला रंगपंचमी एन्जॉय करता येईल. 
- ज्या तरुणाईच्या जोरावर आपण समर्थ भारताचे स्वप्न पाहतो आहोत, त्याच तरुणाईने आता सजग व्हायला हवे. त्याची सुरवात स्वतःपासून व्हायला हवी. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठीची सुरवात स्वतःपासून व्हायला हवी. "रंगपंचमी'सारखा दुसरा चांगला मुहूर्त कोणता? 

ऑनलाइन रंगोत्सव 
ऑनलाइन रंगोत्सवालाही आता बहार आला असून रंगोत्सवाचा संदेश देणारे मेसेजिस, व्हॉट्‌स ऍप स्टेटस, फेसबुक मेसेजिस, जिफ इमेजिसच्या असंख्य व्हरायटी ऑनलाइन उपलब्ध आहेत. 

Web Title: Dry holi celebrate