एनपीए वाढीमुळे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बरखास्त

तात्या लांडगे
बुधवार, 30 मे 2018

2016 पासून थकबाकी जैसे थे राहिल्याने रिझर्व बँकेच्या निर्देशानुसार सहकार आयुक्त विजय झाडे यांच्या आदेशानुसार जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून स्वतःकडे प्रशासकाचा पदभार स्वीकारला.
 

सोलापूर - माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सांगूनही जिल्हयातील कारखाने, खासगी व सहकारी संस्था तसेच शेतीच्या थकबाकीत मोठी वाढ झाली. 2016 पासून थकबाकी जैसे थे राहिल्याने रिझर्व बँकेच्या निर्देशानुसार सहकार आयुक्त विजय झाडे यांच्या आदेशानुसार जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून स्वतःकडे प्रशासकाचा पदभार स्वीकारला.

बँकेचा एसएलआर, सीआरएआर, बँकेचा नफा चांगला परंतु, दिवसेंदिवस एनपीए वाढत आहे. सध्या शेती कर्जाची थकबाकी 325 कोटी तर बिगर शेतीकडे 546 कोटींचे कर्ज थकले आहे. सध्या बँकेकडे 2 हजार 330 कोटींच्या ठेवी आहेत. बँकेचे कर्ज थकविण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बडया नेतेमंडळीच्या संस्थाचा समावेश आहे. सांगोला, आर्यन, विजय शुगर व स्वामी समर्थ कारखान्यांचा समावेश आहे.

सध्या बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात असून बँकेचे अध्यक्ष माजी आमदार राजन पाटील, उपाध्यक्ष जयवंतराव जगताप तसेच आमदार दिलीप सोपल, क जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, झेडपीचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील, बबनराव अावताडे, आमदार प्रशांत परिचारक, चंद्रकांत देशमुख, माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे, सुनंदा बाबर, रश्मी बागल, भारत सूतकर, आमदार सिध्दाराम म्हेत्रे, सुभाष शेळके, माजी खासदार रणजितसिंह मोहित- पाटील, आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार दिपक साळुंखे - पाटील यांचा संचालक म्हणून समावेश आहे.

2016 मध्ये 31.11 टक्के, 2017 मध्ये 31.58 टक्के तर 2018 मध्ये 39.37 टक्के एनपीए आहे. दोन -तीन वर्षे रिझर्व बँकेने संधी देवूनही थकबाकी जैसे थे आहे. नाबार्डच्या मागील दोन वर्षाच्या अहवालानुसार रिझर्व बँकेने कारवाई करण्याचे निर्देश दिले.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Due to the increase in NPA Solapur district central bank sacked