सांडपाण्याअभावी देगाव केंद्रातील वीजनिर्मिती रखडली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

सोलापूर - पुरेसे सांडपाणी उपलब्ध होत नसल्याने मिथेनपासून वीजनिर्मितीचा प्रकल्प रखडला आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. 

सोलापूर - पुरेसे सांडपाणी उपलब्ध होत नसल्याने मिथेनपासून वीजनिर्मितीचा प्रकल्प रखडला आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. 

महापालिकेच्या देगाव येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात मिथेन वायूपासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. मिथेन वायू किती प्रमाणात उपलब्ध होईल, त्यावर वीजनिर्मितीचे प्रमाण अवलंबून आहे. सध्या ८० क्‍युबेक इतका वायू उपलब्ध आहे, प्रत्यक्ष वीजनिर्मितासाठी किमान २०० ते २५० क्‍युबेक वायू असणे आवश्‍यक आहे. मात्र, शहरातील पाणीटंचाई यामुळे सांडपाण्यावर नियंत्रण आले आहे. त्याचाच परिणाम म्हणून मिथेन वायूसाठी आवश्‍यक प्रमाणात हे पाणी उपलब्ध होईनासे झाले आहे. 

महाराष्ट्र राज्य सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत सुमारे ७५ कोटी रुपयांचा सांडपाणी प्रकल्प उभारण्यात आला आहे. देगाव येथील मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले आहे. सध्या रोज ५० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. या ठिकाणी ‘टरशरी’ प्लॅन्टमधून एनटीपीसीला प्रक्रिया केलेले ७५ एमएलडी पाणी दिले जाणार आहे. त्या मोबदल्यात एनटीपीसीकडून रोख रक्कम घेतली जाणार आहे. प्रत्यक्ष वीजनिर्मिती सुरू झाल्यावर या प्रकल्पाला लागणाऱ्या विजेमध्ये ४० टक्के बचत होणार आहे. पर्यायाने महापालिकेच्या वीज बिलातही बचत होईल. देगाव येथे उभारण्यात आलेले केंद्र हे ७५ एमएलडी क्षमतेचे आहे. तर कुमठा आणि अक्कलकोट एमआयडीसी येथे अनुक्रमे १५ एमएलडी आणि १२ एमएलडी क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येत आहे.

पुरेशा प्रमाणात मिथेन उपलब्ध होत नसल्याने वीजनिर्मितीस अडथळे येत आहेत. मात्र, येत्या काही दिवसांत हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होईल, याची खात्री आहे.
- यू. बी. माशाळे,उपअभियंता, महापालिका