महालक्ष्मी मंदिरात नियोजन करणारी यंत्रणाच बोथट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - नवरात्रोत्सवानिमित्त महालक्ष्मीच्या दारात सर्वसामान्य भाविकांची फिकीरच नियोजन करणाऱ्या यंत्रणेला नसल्याचे अधोरेखित होत आहे. नियोजन करणारी सारी यंत्रणाच बोथट झाली असून, यंत्रणेमुळे सर्वसामान्य भाविकांची मात्र दर्शनाची परवड सुरू आहे. व्हीआयपी दर्शन सेवा मात्र व्यवस्थित सुरू होती. 

कोल्हापूर - नवरात्रोत्सवानिमित्त महालक्ष्मीच्या दारात सर्वसामान्य भाविकांची फिकीरच नियोजन करणाऱ्या यंत्रणेला नसल्याचे अधोरेखित होत आहे. नियोजन करणारी सारी यंत्रणाच बोथट झाली असून, यंत्रणेमुळे सर्वसामान्य भाविकांची मात्र दर्शनाची परवड सुरू आहे. व्हीआयपी दर्शन सेवा मात्र व्यवस्थित सुरू होती. 

बाहेरगावांवरून तसेच सर्वसामान्य भाविक मुख्य दर्शन मंडपात आल्यानंतर त्यांना कचऱ्यातूनच चालत पुढे जावे लागत होते. जागोजागी हा कचरा पडला होता. तुटलेले बॅरिकेडिंग पायाला लागत होते. अशा स्थितीत सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास येथील महिला व पुरुषांना सोडण्याच्या चुकीच्या नियोजनामुळे पुरुष भाविकांनी ‘साहेब, आता तरी सोडा...’ अशी विनवणी करत गोंधळही घातला. या ठिकाणी सकाळी महिलांची रांग १० ते १५ मिनिटे आणि पुरुष भक्तांची रांग केवळ २ ते ४ मिनिटे सोडण्यात येत होती. आज फारशी गर्दी नसतानाही या नियोजनामुळे दर्शनासाठी दीड ते दोन तास लागत होते. 

मुख्य दर्शनमंडपातून आत जाण्यासाठी पाऊण ते एक तास आणि पुढे साक्षीविनायक गणपती येथून आत गेल्यानंतर सटवाई मंदिराच्या गेटमधून व्हीआयपी सेवेचे भक्त येत होते. त्यामुळे मुख्य दर्शनमंडपातील रांग खोळंबत होती. सरस्वती मंदिर येथून व्हीआयपी सेवेचे भक्त आल्याने घंटा चौकातील जय-विजयजवळ मुख्य रांग खोळंबत होती. 

दरम्‍यान, सटवाई व सरस्‍वती मंदिरात सीसीटीव्‍ही कॅमेरे का बसवले नाहीत याचाही विचार होण्याची गरज आहे. महालक्ष्मी मंदिर सर्वसामान्य भक्तांचे आहे, की व्हीआयपी भक्तांचे, असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे. आज मुख्यमंत्र्यांकडे तक्रार झाली तरी आम्ही काहीही करू असे दाखवत, आत शनी मंदिर, सरस्वती मंदिरातून बाहेर पडण्याचा मार्ग, सटवाई मंदिर गेट येथून व्हीआयपी सेवा सुरूच ठेवली. यावरून नियोजन करणारी यंत्रणा बोथट झाल्याचेच दिसत आहे. 

महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखड्यात तर कायमस्वरूपी दर्शनमंडप उभा करण्याचा घाट घातला आहे. 

व्हीआयपी कोण?
महालक्ष्मी मंदिरातील पोलिस ओळखीने सोडतात ते व्हीआयपी. देवस्थानमध्ये कोणीही फोन करतो आणि सांगतो तो व्हीआयपी. अनेकांची कनेक्‍शन असलेली माणसे जातात ते व्हीआयपी. व्हीआयपी म्हणजे कोण? त्याची यादी काय? हे आधी निश्‍चित करा, असे सांगण्याची वेळ आली आहे. कारण मंदिराच्या बाकीच्या प्रश्‍नांवेळी हे व्हीआयपी कधीही येत नाहीत; पण आता पोलिस आणि देवस्थानला ही व्हीआयपी सेवा देण्याचा कळवळा का येत आहे? वास्तविक तुम्ही सर्वसामान्य भाविकांची आधी दर्शनाची सोय करा आणि मग ही सेवा करण्याचा विचार केल्यास अधिक चांगले होईल.

...की अन्य कोणासाठी?
पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्षपद जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. जिल्ह्याची सारी यंत्रणा त्यांच्या आदेशानुसार चालते. पोलिस दलाचे प्रमुख जिल्हा अधीक्षकांच्या आदेशाने सारे पोलिस दल काम करते. वास्तविक ही दोन्ही पदे सर्वसामान्य माणसाला सुरक्षित असे वातावरण करणे किंवा त्यांच्यासाठी सेवा करण्यासाठी आहे; परंतु पाच दिवसांपासून सुरू असलेली सर्वसामान्य भक्तांची परवड या यंत्रणेला दिसत नाही किंवा सर्वसामान्य भक्तांकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवले असावे.