दसरा मेळाव्यावरून भगवानगडावर तणाव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016

पाथर्डी - ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना भगवानगडावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यासाठी गेलेल्या मुंडेसमर्थकांना भेटण्यास गडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री सानप यांनी आज नकार दिला. परिणामी गडावर सायंकाळी तणाव निर्माण झाला. पोलिसांनी मध्यस्थी करीत दोन्ही बाजूंच्या समर्थकांची समजूत घालून परिस्थिती आटोक्‍यात आणली. 

भगवानगडावर दसरा मेळावा व्हावा, या मागणीसाठी मुंडेसमर्थकांचा आप्पासाहेब राजळे सभागृहात आज मेळावा झाला. त्यात अनेक वक्‍त्यांनी पंकजा मुंडे यांना गडावर मेळावा घेऊ देण्याची मागणी केली. गडाच्या महंतांनी समाजाचा विचार करून मेळावा न घेण्याचा निर्णय मागे घ्यावा, असे मतही त्यांनी आग्रहाने मांडले. 

ही भूमिका डॉ. नामदेवशास्त्री यांच्यापर्यंत पोचविण्यासाठी मेळाव्याला उपस्थित कार्यकर्ते सायंकाळी भगवानगडावर गेले. त्यात माजी आमदार गोविंद केंद्रे, केशव आंधळे, दगडू पाटील बडे, फुलचंद कराड, दशरथ वनवे, सर्जेराव तांदळे, दिनकर पालवे, रामदास गोल्हार आदींचा समावेश होता. 

गडावर आधीच जमलेल्या नामदेवशास्त्री समर्थकांनी मुंडेसमर्थकांना गडाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच अडविल्याने तणाव निर्माण झाला. सुमारे तासाभरानंतर मुंडेसमर्थकांनी प्रवेशद्वारातून प्रवेश केला. त्या वेळी शास्त्रीसमर्थकांनी भगवानबाबांचा जयघोष केला. मुंडेसमर्थकांपैकी दोन जण नामदेवशास्त्री यांना भेटतील, असे आधी सांगण्यात आले. नामदेवशास्त्री यांनी नंतर मात्र "मी कोणालाही भेटणार नाही. मेळावासमर्थकांनी माझ्या समर्थकांकडे किंवा प्रशासनातील अधिकाऱ्याकडे निवेदन द्यावे,‘ असा निरोप पाठविल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गडावर पुन्हा तणाव निर्माण झाला. तो रात्री उशिरापर्यंत कायम होता. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त होता.