भूकंपसदृश धक्‍क्‍याने संगमनेर परिसर हादरला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

आश्‍वी (ता. संगमनेर) - रविवारी (ता. 8) बसलेल्या दोन हादऱ्यांनंतर सोमवारी (ता. 9) पहाटे चार वाजून 22 मिनिटांनी पुन्हा बसलेल्या भूकंपसदृश धक्‍क्‍याने संगमनेर तालुक्‍याच्या पठार भागाला जोरदार हादरा बासला.

आश्‍वी (ता. संगमनेर) - रविवारी (ता. 8) बसलेल्या दोन हादऱ्यांनंतर सोमवारी (ता. 9) पहाटे चार वाजून 22 मिनिटांनी पुन्हा बसलेल्या भूकंपसदृश धक्‍क्‍याने संगमनेर तालुक्‍याच्या पठार भागाला जोरदार हादरा बासला.

संगमनेर तालुक्‍याच्या पठार भागातील बोटा परिसरातील गावांना भूगर्भातील हालचालींमुळे बसणाऱ्या भूकंपसदृश धक्‍क्‍यांमुळे येथील नागरिकांत घबराट पसरली आहे. बोटा, माळवाडी, आंबी दुमाला, कुरकुटवाडी, आळेखिंड या परिसरातील गावांना या धक्‍क्‍यांची तीव्रता अधिक जाणवली. याशिवाय शेजारील जुन्नर तालुक्‍यातील आळे, संतवाडी, आळेफाटा या ठिकाणीही धक्के जाणवल्याने ग्रामस्थ थंडीची पर्वा न करता घराबाहेर पडले होते.

भूगर्भातील या सर्व हालचालींची नोंद नाशिक येथील मेरी संस्थेच्या भूकंपमापक यंत्रावर झाली आहे. त्यांच्या अहवालानुसार रविवारी सायंकाळी 6.29 वाजता जाणवलेला धक्का 50 सेकंद टिकला, त्याची तीव्रता 2.3 रिश्‍टर स्केल असून, त्याचा केंद्रबिंदू नाशिकपासून 24 किलोमीटर अंतरावर होता. दुसरा धक्का रात्री 8.46 वाजता बसला. त्याचा कालावधी 50 सेकंद होता. त्याचा केंद्रबिंदू नाशिकपासून 93.6 किलोमीटर अंतरावर होता, तर तीव्रता 2.3 रिश्‍टर स्केल इतकी होती. या धक्‍क्‍यातून ग्रामस्थ सावरत असतानाच, आज पहाटे 4.22 वाजता रविवारच्या धक्‍क्‍यांपेक्षा अधिक क्षमतेचा मोठा धक्का जाणवला. याचा कालावधी सुमारे 118 सेकंद होता, तर तीव्रता 2.8 रिश्‍टर स्केल होती. याचा केंद्रबिंदू नाशिकपासून 84 किलोमीटर अंतरावर नारायणगावजवळ असल्याचे मेरी संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.

संगमनेर तालुक्‍याचा हा भाग कोकणकड्यापासून सुरू होणाऱ्या डेक्कन ट्रॅपमध्ये आहे. यात प्रस्तरभंग, पावसाचे भूगर्भात जिरलेले पाणी आतील निर्वात पोकळ्यांमध्ये साठणे, तीव्र उन्हाळा, हिवाळा अशा ऋतूंच्या परिणामामुळे खडकांचे होणारे आकुंचन व प्रसरण, पाण्याचा उपसा अशा अनेक कारणांमुळे भूगर्भात हालचाली होतात. भूगर्भात साचलेले वायू बाहेर येण्यासाठी मार्ग शोधतानाही अशा प्रकारे धक्के जाणवतात. यावर अधिक सखोल संशोधन होण्यासाठी आजवरच्या सर्व माहितीचे संकलन नागपूरच्या भूकंप विश्‍लेषण संस्थेकडे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठवण्यात आले आहे. या परिसरातील ग्रामस्थांनी जुन्या दगडी बांधणीच्या घरांऐवजी, पक्‍क्‍या घरांचा आश्रय घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.