इजाज बनला 'युनिसेफ'चा ब्रॅंड ऍम्बॅसडर...!

इजाज बनला 'युनिसेफ'चा ब्रॅंड ऍम्बॅसडर...!

मुंबई - राजभवनात अहवाल सादरीकरणानंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्य सचिव स्वाधिन क्षेत्रीय, ‘युनिसेफ‘ च्या राजेश्‍वरी चंद्रशेखर यांच्यासह इजाज अन्सारी, राधा शिंदे, सरिता सुतार, आशालता कांझर, दीपाली कुंभार आदी.

कोल्हापूर - इजाज इस्माईल अन्सारी... महापालिका शाळेचा विद्यार्थी आणि मजुराचा मुलगा... शाळेत आल्यापासून तो इतका आक्रमक की, प्रत्येकाला दादागिरी करणे हा त्याचा जणू छंदच. दोन वर्षांत शाळेतील शिक्षकांनी त्याचे समुपदेशन केले. मीना-राजू मंचचा तो सदस्य बनला आणि हळूहळू त्याच्या वर्तणुकीत बदल घडू लागला. त्याचा आक्रमकपणा हाच नेतृत्व गुण बनला. तो वर्ग सेक्रेटरी झाला आणि उत्कृष्ट कबडीपटूही झाला. नुकतीच त्याची राज्यभरातील महापालिकेच्या शाळेतून "युनिसेफ‘ने एकमेव निवड केली. तो राजभवनात गेला आणि धडधडीत भाषण करून आपल्यातील बदलाची यशोगाथाही त्याने उलगडली. "युनिसेफ‘ने "द स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रेन‘ हा विशेष अभ्यासपूर्ण अहवाल शासनाला सादर केला आहे. या निमित्ताने इजाजला खास मुंबईला निमंत्रित करण्यात आले.

योग्य वेळी योग्य काळजी न घेतल्याने किंवा वेळीच खबरदारी न घेतल्याने 2030 पर्यंत जगभरातील पाच वर्षाखालील 69 दशलक्ष मुले मृत्युमुखी पडू शकतात तर 167 दशलक्ष मुलांवर दारिद्य्रात जगण्याची वेळ येऊ शकते. त्याशिवाय तब्बल 750 दशलक्ष मुली बालवयातच लग्नाच्या बेडीत अडकू शकतात. त्यामुळे आत्ताच योग्य मार्गाचा अवलंब केला तर त्यांचे भाग्य बदलू शकते, असा हा अहवाल असून त्याचे राजभवनात सादरीकरण करताना दोन यशोगाथा सर्वांसमोर ठेवायच्या होत्या. त्यासाठी "युनिसेफ‘ने राज्यभरातील शाळांतून वर्तनात बदल घडलेल्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा मागवल्या होत्या. त्यातून मुलांमध्ये इजाजची निवड झाली. इजाज हा कॉम्रेड गोविंद पानसरे, राजोपाध्येनगर या महापालिका शाळेतील सातवीचा विद्यार्थी आहे. मुलींत जालना येथील कस्तुरबा गांधी विद्यालयात बारावीला शिकणाऱ्या राधा शिंदे हिची निवड केली होती.

महापालिकेच्या शाळांत मीना-राजू मंचच्या समन्वयक म्हणून सरिता सुतार यांनी विविध उपक्रम यशस्वी केले आहेत. इजाजसह त्यांचाही राज्यपालांच्या हस्ते सत्कार झाला. पानसरे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशालता कांझर, वर्गशिक्षिका दीपाली कुंभार यांनाही अहवाल सादरीकरणावेळी निमंत्रित केले होते. आयुक्त पी. शिवशंकर, प्रशासनाधिकारी प्रतिभा सुर्वे यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि शाळा व्यवस्थापनाचे पाठबळ मिळाल्याने उपक्रम अधिक व्यापक होत असल्याचे सौ. सुतार यांनी सांगितले.

अहवालातील काही मुद्दे
- गरिबीत जगणाऱ्या लोकांचे प्रमाण निम्म्याने कमी
- पाच वर्षाखालील बालमृत्यूचे प्रमाण आजही दुप्पट
- 2011 नंतर शाळेत न जाणाऱ्या मुलांचे प्रमाण वाढले
- जगभरातील 124 दशलक्ष मुले आजही शाळेपासून दूर
- प्रति पाच विद्यार्थ्यांपैकी दोन मुले वाचन, लेखनात अप्रगत

अहवालाची दखल
राज्य शासनाकडून या अहवालाची दखल घेतली जाणार असल्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सांगितले. राष्ट्रीय ईसीसीई 2013 च्या धर्तीवर राज्याचे ईसीसीई धोरण बनवत असून त्याच्या अंमलबजावणीनंतर सकारात्मक बदल नक्कीच दिसतील, असे राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षेत्रीय यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com