"सोशल'वर निवडणूक वेगळ्या उंचीवर 

शैलेश पेटकर- सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

सांगली - फेसबुक, व्हॉटस्‌ ऍप या सोशल साइटच्या भिंतींचे रंग बदलायला लागलेत. जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकींचा फड तिथे रंगू लागलाय. पुन्हा लाट चालणार की बाजीगरांची वाट लागणार...असं सारं काही जोराजोरात वाजायला लागलं आहे. पाच प्रमुख पक्षांचा धुमाकूळ सुरू आहे. यात विकासाचा मुद्दा मात्र दूरच राहिला आहे. एकमेकांच्या खेचाखेचीवर नेटीझन्स्‌चा भर दिसतोय. 

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत प्रचाराचे प्रभावी माध्यम ठरलेल्या फेसबुक, व्हॉटस्‌ ऍपची क्रेझ वाढत आहे. सारेच उमेदवार टेक्‍नोसॅव्ही बनत चाललेत. स्वतः, कार्यकर्त्यांच्या जोरावर प्रचाराचा धुरळा सोशल साइटवर उडतोय. प्रचाराला काहीच दिवस हाती असल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी यंत्रणा राबवली जात आहे. प्रत्येकाच्या तळहातावर दुसऱ्या क्षणाला सभा भरू शकते. तळहात हेच व्यासपीठ, एका माणसाची उपस्थिती हीच गर्दी आणि त्याने मेसेज फॉरवर्ड केला हेच यश. सारी गणिते, समीकरणे बदलताना दिसत आहेत. सोशल साइटचे महत्त्व वाढलेले होतेच, आता सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढायला सज्ज झाल्यानंतर या सोशल लढ्याने वेगळीच उंची गाठली आहे. 

पुन्हा एकवार मोदी लाटेवर स्वार व्हायला भाजपने ताकद लावली आहे. भगव्या शूरांनी पहिले टार्गेट भाजपलाच केले आहे. 

जिल्हा परिषद राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असली तरी कॉंग्रेसकडूनच त्यांची उणीदुणी काढली जात आहेत. त्यामुळेच प्रचाराचा फड रंगलाय. गावोगावी पारावरच्या चर्चा आता व्हॉटस्‌ ऍपच्या ग्रुपवर आल्या आहेत. प्रत्येक उमेदवार नवे फंडे शोधतो आहे. कल्पनाशक्तीला धार लावली जातेय. काही गावात मात्र भावनिक सादही घातली जात आहे. या गावच्या विकासाचा मुद्दा मात्र कुणीही ठामपणे मांडताना दिसत नाही. केवळ पूर्वीच्या शिलेदारांची खेचाखेचीच केली जात आहे. नोटाबंदीचा मुद्दा मात्र विरोधक प्रभावीपणे मांडताना दिसत आहेत. या साऱ्यात सोशल साइटचा कितपत फायदा उमेदवारांना होणार, हे निकालानंतर स्पष्ट होईल. मात्र, सध्या तरी सोशल साइटवर फड रंगू लागलेत.

Web Title: Election of a different height