दिवाळी सण मोठा, नाही प्रचाराला तोटा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

जयसिंगपूर - दिवाळीच्या तोंडावर पालिका निवडणुकीची धांदल सुरू असल्याने मतदारांना सोशल मीडियावरून शुभेच्छा देण्यासाठी इच्छुकांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. प्रभागातील मतदारांचे वॉटसऍप ग्रुप करून दररोज दिवाळीच्या शुभेच्छांसह शुभप्रभात आणि शुभरात्रीचे संदेश पाठविले जात आहेत. इच्छुकांनी पहिल्या टप्प्यात सोशल मीडियावरून शुभेच्छा देऊन मतदारांपर्यंत पोचण्याच्या प्रयत्न केला आहे.

अवघ्या महिन्यावर येऊन ठेपलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीचे चित्र काहीसे स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी आघाडीविरोधात सर्वपक्षीय महाआघाडी यांच्यात चुरशीने लढत होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. कोल्हापूरच्या नेत्यांनीही जयसिंगपूर पालिकेत जातीने लक्ष घातल्याने उमेदवारांपेक्षा नेत्यांसाठीच निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. सत्ताधारी आघाडीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची गर्दी असली तरी महाआघाडीनेदेखील चांगल्या उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.

प्रतिस्पर्धी उमेदवाराला विनवण्या करून त्याला रोखण्याची व्यूहरचना करणारी यंत्रणाही कामाला लागली आहे. यातून दररोज ठरलेल्या ठिकाणी बैठकांवर बैठका सुरू आहेत. निवडणूक सोपी जाण्यासाठी वरचढ ठरणाऱ्या उमेदवाराला चीत करणे पहिले आव्हान असणार हे ओळखून विविध प्रकारांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला साकडे घातले जात आहे. महाआघाडीच्या घडामोडी जरी चर्चेत असल्या तरी सत्ताधारी आघाडीने कासवाच्या चालीने निवडणुकीची तयारी चालवली आहे.

निवडणुकीआधी येणाऱ्या दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर इच्छुकांनी सोशल मीडियावरून प्रचारात आघाडी घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, दिवाळीच्या शुभेच्छा मतांमध्ये किती प्रमाणात रुपांतर होतात हे निकालावरून स्पष्ट होणार आहे.

Web Title: Election publicity in Diwali