वीज थकबाकी योजनेत हप्तेवाढीची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

जास्त थकबाकी असलेल्या संस्थांसमोर पेच; उर्जामंत्र्यांना निवेदन देणार 
कोल्हापूर - महावितरणने पाणीपुरवठा व उच्चदाब उपसा जलसिंचन योजनेत थकबाकी बिले चार हप्त्यांत भरून घेण्यासाठी प्रोत्साहनपर योजना सुरू केली; मात्र अनेक पाणीपुरवठा योजनांची थकबाकी पाच ते वीस लाखांच्या पुढे आहे. त्यांपैकी बहुसंख्य संस्थांत चार हप्त्यांत थकबाकी देणे अवघड झाल्यामुळे संस्थांसमोर पेच निर्माण झाला असून, हप्ते वाढवून द्यावेत, अशी मागणी उपसा सिंचन योजना संस्थाचालकांकडून संघटनात्मक पातळीवर करण्यासाठी तयारी सुरू आहे.

माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी सहकारी तत्त्वावर उपसा सिंचन योजना राबविल्या जातात. यात गावागावातील शेतकऱ्यांनी मिळून अशा संस्थांकडून पाणी घेतले जाते. त्यासाठी पंपाला लागणाऱ्या विजेच्या बिलाची थकबाकी कोट्यवधीच्या घरात आहे. अशी थकबाकी वर्षानुवर्षांची आहे. 

त्याच्या वसुलीसाठी महावितरणकडून प्रयत्न होत आहेत. त्याचाच भाग म्हणून चार हप्त्यांत थकीत बिले भरण्याची योजना महावितरणने सुरू केली. जिल्ह्यात सुमारे दीडशेवर संस्थांची थकबाकी आहे. कमीत कमी दोन लाख ते जास्तीत जास्त मोठ्या संस्थांची थकबाकी २५ लाखांपर्यंत आहे. त्याचे चार हप्ते करायचे म्हटले तरी संस्थांना किमान चालू महिन्याच्या बिलाव्यतिरिक्त जादा २० हजार ते चार लाखांची रक्कम भरावी लागणार आहे.

ते म्हणाले, ‘‘एप्रिल व मे महिन्यात शेतीला जास्त पाणी लागते. परिणामी वीजवापर वाढणार आहे. या दोन महिन्यांचे बिल जादा येणार आहे. यात थकबाकी बिलांचा हप्त्याचा भार, त्यामुळे प्रत्येक शेतकरी वीज ग्राहकाची एकूण बिलाची रक्कम वाढणार आहे. त्यामुळे बिल भरतो; पण हप्ता वाढवून द्या, अशी विनंती काही उपसा सिंचन योजनांचे पदाधिकारी संचालक करीत आहेत.’’

दरम्यान, महावितरणने सुरू केलेल्या योजनेचे नियंत्रण महावितरणच्या प्रकाशगड मुख्यालयाकडे आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर यात कोणताही बदल होणार नाही, हेही उघड आहे. त्यामुळे चार हप्त्यांत बिल भरणे एवढाच पर्याय तूर्त संस्थांसमोर असल्याचे दिसते. 

पण हप्ते वाढवून देण्यासाठी पाणीपुरवठा संस्था संघटनात्मक पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. त्याचाच भाग म्हणून ऊर्जामंत्र्यांना निवेदनही लवकरच पाठिवले जाणार आहे. 

चार हप्त्यांत थकबाकी देण्याची तयारी 
राज्यातील १६ विभागांत ४२ हजार वीज जोडण्यांची थकबाकी ९४० कोटी आहे, तर व्याजाची रक्कम ५१२ कोटींवर अशी एकूण थकबाकी १४५२ कोटींहून अधिक आहे. यात ज्या संस्थांच्या वीजजोडणीचा पुरवठा थकबाकीपोटी खंडित केला आहे, त्या संस्थांना थकबाकीतील २० टक्के रक्कम चालू महिन्याचे पूर्ण वीज बिल भरल्यानंतर वीजजोडण्या पूर्ववत केल्या जाणार आहेत. दरम्यान, ज्या संस्थांची थकबाकी कमी आहे, ज्यांच्याकडे सभासद संख्या जास्त आहे, अशा संस्थांकडून मात्र चार हप्त्यांत थकबाकी देण्याची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: electricity arrears scheme installment increase