रोजगाराभिमुख शिक्षण हेच असावे व्हिजन

education
education

प्राथमिक अवस्थेत विविध वस्तू, कार्ड, चित्रे यांच्या साहाय्याने ज्ञानरचनावाद आवश्‍यकच. त्यापुढे त्याला मूलभूत गोष्टी प्राप्त कराव्या लागतील. समजपूर्वक वाचन, लेखन, अंकावरील क्रिया व प्राथमिक इंग्रजी त्यांना येऊ लागल्यानंतर त्यांची स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयारी करावी लागेल. रोजगाराभिमुख शिक्षण प्रक्रिया अंगिकारून ती ठोसपणे राबवण्याचे व्हिजन आता आवश्‍यक आहे.

अद्यापही बालवाडीचा अधिकृत अभ्यासक्रम शासनाकडे उपलब्ध नाही. ग्रामीण भागात प्रामुख्याने अंगणवाडी व शहरी भागात बालवाडी आहे. अंगणवाडीमध्ये ताईंना केवळ अध्यापन करण्यास प्राधान्य द्यावे लागेल. सद्यःस्थितीत ० ते १४ वयोगट, तसेच गरोदर, स्तनदा मातांसाठी त्यांना काम करावे लागते. अंगणवाडीत ३ ते ६ वयोगटातील मुलांचे केवळ अध्यापन केले जावे. 

एक वर्ग, एक शिक्षक ः Each One Teach One  ही आदर्श अध्यापन, अध्ययन पद्धती आहे. पण किमान एक वर्ग- एक शिक्षक ही पद्धती अवलंबावी लागेल. २० पटापेक्षा कमी पटाच्या शाळा सुरूच ठेवाव्यात.

डिजिटल साक्षरतेची ओळख ः किमान सहाव्या इयत्तेपासून टप्प्याटप्प्याने डिजिटल साक्षरतेची ओळख करून देणे अत्यावश्‍यक आहे. आय.सी.टी. (ICT) हा विषयही सहावीपासून सुरू करता येईल. 

परीक्षा पद्धतीत बदल ः विषयातील समज, विशाल जाणीव आणि आकलन आणि उच्च दर्जाची समस्या सोडविण्याची कौशल्ये यांची चाचणी म्हणजे परीक्षा असेल.

कनिष्ठ पातळीची परीक्षा देऊन आपले क्षेत्र निवडण्याची मुभा असण्यासाठी दोन पातळीवर बोर्ड परीक्षा घेतली जावी. ग्रेड देणे योग्य असले तरी बोर्ड परीक्षेनंतर सर्व परीक्षांसाठी गुण टक्केवारीत दिले जात असतील तर बोर्ड परीक्षांमध्येही दिले जावेत. परीक्षेसाठी किमान दोन पेपर With Book असावेत.

रोजगार क्षमतेची कौशल्ये ः देशात ५४ टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या २५ वर्षांच्या खालील असल्यामुळे शाळामध्ये कौशल्यांच्या विकासाचे कार्यक्रम सहावीपासूनच सुरू करावेत. कौशल्य विकासाचे कार्यक्रम २५ टक्के शाळांमध्ये घ्यावेत.

अध्यापन विद्यालये/ महाविद्यालये ः भरमसाट अध्यापक विद्यालयांमुळे अध्यापनाचा दर्जाच ढासळतो आहे.  नोकरीच्या संधी कमी व अध्यापक निर्मिती भरमसाट हे व्यस्त प्रमाण झाल्यामुळे बुद्धिमान, कुशाग्र बुद्धीच्या विद्यार्थ्यांनी अध्यापक विद्यालयांकडे पाठ फिरवली आहे. केवळ वर्ग टिकवण्यासाठी छात्रअध्यापक भरती सुरू आहे. 

अध्यापक, शिक्षक ः शिक्षकांची क्षमता, प्रेरणा आणि जबाबदारी वाढवण्याच्या कार्यक्रमावर भर हवा. किमान तीन वर्षांत दर्जेदार व्यावसायिक प्रशिक्षण व व्यावसायिक विकास कार्यक्रमात भाग घेणे बंधनकारक करावे. शिक्षकांनी दर पाच वर्षांनी एक मूल्यांकन चाचणी उत्तीर्ण होणे आवश्‍यकच. 

शिक्षकांसाठी आचारसंहिता तयार केली जावी. माहिती व संज्ञापन तंत्रज्ञानाचा वापर शिक्षकांना प्रत्यक्ष अध्यापन व अध्ययनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी करता यावा.

कला, कार्यानुभव, क्रीडा व आरोग्य ः कला व क्रीडा शिक्षक किमान उच्च प्राथमिक शाळेत आवश्‍यक. हे दोन्ही विषय केवळ कागदावरच आहेत. समृद्ध जीवन जगणे, ऑलिंपिक स्वप्न याच वयात पाहता येते. आरोग्य तपासणी P.R.C. पाहते म्हणून उपचार म्हणूनच होते. P.R.C. सेंटरमध्ये केवळ शालेय आरोग्य तपासणीसाठी स्वतंत्र व्यवस्था हवी. आजारी मुलांवर पुढील उपचार सुलभपणे व्हावेत.

वर्तमान शिक्षणापुढील नवी आव्हाने
पहिलीपासून इंग्रजी आहे; पण हा केवळ विषयच राहिला आहे. मूल्यमापन केले जात नाही. त्यामुळे इंग्रजी शाळांकडे लोंढे वाढत आहेत. बारावी बोर्ड परीक्षेनंतर विविध परीक्षा, Net, Neet, Set, C & T, T&T, MPSC, UPSC यांसारख्या परीक्षा विद्यार्थी देणार असतील तर पूर्वतयारी प्राथमिक शाळांतूनच व्हावी.

ज्ञानरचनावाद हा पांगूळगाडा आहे. जोपर्यंत चालता येत नाही, आधार द्यावा लागतो, तोपर्यंत त्याची गरज असते. तसेच प्राथमिक अवस्थेत विविध वस्तू, कार्ड, चित्रे यांच्या साहाय्याने ज्ञानरचनावाद आवश्‍यकच. त्यापुढे त्याला मूलभूत गोष्टी प्राप्त झाल्यावर त्याची आवश्‍यकता वाटत नाही. समजपूर्वक वाचन, लेखन, अंकावरील क्रिया व प्राथमिक इंग्रजी त्यांना येऊ लागल्यानंतर त्याची स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी करावी लागेल. केवळ शाळा रंगविणे, फरशीवर कोष्टक काढणे, विविध वस्तूंनी खोल्या भरणे व ठराविक बाबी मुलांनी पाहुण्यांना करून दाखविणे म्हणजे गुणवत्ता अजिबात नाही. मुलांना शिक्षकांशिवाय बाहेरील व्यक्ती, अधिकारी यांनी अभ्यासक्रमानुसार किमान क्षमता येतात का, हे पाहूनच गुणवत्ता ठरविली पाहिजे.

सांगली जिल्ह्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे विलिंग्डन महाविद्यालय आणि महाराष्ट्र टेक्‍निकल एज्युकेशन सोसायटीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून उच्च शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १५६१ प्राथमिक शाळा आणि ४७६ हायस्कूलचे जाळे तयार झाले आहे. विटा, इस्लामपूर, तासगाव येथे गेल्या काही वर्षांत अभियांत्रिकी शिक्षणाचे तर सांगलीत भारती विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय संकुल विस्तारले. शिक्षणाचा हा विस्तार होत असताना शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचे आव्हान सर्वच शैक्षणिक समूहांपुढे आहे. 

रत्नागिरी, सिंधुदुर्गात शैक्षणिक सुविधा वाढत आहेत. वैद्यकीय महाविद्यालय डेरवण येथे सुरू झाले. पदव्युत्तर शिक्षण तसेच तांत्रिक पदवी, पदविका यासाठी कोकणाबाहेर जाण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येत नाही. औषधशास्त्राचीही महाविद्यालये आहेत. संख्यात्मक वाढ झाली आहे, आता गुणात्मक वाढ होण्यासाठी प्रयत्न वाढायला हवेत. अभियांत्रिकी महाविद्यालयांतून संशोधनासाठी सुविधा वाढवण्याची आवश्‍यकता आहे. कृषी पदविका, पदवी, कृषी महाविद्यालयांतून मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे.

तज्ज्ञ म्हणतात
कौशल्य विकासाला पर्याय राहिलेला नाही. पुस्तकी ज्ञानाबरोबर शासनाने तंत्रशिक्षणावर भर द्यावा. दहावी-बारावीनंतर करिअरच्या मागे लागण्यापेक्षा शालेय जीवनातच चांगले कारागीर घडतील. नोकरीपेक्षा स्वतःचा उद्योग-व्यवसाय अधिक आत्मनिर्भर बनवतो. बेरोजगारीचा सामना करण्याची वेळ येऊ नये यासाठी तंत्र शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी.
बी. बी. मिसाळ

दहावीनंतर विज्ञान शाखेलाच प्रवेश न घेता मुलांचा कल विचारात न घेता दहावीच्या गुणांवर प्रवेश घेतला जातो आणि नंतर ही मुले मागे पडतात. शासनाने कल चाचणी परीक्षा विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी घेतली. पालकांनी कल समजून विद्यार्थ्यांना घडू द्यावे. पारंपरिक शिक्षणावर भर देण्याऐवजी करिअरच्या नव्या दालनांकडे पाहावे.
ए. व्ही. गाडगीळ

प्रत्येक मुलाचे वयानुसार कौशल्य वेगळे असू शकते. सूक्ष्म कौशल्यावर भर देणाऱ्या अभ्यासक्रमाची गरज आहे. कौशल्य कमी असेल ते आत्मसात करण्यासाठी नेमके काय हवे याचाही आराखडा तयार व्हावा. एखादे कौशल्य शिकविले की ते आत्मसात होते का याचे मूल्यमापन व्हायला हवे. अभ्यासक्रमाबरोबर कौशल्यपूरक अभ्यासक्रमावर भर द्यावा. 
भरत रसाळे

शासनाने पुढाकार घेऊन करिअरच्या संधी निर्माण करणाऱ्या अभ्यासक्रमाचा समावेश शिक्षणात करावा. नियमित अभ्यासाबरोबर कौशल्य विकासावर अभ्यासक्रम शिकविण्याची त्यांची तयारी आहे. पालकांनी अमूक एक माध्यमाचा आग्रह न करता विद्यार्थ्याला ज्या माध्यमातील शिक्षण अधिक सोपे आहे तेथे प्रवेश घ्यावा.
संतोष आयरे

कौशल्य विकास ही काळाची गरज आहे. तुमच्याकडे किती गुण आहेत यापेक्षा कौशल्य काय आहे याचा विचार होणार आहे. त्यामुळे उपजत जो गुण आहे तो विकसित कसा होईल याकडे लक्ष द्यावे. कुशल मनुष्यबळ प्रत्येक उद्योग-व्यवसायासाठी आवश्‍यक असते. शासनाने कौशल्य विकासाची केंद्रे शाळाशाळांतून निर्माण करावीत. 
सी. एम. गायकवाड

सांगलीतील वालचंद महाविद्यालयाने राष्ट्रीयस्तरावर अभियांत्रिकी शिक्षणात नावलौकिक मिळवला आहे.  महाविद्यालयाने जिल्ह्यातील अन्य अभियांत्रिकी महाविद्यालयांसोबत विकासात्मक उपक्रमांसाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. हा समन्वय सर्वच विद्याशाखांमध्ये निरंतरपणे होण्यासाठी जिल्हास्तरावर शिक्षणातील समन्वय समिती स्थापन व्हावी.
डॉ. पारिषवाड

शिक्षण व्यवस्थेचे टप्पे ४ आणि प्रकार दोन. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षण हे टप्पे तर पुन्हा खासगी आणि सहकारी हे प्रकार. या सर्व व्यवस्था चक्रव्यूहात अडकल्या आहेत. शिक्षणाचा अधिकार कायद्याने फार मोठे नुकसान केले आहे. शिक्षणेतर अनुदान १२ वरून ५ टक्के केले, तेही वेळेत नाही. विनानुदानित शाळांना २० टक्के अनुदानाची घोषणा झाली, मात्र तेही मिळत नाही. ते मिळावे.
प्रा. शरद पाटील

मिरज व सांगली या दोन्ही शहरांमध्ये मेडीकल हब म्हणून विकासाच्या संधी आहेत. वैद्यकीय शिक्षणातील सर्व पॅथींचा समन्वय साधणे गरजेचे आहे. अभियांत्रिकी शिक्षणासाठी जिल्ह्यात उद्योगांचा विस्तार गरजेचा आहे. देशातील सर्वात पहिले खासगी अभियांत्रिकी महाविद्यालय सांगलीतले; मात्र उद्योगांच्या विकासाअभावी त्याचा जिल्ह्याला अपेक्षित फायदा झाला नाही.
पृथ्वीराज पाटील

शिक्षण क्षेत्राबाबत कोकणचा विचार करता शिक्षणाच्या बदलापेक्षा पालकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडीनुसार तंत्रज्ञान व शिक्षणपद्धतीचा विचार करून परिवर्तन आवश्‍यक आहे. विद्यार्थी उच्च माध्यमिककडे जाताना त्यांना आवडत्या शिक्षणाचा कल व पुढील काळातील गरजा लक्षात घ्याव्यात.
उमेश गाळवणकर

कोकणात शिक्षणाची मोठी परंपरा आहे. स्वातंत्र्यानंतर विनाअनुदान शिक्षणाचे पेव फुटले. अशा शिक्षणावर कोणतेही नियंत्रण नाही. मान्यतेपलीकडे सरकारचे त्यावर नियंत्रण नाही. ते असले पाहिजे. गुणवान विद्यार्थी संशोधन, स्पर्धा परीक्षा, परकीय भाषा अभ्यासाकडे अपवादानेच वळतात. स्थानिक नैसर्गिक साधनसंपत्ती व त्यावरील रोजगाराला पूरक असे कौशल्य निर्माण करणारे अभ्यासक्रम सुरू करावेत.
डॉ. सुभाष देव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com