‘बॉस’च्याच घरी बोगस नळजोड!

शैलेन्द्र पाटील
बुधवार, 25 एप्रिल 2018

सातारा - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता ए. बी. आंटद यांच्या भाड्याच्या घरातील नळ कनेक्‍शन बोगस असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. अर्थात श्री. आंटद यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे या बोगस कनेक्‍शनवर प्रकाश पडला. संबंधित मालकास गेल्या काही वर्षांत वापरलेल्या पाण्याची ‘किंमत’ म्हणून १९ लाख रुपयांचे बिल प्राधिकरणाने फाडले असल्याचे समजते. 

एका बैठकीत व्यस्त असल्याने या संदर्भात श्री. आंटद यांच्याशी थेट संपर्क होऊ शकला नाही. तथापि, सूत्रांकडून या खळबळजनक प्रकाराची माहिती ‘सकाळ’ प्रतिनिधीच्या हाती लागली आहे. विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव रस्त्यावर पुष्कर मंगल कार्यालयासमोर वसुंधरा गार्डन अपार्टमेंटमध्ये श्री. आंटद भाड्याने राहतात. या परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा होतो. श्री. आंटद यांना त्यांच्या नळ कनेक्‍शनच्या बिलाबाबत शंका आली. त्यांनी आपल्या कार्यालयात चौकशी केली असता संबंधित कनेक्‍शनला गेल्या काही वर्षांपासून बिलच आकारले जात नसल्याचे उघडकीस आले. 

श्री. आंटद यांनी संबंधित जागेत आपण स्वत: राहात असलो तरी संस्थेचे हित डोळ्यापुढे ठेवून कर वसुलीचा निर्णय घेतला. संबंधित कनेक्‍शनधारकावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी कर्मचाऱ्यांना दिले. फुकट पाणी वापरलेल्या कालावधीतील पाण्याचे सरासरी 
बिल व या कालावधीतील विलंब आकार असे सुमारे १९ लाख रुपयांचे बिल संबंधित मालकाच्या नावाने प्राधिकरणाने फाडल्याचे समजते. 

विनापरवाना नळ कनेक्‍शन जाहीर केल्यास संबंधितांस त्या कालावधीतील अंदाजे पाणी बिल व त्यावरील विलंब आकार लक्षात घेऊन वसुली केली जाते. डिसेंबर २०१७ मध्ये तशी योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जाहीर केली होती. ही योजना जाहीर केल्यानंतर सातारा शहर (पूर्व भाग) व उपनगरांतील ७४८ नळ कनेक्‍शन बिगर महसुली असल्याचे उघड झाले होते. ५२३ कनेक्‍शन बोगस निघाली तर सुमारे २२५ ग्राहकांना त्यांनी वापरलेल्या पाण्यापोटी बिलेच जात नव्हती.

Web Title: engineer a. b. aandat illegal water connection crime