सर्पदंशाचा बळी, आरोग्य व्यवस्थाच लुळी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

ग्रामीण आरोग्याचा पंचनामा - जीवन-मरणाच्या प्रश्‍नातही गप्पाच

ग्रामीण आरोग्याचा पंचनामा - जीवन-मरणाच्या प्रश्‍नातही गप्पाच

एरंडोली (ता. मिरज) येथे तीन वर्षांच्या मुलाचा  सर्पदंशाने मृत्यू झाल्याने ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खेड्यातील माणसांचा जीव इतका स्वस्त आहे का, असा प्रश्‍न पडावा, इतकी ही व्यवस्था लुळी आहे. खेडोपाडी, वाडीवस्तीवर, रानामाळावर लाखोंची वस्ती असताना याकडे इतके दुर्लक्ष का व्हावे? प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांना अत्याधुनिक सुविधा, तज्ज्ञ डॉक्‍टर, डायग्नोस्टिक सेंटर अशा सुविधा पुरवण्याचा विषय  कधीच अजेंड्यावर का येत नाही. हे दवाखाने केवळ पोलिओ लसीकरण अन्‌ धनुर्वाताच्या इंजेक्‍शनपुरतेच उपयोगात ठेवायचे आहेत का? 

‘सार्थक’च्या निमित्ताने
एरंडोली (व्यंकोचीवाडी) येथील सार्थक निकम या तीन वर्षांच्या बालकाला शनिवारी रात्री नाग सापाने दंश केला. ‘बाऊ चावलंय..’ असं तो सांगत होता. दहा-पंधरा मिनिटांत नाग दिसला. त्वरित त्याला रुग्णालयात नेण्याच्या हालचाली झाल्या. खासगी चारचाकी भरधाव वेगाने मिरजेच्या दिशेने निघाली. वाडीपासून एरंडोलीचे अंतर सुमारे तीन किलोमीटर. एरंडोली प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरून गाडी गेली. या केंद्रात सर्पदंशाच्या २० लस उपलब्ध आहेत; मात्र त्याची माहिती लोकांना नाही. एरंडोलीतून सुमारे चार किलोमीटर अंतरावर मल्लेवाडीपर्यंत सार्थक बोलत होता, कण्हत होता. हळूहळू त्याचा आवाज थांबला अन्‌ श्‍वासही. एरंडोली प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील आवश्‍यक उपचार मिळत असते, अत्याधुनिक सुविधा व तज्ज्ञ डॉक्‍टर असते तर... कदाचित प्राण वाचले असते. सार्थकच्या निमित्ताने या भळभळणाऱ्या जखमांवर बोलण्याची वेळ आली आहे.

मुळातच कीड
प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशाची लस तर उपलब्ध असते; मात्र विषारी साप चालवल्यास ती उपयोगाची नसते. 

‘व्हेटिंलेटर’ दूर तालुका केंद्रांवरच असतो, परंतु तिथपर्यंत पोहोचण्याइतका वेळ रुग्णाकडे नसतोच. जिल्ह्यात दरवर्षी १२०० ते १३०० लोकांना लोकांना सर्पदंश होत असेल तर काही विशिष्ट अंतरावरील ग्रामीण केंद्रांत अशी व्यवस्था करायला नको का? केवळ सर्पदंश नव्हे तर एकूणच ग्रामीण आरोग्याच्या प्रश्‍नांवर मुळापासून काम करण्याची गरज आहे.  

ही व्यवस्था होईल?
* रक्त तपासणी केंद्र व तत्काळ अहवाल
* डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांवर उपचार
* आधुनिक यंत्रणा वापरणारे डॉक्‍टर नेमणे
* बाल आरोग्यासाठी तज्ज्ञांची नेमणूक
* महिला आरोग्यावरील तज्ज्ञांची नेमणूक
* किमान १० किलोमीटर परिघात व्हेंटिलेटर
* सोनोग्राफी मशीनसह बाळंतपणाची व्यवस्था

आला की ढकला
प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात गंभीर स्वरूपाचे रुग्ण आले की त्यांना पुढे ढकला, अशी एक व्यवस्था निर्माण झाली आहे. एकतर या ठिकाणी अत्याधुनिक सुविधा नाहीत, असल्या तरी ‘रिस्क’ घेण्याची तयारी नाही. हा सार्वत्रिक अनुभव असताना कुणी याविरुद्ध बोलत नाही, हेही दुर्दैवच. 

सिव्हिलवर ताण
सांगली आणि मिरज येथील शासकीय रुग्णालयांवर  जिल्ह्याचा प्रचंड ताण आहे. इथली यंत्रणा कोलमडून पडते. तो ताण कमी करायचा तर विकेंद्रीकरण करणे गरजेचे असून मोठ्या केंद्रांवर अत्याधुनिक आरोग्य सुविधांचा पुरवठा आवश्‍यकच आहे. 

वित्त आयोगाचा पैसा मुरतो कुठे?
वित्त आयोगातून मिळणाऱ्या निधीपैकी प्राधान्याने शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेवर खर्च करायचा आहे. परंतु, ग्रामपातळीवर त्याचे काय होते, याचे एकेक नमुने धक्कादायक आहेत. आरोग्य सुविधांत बांधकाम काढण्यावरच इथे भर असतो. त्याच खड्डयांत दरवर्षी  झाडे लावली जातात. त्याऐवजी या केंद्रांवर अत्याधुनिक यंत्रणा आणि ते चालवू शकणारे तज्ज्ञ डॉक्‍टर उपलब्ध करण्याची गरज आहे. जंताच्या गोळ्या बालवाडी सेविकांनी द्यायचा आणि बाधा झाल्यावर डॉक्‍टरांनी धावायचे... हे इथेच खपवून घेतले जाते. 

१०८ रुग्णवाहिका पूर्ण सक्षमच करा
राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवेसाठी तत्काळ ०२३३-१०८ क्रमांकाशी संपर्क साधल्यास नक्कीच फायदा होतोय. ही व्यवस्था अत्यंत उपयुक्त ठरतेय, मात्र त्यातही  सुधारणेला मोठा वाव आहे. ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट (एएलएस) असलेल्या ४ रुग्णवाहिका आणि बेसिक लाईफ सपोर्टच्या २० रुग्णवाहिका जिल्ह्यात २४ तास कार्यरत आहेत. या सर्वच रुग्णवाहिकांत अत्याधुनिक सुविधा निर्माण केल्यास सरकारवर कितीसा बोझा पडेल? जिल्हा नियोजन निधीतून त्यासाठी तरतूद करता येईल.  

हे आहेत विषारी साप
सापांच्या बहुतांश जाती या बिनविषारी आहेत, मात्र ज्याकाही विषारी आहेत, त्यातील प्रमुख चार जाती  सांगली जिल्ह्यात आढळतात. त्यात नाग, घोणस, फुरसे, मण्यार या जातींचा समावेश होतो. यापैकी घोणस विषारी दातांचा वापर करून किंवा दात दुमडून दोन्ही प्रकारे चावू शकतो. यापैकी कोरडा चावा जीवघेणा नसतो, मात्र घोषणने विषारी दातांनी चावा घेतल्यास अतिजलद उपचार झाले तरच प्राण वाचू शकतात. 

सर्पदंशाबाबत ज्ञान हवे-
विषारी नाग चावल्यास रुग्ण शुद्धीवर असतो, मात्र मेंदू अनियंत्रित होतो. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रातील ‘ए.एस.व्ही.’ लस उपयोगी ठरत नाही. ‘व्हेंटीलेटर’ची आवश्‍यकता असते. त्यांना ‘सिव्हिल’मध्ये आणणे उपयोगी ठरते. घोणस, फुरसे चावल्यास रक्त गोठण्याची प्रक्रिया बंद होते. नाकावाटे, किडनी किंवा शरीरात रक्तस्राव होतो. अशावेळी ‘एएसव्ही’पेक्षा ‘डायलिसिस’ आवश्‍यक असते. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना  नागदंश की सर्पदंश याचे ज्ञान असणे आवश्‍यक असते.

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील ‘एएसव्ही’ (ॲन्टी स्नेक व्हेनम) लस आणि श्‍वानदंशावरील ‘एआरव्ही’ (ॲन्टी रेबीज व्हॅक्‍सीन) ही लस उपलब्ध आहे. दोन्ही ठिकाणी या लसींचा पुरेसा साठा ठेवण्याबाबत आदेश दिले आहेत.
- डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक

प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश लस उपलब्ध आहे. शनिवारी रात्री मुक्कामी वैद्यकीय सेवक होते. परंतु असा काही प्रकार झाल्याचे आम्हाला समजले नाही. सर्पदंशाचे प्रकार घडल्यास तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात यावे. येथे प्राथमिक उपचार करून तालुक्‍याच्या ठिकाणी पुढील उपचारासाठी रवाना करण्याची व्यवस्था आम्ही करतो.
- डॉ. सौ. व्ही. व्ही. धेंडे, एरंडोली प्राथमिक आरोग्य केंद्र