हेलिकॉप्टर निर्मितीच्या स्वप्नासाठी सबकुछ...

हेलिकॉप्टर निर्मितीच्या स्वप्नासाठी सबकुछ...

वांगी - स्वदेशी बनावटीच्या हेलिकॉप्टरचा ध्यास घेतलेल्या येथील नववी उत्तीर्ण मेकॅनिक प्रदीप मोहिते याने स्वप्नपूर्तीसाठी व्यवसायासह उद्योग नगरी पिंपरी-चिंचवड गाठले. त्याच्या प्रयत्नांना आता हिंदुस्थान एरोनॉटिक्‍सच्या अभियंता पायलटस्‌नी बळ दिले आहे. त्याच्या धडपडीला प्रोत्साहन म्हणून ध्रुव पुरस्काराने गौरवण्यात आलेय.  

शिक्षणाला राम राम करीत चारचाकी वाहन दुरुस्तीचे प्राथमिक शिक्षण घेऊन २००९ मध्ये गावातच प्रदीपने गॅरेज थाटले. अभिनेता अमीर खानचा ‘थ्री इडियटस्‌’ पाहून त्यांच्यातील हेलिकॉप्टर निर्मितीच्या स्वप्नांना  पालवी फुटली. सुरुवातीस भंगारातील पाईप्स, लोखंडी सांगाडा तयार करीत त्याने ॲपे रिक्षाचे इंजिन बसवले. त्यात अपयश आल्यानंतर मारुती ८०० चे इंजिन बसवून प्रयत्न केला. त्यातही फारसे यश मिळाले नाही. मात्र  त्याने हार न मानता प्रयत्न सुरूच ठेवले. त्याच्या या प्रयत्नांचे जून २०१२ मध्ये ‘सकाळ’ मध्ये बातमी  लावून कौतुक केले. 

दरम्यान, त्याच्या गावात राहून होणारी ही कमाई अशा प्रयत्नांना पुरेशी ठरत नव्हती. त्यामुळे तालुक्‍याच्या ठिकाणी म्हणजे कडेगावला गॅरेज थाटले. मात्र तिथेही हेलिकॉप्टर निर्मितीच्या प्रयत्नांसाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन व्हावे यासाठी पिंपरी चिंचवडला जायचा निर्णय त्याने घेतला. त्यासाठी तिथेच व्यवसायही थाटला. दोन वर्षांत त्याने तिथे हेलिकॉप्टर निर्मितीच्या अंगाने नवनवी माहिती मिळवली. त्याच्या या हेलिकाप्टरने २० फुटांवर उड्डाणही केले. त्याची ही खटपट हवाई दलातील निवृत्त वैमानिक संजय वझे यांनी हेरली. त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. त्यांनी ओळखीतून  ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स’च्या काही अधिकाऱ्यांशी त्याची भेट घडवून आणली. या कंपनीने त्याच्या प्रयत्नांना बळ म्हणून ‘ध्रुव’ पुरस्कार देऊन गौरवले आहे. 

सात हेलिकॉप्टर आणि चाळीस लाख 
प्रदीपने आजवर सात हेलिकॉप्टर बनवण्यासाठी  सुमारे ४० लाखांचा खर्च केला आहे. सुमारे नऊ वर्षे त्याची खटपट सुरू आहे. या इंजिनसह प्रत्येक भाग प्रदीपने बनवलाय. त्याचे पेटंटस्‌ त्याने मिळवले आहेत. यापूर्वी साताऱ्याच्या अमोल यादव या तरुणाने स्वदेशी विमान बनवण्याचा प्रयत्न केला होता. त्याला शासनाने मदतीचा हात दिला. प्रदीपच्या प्रयत्नांनाही ‘मेक इन इंडिया’सारख्या योजनांमधून मदत मिळावी, अशी अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com