सुटीच्या हंगामात महागणार प्रवास

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 ऑक्टोबर 2016

एसटीची हंगामी दहा टक्के भाडेवाढ; साधी व निमआरामचा समावेश

सातारा - सण व सुटीतील पर्यटनासाठी होणारा एसटीचा प्रवास आता महाग होणार आहे. एसटीने सणातील सुट्या आणि पर्यटनासाठी होणारा प्रवास ‘कॅश’ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आगामी ऑक्‍टोबर व नोव्हेंबर महिन्यांत ठराविक कालावधीत दहा टक्के प्रवासी भाडेवाढ करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश सर्व विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहेत. 

दिवाळीच्या सुटीत गावाकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. तसेच दिवाळीनंतरही काही जण हमखास पर्यटनाला जातात. यासाठी शक्‍यतो एसटीला प्राधान्य दिले जाते. सणांच्या सुटीनिमित्ताने होणारा प्रवास आणि पर्यटनासाठी होणारा प्रवास ‘कॅश’ करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यासाठी ऑक्‍टोबर व नोव्हेंबर या कालवधीत काही ठराविक दिवशी एसटीचे प्रवासी भाडे दहा टक्‍क्‍याने वाढविले जाणार आहे. त्यामुळे १०० रुपये तिकीट असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी ११० रुपये प्रवास भाडे मोजावे लागणार आहे. नैमित्तिक प्रवास महाग होणार आहे. 

सर्वसामान्य लोकांना एसटीचा मोठा आधार असतो. सुटीच्या कालावधीत  एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे एसटीची ही  ‘कॅश ट्रिटमेंट’ सर्वसामान्य प्रवाशाच्या खिशाला चाट देणारी ठरणार आहे. साध्या आणि निमआराम एसटी बससाठी ही हंगामी भाडेवाढ आहे. याचा सर्वाधिक फटका नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे.

अलिशान व आरामदायी प्रवासासाठी असलेल्या शिवनेरी गाडीला २० टक्के, वातानुकूलित गाड्यांना ३३ टक्के, तर साध्या गाड्यांना १५ टक्के भाडेवाढीची मुभा एसटी महामंडळाला शासनाने दिली आहे. त्यानुसार इतर प्रकारच्या गाड्यांचीही त्या प्रकारानुसार भाडेवाढ होईल.

हंगामी भाडेवाढीचे दिवस...
२२ ते २४ ऑक्‍टोबर

२८ ऑक्‍टोबर ते एक नोव्हेंबर
पाच ते सहा नोव्हेंबर

११ ते १४ नोव्हेंबर