प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओला भीषण आग

विठ्ठल लांङगे 
रविवार, 1 एप्रिल 2018

चित्रकार प्रमोद कांबळे यांच्या पाईपलाईन रस्त्यावरील स्टुडिओला रविवारी दुपारी भीषण आग लागली. दुर्घटनेचा धोका होण्याची शक्यता असल्याने बाजुच्या इमारतीमधील रहिवासी अन्यत्र हलविण्यात आले. 

नगर - नगरचे प्रसिद्ध शिल्पकार आणि चित्रकार प्रमोद कांबळे यांच्या पाईपलाईन रस्त्यावरील स्टुडिओला रविवारी दुपारी भीषण आग लागली. दुर्घटनेचा धोका होण्याची शक्यता असल्याने बाजुच्या इमारतीमधील रहिवासी अन्यत्र हलविण्यात आले. आगीमुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच नगर महापालिका व एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिस्तबाग परिसरातील पाईपलाईन रोडवर असणाऱ्या प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओला रविवारी भीषण आग लागली. स्टुडिओमध्ये शिल्पासाठी लागणारे फायबर आणि इतर प्लास्टिकचे व लाकडी सामान मोठ्या प्रमाणात असल्याने आग लवकर पसरली. स्टुडिओला लागलेली आग शेजारी असलेल्या ताडपत्रीच्या गोदामालाही लागल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान अग्नीशमन दलाच्या तीन गाड्या आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग नक्की कोणत्या कारणामुळे लागली हे स्पष्ट झालेले नाही. यामध्ये कोट्यवधी रूपयांचे अर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

Web Title: The famous studio Pramod Kambles studio had a fierce fire