‘निर्भया’ सक्षमतेसाठी ‘कूपर’चा अनमोल हात!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

उद्योग समूहाने जपली सामाजिक बांधिलकी; पथकासाठी दिल्या दोन जीप

उद्योग समूहाने जपली सामाजिक बांधिलकी; पथकासाठी दिल्या दोन जीप

सातारा - महिला, युवतींना सुरक्षा मिळवी तसेच त्यांना छेडछाडीपासून वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या जिल्ह्यातील ‘निर्भया’ सक्षम व्हाव्यात, पथक वेळेत घटनास्थळी पोचावे, त्यांच्या कार्यात सुलभता यावी यासाठी उद्योजकीय क्षेत्रात उज्ज्वल यश मिळवत सामाजिक बांधिलकीही जपणारा कूपर उद्योग समूह सरसावला असून, निर्भया पथकाच्या दिमतीला लाखो रुपयांच्या दोन नव्याकोऱ्या जीप दिल्या आहेत. त्याच्या प्रातिनिधीक चाव्या पाचगणीत नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उद्योग समूहाचे प्रमुख फरोख कूपर यांनी दिल्या.

साताऱ्याच्या कूपर उद्योग समूहाने उद्योजकीय क्षेत्रात सातत्याने यश मिळविले आहे. त्याबरोबरच येथील सामाजिक विकासातही हा समूह नेहमीच आघाडीवर असतो. केवळ उद्योगातून समृद्धी न मिळविता समाजाचेही आपण काही देणे लागतो, या विचारातून समूहाच्या वतीने समाजातील विविध घटकांना मदत केली जाते. या समूहाने सैनिक स्कूलसह जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालये उभारून दिली आहेत. कित्येक वसतिगृहातील कपाटे श्री. कूपर यांनी भेट दिलेल्या पुस्तकांनी भरून गेली आहेत. तसेच विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण मिळावे, आधुनिक तंत्रज्ञानाने शिक्षण घेता यावे यासाठी डिजिटल क्‍लासरूमही उभारून दिल्या आहेत. रिमांडहोम, निराधार महिलांच्या ‘आशा किरण’ या कऱ्हाडच्या महिला आश्रमासही त्यांनी संगणकासह विविध वस्तूंची नुकतीच मदत केली आहे. विद्यार्थी, महिलांना मदत व्हावी, त्यांचा विकास व्हावा यासाठी हा समूह जिल्ह्यात आपली भूमिका चोखपणे बजावत आहे.

महिलांना सुरक्षा मिळावी, अडचणीतील, संकटातील महिलांना तातडीने मदत मिळावी यासाठी पोलिस विभागाने जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘निर्भया’ पथकांची स्थापना केली आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र गाड्यांचीही काही प्रमाणात व्यवस्था केली आहे. या व्यवस्थेत आपलेही योगदान असावे, या उद्देशाने कूपर उद्योग समूहाने नुकताच भरघोस वाटा उचलला आहे. कूपर उद्योग समूहात असलेल्या कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंडातून या निर्भया पथकांच्या दिमतीला दोन जीप देण्याचा निर्णय नुकताच समूहाचे प्रमुख फरोख कूपर आणि संचालकांनी घेतला आणि पाचगणीतील कार्यक्रमात जीपच्या चाव्या मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त केल्या. कूपर उद्योग समूहाच्या या उपक्रमाचे, सामाजिक बांधिलकीचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह मान्यवरांनी कौतुक केले. या कार्यक्रमात धनजीशा कूपर यांच्या मराठीतील चरित्राची प्रतही मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. यावेळी प्रमुख अधिकारी नितीन देशपांडे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.