गुटखा कारखानाप्रकरणी फारुख जमादारला अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

आणखी दोघे संशयित मुसा जमादार व गडदरे यांनाही ताब्यात घेण्याचा पथकाचा प्रयत्न होता; पण ते सापडले नाहीत.

मिरज : लाखो रुपयांचा महसूल चुकवून बेकायदेशीरपणे गुटखा तयार केल्याप्रकरणी फारुख मुसा जमादार याला केंद्रीय उत्पादन शुल्कने आज अटक केली. त्याचा रक्तदाब वाढल्याने शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी मुसा जमादार आणि बापू गडदरे हे आणखी दोघे संशयित फरार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आज सकाळी आठ वाजल्यापासून सुंदरनगरमध्ये उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांचा फौजफाटा तैनात होता. उपायुक्त वैशाली पतंगे, अधीक्षक यादव, निरीक्षक अमजद शेख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जमादार यांच्या घराभोवती वेढा दिला. कारवाईत फारुख जमादार हाती लागला. त्याला अटक केली. दुपारी न्यायालयात हजर केले जाणार होते; तत्पूर्वी शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी नेले. तेथे फारुखचा रक्तदाब वाढला. त्यामुळे उपचारांसाठी दाखल करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला. पोलिस बंदोबस्तात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आणखी दोघे संशयित मुसा जमादार व गडदरे यांनाही ताब्यात घेण्याचा पथकाचा प्रयत्न होता; पण ते सापडले नाहीत.

आरग-लक्ष्मीवाडी रस्त्यावर गुटख्याच्या बेकायदा कारखान्यावर केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकाने छापा टाकून कोट्यवधींची कर चोरी उघडकीस आणली. याप्रकरणी फारुखचा भाऊ फिरोज जमादार आणि कारखान्याचा व्यवस्थापक शिशुपाल कांबळे यांना यापूर्वीच अटक झाली. सध्या ते कारागृहात आहेत.

Web Title: farukh jamadar arrested in gutkha case

टॅग्स