संस्कृती संवर्धनात स्त्री सहभाग मोलाचा - प्रतिभा रानडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

कोल्हापूर - ‘‘भारतीय संस्कृती ही माणूसपण संवर्धित करणारी जगण्याची पूर्वापार पद्धती आहे आणि हे माणूसपण संवर्धित करण्यात स्त्रियांचा सहभाग मोलाचा आहे. मात्र, सांस्कृतिकदृष्ट्या स्त्रियांचे स्थान व त्यांच्या योगदानाची दखल घेण्यात आपण मागे असल्याचे दिसते’’, असे मत लेखिका व संस्कृतीच्या संशोधक प्रतिभा रानडे यांनी व्यक्त केले. 

येथील अरुण नरके फौंडेशनतर्फे सुनीता नरके यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘स्त्रिया आणि संस्कृतीचे नाते काय?’ या विषयावर शाहू स्मारक भवनात झालेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या. 

श्रीमती रानडे म्हणाल्या, ‘‘जुनी मूल्ये गळून पडतात, नवी मूल्ये रुजू लागतात. यातील प्रवाहातून संस्कृती तयार होते. या संस्कृतीला इतिहास, धर्म, अनुभवाची जोड असते. प्रत्येक संस्कृतीच्या मुळाशी पूर्णपणे विकसित झालेला माणूसपणा असतो. त्याला कला, साहित्य, तत्त्वज्ञान, ज्ञान, विज्ञानाच्या जाणिवा असतात. अशा जाणिवा माणसात जेव्हा प्रगल्भ होतात तेव्हा माणूसपण व संस्कृती विकसित होते. त्यातून मानवाच्या जगण्याचा प्रवास समृद्ध होत जातो. पूर्वी माणूस शिकार करीत होता. अग्नीचा शोध लागण्यापूर्वी माणूस कच्चे मांस खात होता. नंतर तो ज्ञानी होत गेला. तशी मानवी जगण्याची संस्कृती तयार झाली. त्याच काळात स्त्रिया शेती करीत होत्या. 

त्या म्हणाल्या, ‘‘संस्कृतीत कलाविष्काराला महत्त्व आहे. यात सुशोभीकरणापासून कलाकृती बनविण्यापर्यंत व अक्षरापासून चित्रापर्यंतच्या प्रत्येक कृतीत स्त्रियांचा सहभाग आहे. रांगोळी हेही त्याचे प्रतीक आहे. तर मिथक कथा या स्त्रियांचे जगणे व भावविश्‍व मांडणारी अक्षर कला आहे. त्यात व्रतवैकल्य आणि कलात्मकता आहे. त्याचे संदर्भ मिथक कथात आहेत. त्या कथातून स्त्रियांच्या नियमित जगण्याच्या अनेक पद्धती पुढे आल्या. त्याच संस्कृतीच्या अविभाज्य भाग बनल्या आहेत. त्यामुळे अशा मिथक कथांचे महत्त्व स्त्रियांच्या जगण्याला उभारी देण्यास पूरक ठरले आहे. अशा कथांतून आलेले संदर्भ भारतीय संस्कृतीतून ठळकपणे आजही वापरले जात आहेत. देवता पूजेची संस्कृती भारतात आहे. असा स्त्री संस्कृतीचा पूर्वापार पाया असला तरी स्त्रियांना सांस्कृतिकदृष्ट्या मान देण्यात मात्र आपण बेदखल केले आहे.’’

रवींद्र उबेरॉय यांनी प्रास्ताविक केले. या वेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या नरके फौंडेशनच्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला.

शेतकऱ्याच्या बायकोची आत्महत्या नाही....
श्रीमती रानडे म्हणाल्या, ‘‘शेती विकसित करण्यात स्त्रियांचा वाटा मोठा असल्याचे विविध संशोधनातून उघड झाले आहे. स्त्रीला कष्टापासून ते नवनिर्मितीपर्यंतची आवड शेती संस्कृतीतून तिच्यात आली आहे. अशी आवड आजही कायम आहे. नव्या काळात शेतकरी आत्महत्या होत आहेत; पण शेतकऱ्यांच्या बायकोने आत्महत्या केल्याचे दिसत नाही. कारण तिला मुलाबाळांची काळजी असते. तिच्यातील तो वात्सल्याचा भाव अशा संस्कृतीतून रुजला असल्याचे दिसते.’’