क्रूरकर्मा खिद्रापुरेकडून नऊ वर्षे भ्रूणहत्या 

क्रूरकर्मा खिद्रापुरेकडून नऊ वर्षे भ्रूणहत्या 

सांगली - म्हैसाळ (ता. मिरज) येथील क्रूरकर्मा डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे तब्बल नऊ वर्षांपासून भ्रूणहत्या करत असल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे शेकडो भ्रूणहत्या त्याने केल्याची शक्‍यता आहे. त्याच्याकडे महाराष्ट्र, कर्नाटकसह आंध्र प्रदेशातूनही रुग्ण येत असल्यामुळे आंतरराज्य "रॅकेट' कार्यरत असण्याची शक्‍यता आहे. डॉ. खिद्रापुरेविरुद्ध एमटीपी अर्थात वैद्यकीय गर्भपात कायदा आणि बॉंबे नर्सिंग होम कायद्यानुसार अतिरिक्त कलमे लावली आहेत. डॉ. खिद्रापुरे पत्नीसह फरारी झाला आहे. त्याच्या शोधासाठी पाच पथके ठिकठिकाणी रवाना झाली आहेत. 

मणेराजुरी (ता. तासगाव) येथील सौ. स्मिता प्रवीण जमदाडे यांचा बेकायदेशीर गर्भपात करतानाच मृत्यू झाल्याचा आरोप करून नातेवाइकांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे गुन्हा दाखल होऊन तपास करताना क्रूरकर्मा डॉ. खिद्रापुरे याच्या कत्तलखान्याचा उलगडा झाला. पोलिसांनी काल म्हैसाळ येथे ओढ्याजवळ खोदाई करून 19 भ्रुणांचे अवशेष ताब्यात घेतले. वाढ झालेले भ्रूण पुरून टाकले जात होते. दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीचे भ्रूण टॉयलेटमध्येच ऍसिड ओतून नष्ट केले जात होते. 

पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, सिव्हिल सर्जन संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे आणि अन्न व औषध प्रशासनच्या अधिकाऱ्यांनी आज म्हैसाळ येथे भेट दिली. खिद्रापुरेकडे होमिओपॅथीची पदवी असताना ऍलोपॅथीची औषधे, इंजेक्‍शन, सर्जरीची हत्यारे मिळून आली. हॉस्पिटलमध्ये कोण कोण डॉक्‍टर गर्भपात आणि भ्रूणहत्येसाठी येत होते, याचे तारखेप्रमाणे पुरावे हाती लागले. ते पोलिसांनी पंचांसमक्ष जप्त केले. खिद्रापुरे 2008 पासून भ्रूणहत्या करत असल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे येत आहे. त्याच्याकडे काही डॉक्‍टर बाहेरून येत होते. हॉस्पिटलच्या तळघरात दोन रूम आणि बाथरूम असल्याचे दिसून आले. 

खिद्रापुरे पत्नीसह फरारी झाला आहे. त्याच्याविरुद्ध वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 (एमटीपी) आणि बॉंबे नर्सिंग होम ऍक्‍ट ही अतिरिक्त कलमे लावली आहेत. नर्सिंग ऍक्‍टबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हंकारे यांनी पोलिसांना अहवाल सादर केला आहे. एमटीपी ऍक्‍टनुसार तपासात सिव्हिल सर्जन यांच्या अध्यक्षतेखालील समिती पोलिसांना मदत करत आहे. फरारी खिद्रापुरे दांपत्याच्या अटकेसाठी पोलिसांची पाच पथके रवाना झाली आहेत. मिरज पोलिसांची तीन पथके, एलसीबी आणि गुंडाविरोधी पथक दोघांच्या मागावर आहे. 

खिद्रापुरेने कमी कालावधीचे गर्भ टॉयलेटमध्येच नष्ट केल्याची माहिती मिळाल्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीने पाइपलाइन तपासली. सेफ्टी टॅंकही उघडून पाहिला. आजच्या खोदकामात कोठेही भ्रूण मिळाले नाही. पोलिस अधीक्षक शिंदे, सिव्हिल सर्जन साळुंखे, आरोग्य अधिकारी हंकारे आणि वैद्यकीय समिती आज तब्बल सहा तास म्हैसाळमध्ये तळ ठोकून होती. 

आरोग्य विभागाची समिती स्थापन 
आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक अर्चना पाटील यांच्या आदेशानुसार समिती स्थापन करण्यात आली आहे. सिव्हिल सर्जन साळुंखे, वैद्यकीय अधीक्षक व्ही. आर. जाधव, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी बी. एस. गिरीगोसावी, स्त्री-रोगतज्ज्ञ अशोक शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी विजय सावंत अशी पाच जणांची समिती आहे. एमटीपी कायद्यानुसार तपासात ही समिती पोलिसांना मार्गदर्शन करेल. संबंधितांना बचावाची संधी मिळणार नाही, यासाठी भक्कम पुरावे गोळा करून देण्यात मदत करण्यात येणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. 

शास्त्रीय पुराव्यांचा शोध 
हा अतिशय संवेदनशील गुन्हा आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सक्षम पुरावे गोळा करण्यावर पोलिसांचा भर आहे. सध्या प्राथमिक स्तरावर पोलिस तपास आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने शास्त्रीय पुरावे गोळा करणे आवश्‍यक आहे. सर्व बाजूंनी या गुन्ह्याचा तपास सुरू आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले. 

भ्रूणहत्येचे केंद्रच 
खिद्रापुरेच्या हॉस्पिटलमध्ये जिल्ह्यातून तसेच शेजारील कोल्हापूर, कर्नाटक आणि आंध्रातूनही भ्रूणहत्येसाठी जोडपी येत असल्याचे स्पष्ट होत आहे. खिद्रापुरेकडे सोनोग्राफी मशीन नाही. त्यामुळे अन्य ठिकाणचे डॉक्‍टर सोनोग्राफी करून गर्भपातासाठी खिद्रापुरेकडे रुग्ण पाठवत असावेत, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. 

दिवसभरात... 
पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खिद्रापुरे याच्या हॉस्पिटलची कसून झडती 
पोलिसांनी म्हैसाळमधून तिघांना चौकशीसाठी घेतले ताब्यात 
 डॉ. खिद्रापुरे पत्नी मुलासह फरारी 
 पाच स्वतंत्र पथकांद्वारे खिद्रापुरे दाम्पत्याचा शोध 

भ्रूण अंशाची डीएनए चाचणी होणार 
क्रूरकर्मा खिद्रापुरेने हत्या केलेले भ्रूण स्त्री की पुरुष होते, याच्या तपासासाठी पोलिसांनी काल ताब्यात घेतलेल्या भ्रूण अंशांची डीएनए चाचणी केली जाणार आहे. हे अंश सध्या मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत आहेत. तेथून ते दोन दिवसात फॉरेन्सिक लॅबकडे पाठण्यात येणार आहेत. आरोपींविरुद्ध भक्कम पुरावा गोळा करण्यासाठी डीएनए चाचणी केली जाईल. 

"रॅकेट' मध्ये अनेक  डॉक्‍टर ः वर्षा देशपांडे 
मिरज ः म्हैसाळमधील भ्रूण हत्याकांडात डॉक्‍टर म्हणून केवळ डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे हाच एकमेव सहभागी नाहीत तर सांगली, मिरज, म्हैसाळ, वाळवा, शिराळा, आणि कर्नाटकातील अनेक डॉक्‍टरांचे "रॅकेट' यात सहभागी आहे, असा आरोप स्त्री भ्रूण हत्याविरोधी चळवळीतील आघाडीच्या कार्यकर्त्या वर्षा देशपांडे (सातारा) आज म्हैसाळ येथे केला. 
वर्षा देशपांडे यांनी आज म्हैसाळ येथे भेट दिली. त्यानंतर येथे त्या "सकाळ' शी बोलत होत्या. त्या म्हणाल्या,""डॉ. खिद्रापुरेने आतापर्यंत शेकडो अर्भकांचे हत्याकांड घडविल्याचा संशय आहे. डॉ. खिद्रापुरे एकटा हत्याकांडात सहभागी नाही. त्याच्याकडे सापडलेली कागदपत्रे, संगणकातील नोंदी, पैशाचे व्यवहार, औषधाचे नमुने यासह अनेक पुराव्यांवरून "रॅकेट' असल्याचे सिद्ध होते आहे. यासाठी विशिष्ट सांकेतिक भाषा वापरली जात होती.'' त्या म्हणाल्या,""म्हैसाळ येथील भ्रूणहत्याकांड भयानक आहे. पोलिसांनी याच्या मुळाशी जाऊन हे "रॅकेट' उद्‌ध्वस्त करणे आवश्‍यक आहे. पोलिस, आरोग्य आणि औषध प्रशासनाच्या संगनमताशिवाय असा प्रकार राजरोसपणे घडणे अशक्‍य आहे.'' 

म्हैसाळ - येथील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेच्या दवाखान्यातील अर्भक हत्याकांडप्रकरणी आज स्त्री-भ्रूणहत्याविरोधी चळवळीच्या नेत्या वर्षा देशपांडे यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या नेत्या नीता केळकर आणि वरिष्ठ शासकीय आधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. गर्भपातावेळी मृत्यू झालेल्या विवाहितेच्या भावानेही आज येथे येऊन आपली व्यथा मांडली. दरम्यान, हत्याकांडाच्या निषेधार्थ उद्या (ता. 7) म्हैसाळ बंदचे आयोजन करण्यात आले आहे. 

वर्षा देशपांडे म्हणाल्या, ""हे शेकडो अर्भकांचे हत्याकांड उघडकीस येण्यासाठी स्वाती प्रवीण जमदाडे यांचा बळी जावा लागला, हेच धक्कादायक आहे. रुग्णालयाची पाहणी केली असता त्यामधे गर्भपात होतात हे सिद्ध करणारे अनेक तांत्रिक पुरावे अजूनही उपलब्ध आहेत. गर्भपातासाठीचा बंकर, तेथील रचना, अद्यापही असलेली शस्त्रे, औषधे हे सगळे वस्तुस्थितीजन्य पुरावे हे कालपरवाचे नाहीत, तर या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून हे भयानक कृत्य चालत असल्याचे जळजळीत वास्तव आहे.'' 

दरम्यान, नीता केळकर म्हणाल्या, ""या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून सीआयडी चौकशीची मागणी करणार आहे. अशा नराधम डॉक्‍टरला पाठीशी घालणाऱ्या कार्यकर्त्याला आम्ही पाठीशी घालणार नाही. त्याच्या विरुद्धही पक्षाअंतर्गत कारवाई करू.'' 

केवळ मुलगा होण्यासाठी माझ्या बहिणीचा बळी 
स्वाती जमदाडे यांचे भाऊ अमर सुधाकर जाधव म्हणाले, ""माझ्या बहिणीस जमदाडे कुटुंब लग्नानतंर पहिली मुलगी झाल्यापासून छळत होते. छळ कमी होण्यासाठी आम्ही किमान अर्धा किलो सोने आणि पंधरा ते वीस लाख रुपये दिले. तरीही छळ थांबला नाही. मला राखी बांधण्यासही सासरच्या लोकांची परवानगी नसे. लग्नानतंर तिने मला एकदाही राखी बांधली नाही. केवळ मुलगा होण्यासाठी माझ्या बहिणीचा बळी गेला.'' 

आरोग्य विभागाचा कारभार 
शेकडो अर्भकांचे हत्याकांड केल्याचा आरोप असणाऱ्या डॉ. खिद्रापुरे याच्या विरुद्ध 22 मे 2016 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे निनावी तक्रार आली. या तक्रारीस अनसरून 19 मे 2016 रोजी या दवाखान्यावर छापा टाकण्यात आला. छाप्यावेळी काहीही आक्षेपार्ह मिळाले नसल्याचा अहवाल या पथकाने महसूल प्रशासनासह आरोग्य विभागास दिला. याच वेळी डॉ. खिद्रापुरेकडून आपण अशा प्रकारचे कोणतेही गैरकृत्य करत नसल्याचे लिहूनही घेण्यात आले. स्वाती जमदाडेच्या मृत्यूनतंर डॉक्‍टर फरारी झाला. त्यानंतर त्याच्या दवाखान्याच्या दारावर आरोग्य परवाना सादर करावा, अशी नोटीस आरोग्य विभागाने चिकटवली. एकूणच आरोग्य विभागाचे हे सगळेच कारनामे आता संशयाच्या घेऱ्यात सापडले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com