इच्छुकांची सभापतिपदासाठी फिल्डिंग

इच्छुकांची सभापतिपदासाठी फिल्डिंग

अजित पवार यांच्या दौऱ्यानंतर येणार वेग; नेतेमंडळींकडूनही व्यूहरचना
सातारा - जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा तिढा सुटल्याने आता इच्छुकांनी सभापतिपदांकडे मोर्चा वळविला आहे. आमदार, नेत्यांमार्फत इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सदस्यांचा सत्कारासाठी रविवारी (ता. २६) साताऱ्याला येणार आहेत. या दौऱ्यानंतर इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला अधिक गती मिळेल, असा अंदाज आहे. 

जिल्हा परिषदेतील विविध समित्यांच्या सभापतींच्या निवडी ता. एक एप्रिल रोजी होणार आहेत. अध्यक्षपदी संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्षपदी वसंतराव मानकुमरे यांच्या निवडी झाल्याने उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत असणारे राजेश पवार, मानसिंगराव जगदाळे यांचा पत्ता कट झाला.

पाटणला राष्ट्रवादीचा आमदार नसल्याने राष्ट्रवादीला तेथे ताकद देण्यासाठी राजेश पवारांचे नाव निश्‍चित होते. मात्र, ऐनवेळी निर्णय बदलल्याने खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या मानकुमरेंना पद मिळाले. त्यातून जगदाळे नाराज झाले. आमदार बाळासाहेब पाटील यांनीही नाराजी व्यक्त केली. त्यामुळे पाटण, कऱ्हाडला सभापतिपद देण्याचाही विचार राष्ट्रवादीत सुरू आहे. सध्याच्या स्थितीत शिक्षण, कृषी ही सभापतिपदे पाटण, कऱ्हाडकडे जाण्याची शक्‍यता आहे. माजी आमदार (कै.) सदाशिवराव पोळ यांच्या दोन स्नुषा सभागृहात आल्या असल्याने त्यांच्यापैकी भारती यांना महिला व बालकल्याण समितीचे सभापतिपद देण्याचे नक्‍की असल्याची चर्चा आहे. मात्र, राजकारणात सर्व काही ‘गृहीत’ धरता येत नाहीत, हेही खरे. 

गत सभापती निवडीत अजित पवार यांचा शब्द ‘वजनदार’ ठरले होते. त्यांना माणणारे अमित कदम, वैशाली फडतरे यांची बाजी ठरली होती. त्यानंतर सभापती बदलातही अजित पवार यांनी शब्द दिल्याने बदलाचे वारे वेगाने वाहिले होते. आता ते रविवारी साताऱ्याला येणार असून, त्यावेळी नवनिर्वाचित सदस्यांचे सत्कार होणार आहेत. या कार्यक्रमातही इच्छुकांकडून मोर्चेबांधणी होण्याची शक्‍यता आहे.

सभापतिपदासाठी चर्चेतील सदस्य...
शिक्षण व कृषी समिती - राजेश पवार (ता. पाटण), मानसिंगराव जगदाळे (ता. कऱ्हाड), मनोज पवार (ता. खंडाळा).
महिला व बालकल्याण समिती - भारती पोळ (ता. माण).  
समाजकल्याण समिती - शिवाजी सर्वगोड (ता. खटाव), बापू जाधव (ता. पाटण), मधू कांबळे (ता. सातारा), वनिता पलंगे (ता. पाटण), नीता आखाडे (ता. महाबळेश्‍वर), रंजना डगळे (ता. वाई), कल्पना खाडे (ता. खटाव).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com