अंतिम अधिसूचनेनंतर हद्दवाढीत निवडणुका

शैलेन्द्र पाटील
रविवार, 26 मार्च 2017

सातारा - नव्याने निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्यांना पदाचा लाभ किती दिवस मिळणार? शाहूपुरीची आगामी निवडणूक होणार का? किती लोकसंख्येचा वॉर्ड असणार? या व अशा अनेक प्रश्‍नांचे काहूर नव्याने समाविष्ट होणाऱ्या भागातील राजकीय मंडळींच्या मनात माजले आहे.

सातारा पालिकेच्या हद्दवाढीची अंतिम अधिसूचना शासन दोन महिन्यांत काढेल, असा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे. अंतिम अधिसूचनेनंतर त्यापुढे होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका व सदस्यत्व आपोआपच रद्द होईल, असे या तज्ज्ञांचे मत आहे. 

सातारा - नव्याने निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्यांना पदाचा लाभ किती दिवस मिळणार? शाहूपुरीची आगामी निवडणूक होणार का? किती लोकसंख्येचा वॉर्ड असणार? या व अशा अनेक प्रश्‍नांचे काहूर नव्याने समाविष्ट होणाऱ्या भागातील राजकीय मंडळींच्या मनात माजले आहे.

सातारा पालिकेच्या हद्दवाढीची अंतिम अधिसूचना शासन दोन महिन्यांत काढेल, असा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे. अंतिम अधिसूचनेनंतर त्यापुढे होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका व सदस्यत्व आपोआपच रद्द होईल, असे या तज्ज्ञांचे मत आहे. 

राज्य शासनाने बुधवारी (ता. २२) सातारा पालिकेच्या हद्दवाढीची प्रारंभी अधिसूचना काढली. ३० दिवसांत त्यावर हरकती ऐकूण घेतल्या जातात. त्यानंतर शासन हद्दवाढीची अंतिम अधिसूचना काढते, अशी याबाबतची प्रशासकीय प्रक्रिया आहे. प्रारंभिक अधिसूचनेमुळे सातारकरांसह लगतच्या उपनगरांतील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या संदर्भात पालिकेचे माजी उपाध्यक्ष अविनाश कदम यांनी सांगितले, ‘‘हद्दवाढीच्या निर्णयाचा परिणाम विलासपूर ग्रामपंचायत, गोडोली गण, शाहूपुरी ग्रामपंचायत, शाहूपुरी व कोंडवे गण, तसेच खेड ग्रामपंचायतीअंतर्गत पिरवाडी आणि खेड गणावर होणार आहे. गोडोली व शाहूपुरी गण पूर्णपणे रद्द होणार आहेत. शाहूपुरी ग्रामपंचायतीचा काही भाग कोंडवे गणात, तर नियोजित हद्दवाढीत येऊ घातलेला पिरवाडीचा भाग खेड गणात मोडतो. अर्थात हे प्रमाण ५० टक्‍क्‍यांपेक्षाही फारच कमी असल्याने या दोन्ही गणातून पंचायत समितीवर निवडून गेलेल्यांचे सदस्यत्व सुरक्षित राहणार आहेत.’’

नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत काही उमेदवारांनी प्रतिष्ठेपायी २५ ते ३० लाख रुपयांचा चुराडा केला. ग्रामपंचायत निवडणुकीतही उमेदवारांना काही लाख रुपये ‘मोजावे’ लागतात. दोनच वर्षांपूर्वी विलासपूर ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. पंचायत समिती निवडणुकीलाही महिना उलटून गेला आहे. या सदस्यत्वाचा ‘आनंद’ घ्यायच्या आधीच सदस्यत्व संपुष्टात येणार असल्याने निवनिर्वाचित सदस्य चिंतेत आहेत. विलासपूर व शाहूपुरी ग्रामपंचायतींचे क्षेत्र सातारा पालिकेत गणले जाणार आहे. खेडचा पिरवाडीमधील वॉर्ड रद्द होऊन पालिकेत येणार आहे. 

शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाल जुलै २०१७ मध्ये पूर्ण होतो. त्यापूर्वी हद्दवाढीचा अंतिम निर्णय झाल्यास आपोआपच शाहूपुरीची निवडणूक रद्द होणार आहे. शाहूनगर पूर्वीपासूनच त्रिशंखू अवस्थेत असल्याने त्यांना कोणतेच स्थानिक प्राधिकरण नाही. दरे गावठाणाच्या क्षेत्रातील महादरे, केसकर कॉलनी, मोरे कॉलनी, समाधीचा माळ- भैरोबा पायथा हे क्षेत्र पालिका हद्दीत समाविष्ट होणार आहे. दरे ग्रामपंचायतीचा हा केवळ काही भाग आहे. दरे ग्रुप ग्रामपंचायतीचे अस्तित्व कायम राहणार आहे. 

हद्दवाढ झालेल्या भागात नव्याने प्रभाग रचना
सातारा पालिकेचे माजी मुख्याधिकारी व पुणे महापालिकेचे उपायुक्त सतीश कुलकर्णी यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले, की ‘‘हद्दवाढीसंदर्भात शासनाच्या अंतिम अधिसूचनेनंतर वाढीव क्षेत्रातील संभाव्य निवडणुका रद्द केल्या जातात. त्याठिकाणी नव्याने प्रभाग रचना होऊन नागरिकांतून नगरसेवक निवडून दिला जातो.’’ ‘‘नगरविकास विभागाच्या हद्दवाढीच्या अंतिम अधिसूचनेबरोबरच ग्रामीण यंत्रणेची अधिसूचना निघते. त्याद्वारे ग्रामीण यंत्रणा पालिका हद्दीत समाविष्ट झालेला भाग हा ग्रामीण विभागातून वगळण्यात आल्याचे जाहीर करते. त्यामुळे बाकीचे प्रश्‍न आपोआप निकालात निघतात,’’ असे साताऱ्याचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी नमूद केले.

Web Title: The final notification area increase election