..अखेर मेडिकल कॉलेजला जागा मिळाली ; 25 एकर जागा कॉलेजसाठी

Finally got land for Medical Colleges in satara
Finally got land for Medical Colleges in satara

सातारा : साताऱ्याचे वैद्यकीय आरोग्य सुधारण्यासाठी मैलाचा दगड ठरणारा आणि गेल्या अनेक वर्षांपासून पडलेला मेडिकल कॉलेजच्या जागेच्या प्रश्‍न आज अखेरीस मार्गी लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मे 2017 मध्ये सातारकरांना दिलेला शब्द आज खरा केला. कृष्णा खोरे विभागाची 25 एकर जमीन देण्याचा कायमस्वरूपी मेडिकल कॉलेजला देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला आहे.       'सकाळ'ने यासाठी मुख्यमंत्र्यांकडेही सातत्याने पाठपुरावा केला. 

सातारा जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले. मात्र, ते कोठे उभारायचे, यावरून अक्षरश: कॉलेजच सलाइनवर ठेवले गेले. गत राज्य सरकारच्या काळात जिल्ह्यातील मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री असतानाही मेडिकल कॉलेजसाठी जागा देताना अक्षरश: "ख्योळ' सुरू ठेवला गेला. सात वर्षे लोटली तरी सातारकरांच्या आरोग्यासाठी 'माइलस्टोन' ठरू पाहणाऱ्या या कॉलेजला जागा देण्याचा निर्णय झाला नाही. विद्यमान सरकारच्या काळातही त्याला गती मिळत नव्हती. त्यामुळे "मुख्यमंत्रीसाहेब, मेडिकल कॉलेजचे तेवढं बघा!' या आशयाखाली "सकाळ'ने मे 2017 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साताऱ्यात आले, त्यादिवशी बातमी प्रसिध्द केली. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी 18 मे 2017 रोजी महिनाभरात मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न सोडविणार, असे आश्‍वासन दिले. मात्र, त्यावर वेगाने पावले उचलली गेली नाहीत. यादरम्यान ता. 24 फेब्रुवारीला मुख्यमंत्री सातारा दौऱ्यावर आले असता "सकाळ' ने पुन्हा एकदा "फडणवीससाहेबांचा महिना 283 दिवसांचा?' या आशयाखाली तीव्रपणे लोकभावना मांडल्या. 

शिवाय, "सकाळ'च्या प्रतिनिधींनी व्यक्‍तिगतरित्या मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न पुन्हा एकदा मांडला. त्यावर खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात लवकरच त्यास मान्यता देऊ, अशी ग्वाही दिली. 

अखेरीस मेडिकल कॉलेजला जागा देण्याचा दिवस आज उजाडला. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वैद्यकीय महाविद्यालयास 25 एकर जागा कायमस्वरूपी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न आता मार्गी लागणार आहे. यामुळे गोरगरिबांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी "माइलस्टोन' ठरणारे मेडिकल कॉलेज लवकरच उभारले जाईल, अशी सातारकरांची अपेक्षा निर्माण झाली आहे. 

मुख्यमंत्र्यांचे ट्‌विट... 
* सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 25 एकर जागा कायमस्वरूपी 
* महाराष्ट्र कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाची जागा 
* गरीब, गरजू रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार 
* गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनाही चांगल्या संधी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com