शेतीपूरक उद्योगातील संधी शोधा - सुनंदाताई पवार

शेतीपूरक उद्योगातील संधी शोधा - सुनंदाताई पवार

सांगली - शेती चिरंतन व्यवसाय आहे; मात्र आज समाजात निराशेचे चित्र आहे. शेती, शेतीपूरक उद्योगातील संधी शोधल्या पाहिजेत. तेच बलस्थान आहे, असे मत बारामतीच्या ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्‍वस्त सौ. सुनंदाताई पवार यांनी व्यक्त केले. येथे राजमती भवनात त्यांच्या हस्ते आदर्श माता पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर त्या "शेती उद्योग आणि महिलांचा सहभाग' या विषयावर बोलत होत्या. लठ्ठे एज्युकेशन सोसायटी व राजमती कन्या महाविद्यालयाच्यावतीने समारंभ झाला.

दानशूर श्रीमती कृष्णाबाई मगदूम, दुधगावचे हुतात्मा जवान नितीन कोळी यांच्या आई सुमन, क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या आई स्मिता यांना आदर्श माता पुरस्काराने गौरवण्यात आले. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुरेश पाटील, माजी आमदार शरद पाटील, खजिनदार विजयकुमार सकळे, प्राचार्य डॉ. मानसी गानू उपस्थित होत्या.

सौ. पवार म्हणाल्या, ""बाजारपेठेचा अभ्यास करूनच शेतीत भाज्यांची लागवड झाली पाहिजे. पॅकबंद भाजी वितरणाची व्यवस्था निर्माण केली पाहिजे. शहरालगतच्या गावांतून अशी पॅकबंद भाजी वितरणाची साखळी तयार करता येईल. असा भाजीपाला जास्त काळ टिकतो. ग्रामीण भागाच्या अर्थकारणात महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे. छोटा व्यवसाय, उद्योगांपासून सुरवात केली पाहिजे. महाराष्ट्रात असे अनेक यशस्वी प्रयोग झालेत, त्यांचा अभ्यास झाला पाहिजे. महिला उत्तम शेती करू शकतात; पण त्या नेहमीच पडद्याआड राहतात. दूध व्यवसायातील अनेक नवे प्रयोग आता आत्मसात केले पाहिजेत. शिकलेल्या मुलींचा राजकारण, समाजकारणात सहभाग वाढला पाहिजे. ती वेळ आली आहे. रूढी-परंपरांच्या जोखडातून बाहेर पडले पाहिजे. उपेक्षेची पर्वा न करता महिलांनी आता मानसिकता बदलून पुढे यावे.''

स्मिता मानधना म्हणाल्या, ""स्मृतीने भारतीय क्रिकेट संघात खेळून सांगलीचा लौकिक वाढवला. तिच्या यशाने मला हा पुरस्कार मिळत आहे. तिच्यामुळे आमची ओळख निर्माण झाली.'' 

माजी आमदार शरद पाटील, विजयकुमार सकळे यांची भाषणे झाली. सुरेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. व्ही. डी. कोरुचे यांनी आभार मानले. प्रा. ए. ए. चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com