पहिली नोकरी... पहिला पगार... आणि शकायना 

पहिली नोकरी... पहिला पगार... आणि शकायना 

कोल्हापूर - पहिली नोकरी आणि तिथला पहिला पगार म्हणजे त्याला लाखाचे मोल असते. त्या पहिल्या पगारातून स्वतःसाठी, कुटुंबासाठी काही तरी घेण्याची साहजीकच प्रत्येकाची भावना असते. त्यात तसे वावगेही काही नसते, पण शकायनासारखी एखादी मुलगी त्याला अपवाद ठरते आणि ती आपला पहिला सगळा पगार 35 वंचित मुलांच्या नव्या कपड्यांसाठी खर्च करते... एखाद्या कथेतला प्रसंग वाटावा असे हे सारे कोल्हापुरात प्रत्यक्ष घडले आहे. शकायना अविनाश मोरे या मुलीने हे करून दाखवले आहे. मात्र मी एक पगार इतरांसाठी खर्च केला त्यात फार मोठे काहीच केलेले नाही, अशीच तिची या क्षणी विनम्र भावना आहे. 

शकायना ही अतिशय साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणी. वडील लहानपणीच वारलेले. आई परिचारिका. आईने शकायना व तिच्या लहान बहिणीला वाढवले. या वाटचालीत तीने खूप चटके अनुभवले. या अनुभवाने खूप लहान वयातच समंजस झालेल्या शकायनाने एक दिवस शिये येथील करुणालयात असलेल्या एडस्‌बाधित मुलांच्या सहवासात दिवस घालवला. तिने या मुलांसाठी आपल्या परीने काहीतरी करायचे ठरवले, पण ती स्वतः काही मिळवत नव्हती. त्यामुळे त्या मुलांच्या सोबत राहून त्यांच्याशी गप्पा मारणे, त्यांच्याशी मौजमजा करणे जेणेकरून ती मुले त्यांचे दुःख विसरावीत एवढेच ती करू शकत होती. 

ती बी.एस्सीनंतर नर्सिंगला गेली. तिथे प्रथम वर्गात उत्तीर्ण झाली आणि तिला डी. वाय. पाटील नर्सिंग स्कूलला नोकरी मिळाली. पहिला पगार हाती आला आणि त्याच क्षणी तिने या पगारातून 35 वंचित मुलांना नवीन कपडे घेण्याचा निर्णय घेतला. तिने ताबडतोब करुणालयाचे आनंद बनसोडे यांना निर्णय सांगितला. त्यांनी सर्व मुलांच्या कपड्याचे माप तिला कळवले. शकायनाने कपडे खरेदी केली. काल ख्रिसमसच्या निमित्ताने तिने सर्व मुलांना कपडे घातली आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून आपला पहिला पगार अतिशय योग्य ठिकाणी खर्ची पडल्याचे समाधान शकायनाला मिळाले. 

इंडियन आर्मीत सेवेत 
चांगली भावना घेऊन जगलं की चांगलच कसं घडू शकते याचा प्रत्यय शकायनाने घेतला. तिला पहिली नोकरी डी. वाय. पाटील नर्सिंग कॉलेजला लागली. काही दिवसांपूर्वीच तिने इंडियन आर्मीत नर्सिंगसाठी मुलाखत दिली आणि तिची आर्मीत निवड झाली. या महिनाभरात ती इंडियन आर्मित सैनिकांच्या सेवेत असेल. 

करुणालयाला अनेकजण भेट देतात. आपल्यापरीने देणगी देतात. मदतीचा शब्द देतात, पण शकायनासारखी एखादी मुलगी पहिला पगार वंचित मुलांसाठी देते. तिची रक्कम किती महत्त्वाची नाही, पण तिची भावना लाखमोलाची आहे. 
आनंद बनसोडे करुणालय संचालक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com