अपघातानंतर उपचार महत्त्वाचे, मदतीसाठी पुढे या

police
police

सोलापूर : अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यासाठी देणाऱ्या पालकांना एक हजार रुपये दंड आणि न्यायालयात खटला दाखल करून कारावासाची शिक्षाही होऊ शकते. गुन्हा दाखल झाला तर अनेक अडचणी येतात म्हणून प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. अपघात होऊ नये यासाठी सर्वांनी दक्ष राहायला हवे. मोठ्यांसह विद्यार्थ्यांनीही वाहतुकीच्या नियमांची माहिती करून घ्यावी. अपघात करून पळून जाणे गुन्हा आहे. रस्त्यावर अपघात झाल्याचे दिसले तर मदतीसाठी पुढे या. अपघातानंतर वेळेत उपचार महत्त्वाचे आहेत, असे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी सांगितले. 

"सकाळ'च्या वतीने मंगळवारी जुळे सोलापुरातील केएलई शाळेत फुल टू स्मार्ट उपक्रम घेण्यात आला. यानिमित्ताने वाहतूक जागर कार्यक्रम झाला. या वेळी मंचावर वाहतूक शाखेच्या सहायक पोलिस आयुक्त वैशाली शिंदे, "सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, वितरण व्यवस्थापक संजय भंडारी, मुख्याध्यापक शिवानंद शिरगावे आदी उपस्थित होते. 

सहायक आयुक्त वैशाली शिंदे म्हणाल्या, अपघातानंतर प्रत्येकवेळी मोठ्या वाहनाला दोष दिला जातो. प्रत्येकाने वाहतूक नियम माहिती करून घेतल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल. सहायक पोलिस निरीक्षक पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांनी लर्निंग लायसन्स असल्याशिवाय वाहन चालवू नये. एल बोर्ड लावणे आवश्‍यक आहे. आरसी बुक, लायसन्ससह वाहनाची इतर कागदपत्रे सोबत बाळगावी. पीयूसी असल्याशिवाय वाहन चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. महामार्गावर 80 पेक्षा अधिक वेगाने वाहन चालवू नये तर शहरात वाहनाचा वेग 40 पेक्षा अधिक नको. दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट वापरावे. मोबाईलवर बोलू नये, मोबाईल वापरू नये, वाहन चालविताना फोनवर बोलण्यासाठी किंवा गाणी ऐकण्यासाठी हेडफोनचा वापर करू नये. 

चारचाकी वाहनाला गॉगल ग्लास लावण्यास बंदी आहे. सोलापुरात शिवाजी चौक, संभाजी चौकासह प्रमुख चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना ई-चलन पद्धतीने दंडात्मक कारवाई केली जात आहे, असेही सहायक पोलिस निरीक्षक पाटील यांनी सांगितले. या वेळी आदित्य शहा, महेश मंथा, ऋतूराज बडदाळे, अथर्व गायकवाड आणि संजना सोमाणी या विद्यार्थ्यांनी वाहतुकीसंदर्भातील प्रश्‍न विचारले. 

हे लक्षात असू द्या.. 
- अपघाताच्या ठिकाणी फोटो, सेल्फी काढू नका 
- वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा 
- वाहनाच्या नंबर प्लेटवर नावे लिहू नयेत 
- कार चालवताना सीट बेल्ट आवश्‍यक आहे 

लहान मुले पळवणारी टोळी आली नाही. या संदर्भात सोशल मीडियावरून अफवा पसरवू नका. खात्री न करता सोशल मीडियावर पोस्ट शेअर करणे, फॉरवर्ड करणे गुन्हा आहे. आपल्या परिसरात संशयास्पद व्यक्ती दिसली तर पोलिसांना कळवा. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक आणि कारावासाची शिक्षा होऊ शकते. 
- विजयानंद पाटील, सहायक पोलिस निरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com