बेकायदा दारूविक्रीबद्दल साताऱ्यात पाच अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

सातारा - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्ग आणि राज्य मार्गालगतची दारू दुकाने बंद झाल्यानंतर त्याच परिसरात बेकायेदशीर दारूविक्री करणाऱ्या पाच जणांना शहर पोलिसांनी आज अटक केली. 

सातारा - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्ग आणि राज्य मार्गालगतची दारू दुकाने बंद झाल्यानंतर त्याच परिसरात बेकायेदशीर दारूविक्री करणाऱ्या पाच जणांना शहर पोलिसांनी आज अटक केली. 

महामार्ग आणि राज्य मार्गालगत असणारी दारू दुकाने आणि बिअरबार बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यासाठी 31 मार्चची मुदत देण्यात आली होती. न्यायालयाच्या या आदेशानुसार सातारा जिल्ह्यातील सुमारे 502 दारू दुकाने आणि बार बंद झाले आहेत. हे बार आणि दुकाने बंद झाली असली, तरी त्या परिसरात दारूची बेकायदेशीर विक्री करण्याच्या प्रयत्नात काही जण होते. याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी अशा परिसरात पाळत ठेवण्याचे निर्देश दिले होते. 

त्यानुसार शहर पोलिस पाहणी करत असताना गोळीबार मैदानाजवळील दारू दुकानापासून सातारा पोलिसांनी प्रतीक चंद्रशेखर निकम (रा. अजिंक्‍य कॉलनी), सिद्धार्थ किसन गव्हाळे (रा. प्रतापसिंहनगर), अनिल बाबूराव मोहिते (रा. लक्ष्मीटेकडी), प्रशांत मानसिंग बल्लाळ (रा. गोवे, ता. सातारा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन हजार रुपयांच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. 

याच दरम्यान पोलिसांनी महामार्गालगत असणाऱ्या "एनएच 4 रेस्टो' या हॉटेलजवळून कृष्णा गोपीनाथ नाईक (रा. खेड) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी दारूच्या तीन हजार 700 रुपयांच्या बाटल्या आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

Web Title: Five arrested for illegal alcohol sale Satara