ध्वजस्तंभावर आत्मदहनाचा प्रयत्न

ध्वजस्तंभावर आत्मदहनाचा प्रयत्न

सातारा - सकाळचे ११ वाजताच तो आज जिल्हाधिकारी कार्यालयात धावत धावतच आला. गळ्यात मागण्यांचा फलक अडकवलेला, तो सर्वांचे लक्ष वेधून घेत असतानाच, हातात रॉकेलची बाटली, लायटर घेऊन तो जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील ध्वजस्तंभावर सरसर चढला आणि कर्जमाफीसह बैलगाड्या शर्यती सुरू करा, अशा घोषणांसह त्याने आत्मदहनाचा इशारा दिला. वाळवा (जि. सांगली) येथील विजय जाधव यांच्या या अचानक पवित्र्याने प्रशासन व पोलिसांची मात्र चांगलीच त्रेधा उडाली.

शासनाने बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली आहे. ती उठवावी, यासाठी शर्यतीप्रेमी शेतकरी सातत्याने आंदोलन करीत आहेत. तसेच शेतकऱ्यांचे कर्जमाफ करावे, अशीही मागणी जोर धरत आहे. या मागण्यांसाठी श्री. जाधव यांनी आज या आंदोलनाचा मार्ग पत्करला. जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजस्तंभावरच आत्मदहन करण्याचा त्याचा इरादा होता. या आंदोलनाची त्याने कोणतीही सूचना प्रशासनास दिली नव्हती. अचानक केलेल्या या आंदोलनाने प्रशासकीय अधिकाऱ्यांची धावपळ झाली. 
 

याबाबतची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, अग्निशामक बंब, रुग्णवाहिका, उंच शिडी असलेली पालिकेची गाडी आणि पोलिसांच्या फौजफाट्यासह जिल्हाधिकाऱ्यांच्या आवारात धावपळ सुरू झाली. यंत्रणेने आंदोलक जाधव यास ध्वजस्तंभावरून खाली उतरण्याच्या सूचना केल्या. मात्र, श्री. जाधव याने या विनवण्यांना दाद दिली नाही. उलट अंगावर रॉकेल ओतून घेऊन पेटवून घेण्याची भीती तो पोलिसांना दाखवत होता. प्रथम जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांना फोन लावा, माझ्या मागण्या सांगा, असा आग्रह त्याने धरला. ‘कर्जमाफी व बैलगाड्या शर्यतीवरील बंधने उठविण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी फसविले आहे. मी आंदोलन करत राहणार आहे, असे तो म्हणत होता. तसेच त्याची घोषणाबाजीही सुरू होती. अनेकवेळा पोलिस निरीक्षक पाटील यांनी शिष्टाई करत तुमच्या आंदोलनाची कोणतीही सूचना तुम्ही प्रशासनाला दिलेली नाही. मला केवळ निवेदन द्या आणि आंदोलन करा. नाहीतर खाली या, आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करू. तुम्हाला कोणीही अटक करणार नाही, असे सांगितले. त्यावर बराच वेळ श्री. पाटील व जाधव यांच्यात खल चालला होता. अखेर श्री. पाटील यांच्या शिष्टाईला यश आले व सुमारे दीड तासानंतर आंदोलक जाधव ध्वजस्तंभावरून खाली उतरला. त्यानंतर त्याने प्रसारमाध्यमांपुढे आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. 

‘‘गेली चार ते पाच वर्षे मी आंदोलन करतोय. बैलगाडी ओढत मुंबईपर्यंत गेलो. मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासने दिली. पण, कोणताही पाठपुरावा झाला नाही. २५ जानेवारीला सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्याकडेही दुर्लक्ष केले. राष्ट्रध्वजातील हिरवा रंग जो शेतकऱ्यांचे प्रतीक आहे, त्या रंगाप्रमाणे शेतकऱ्यांचे आयुष्य फुलले पाहिजे. प्रशासन मात्र, कर्जमाफी करत नाही. राष्ट्रध्वजाचा पूर्ण सन्मान ठेऊन मी आंदोलन करतोय. पण, जिल्हाधिकाऱ्यांनी एक फोन केला नाही. हेच एखाद्या राजकीय पुढाऱ्याचे आंदोलन असते तर सर्वांनी दखल घेतली असती. सायंकाळी पाचपर्यंत संपूर्ण कर्जमाफी व बैलगाडी शर्यत सुरू झाली नाही तर राष्ट्रध्वजासमोर आत्मदहन करणार आहे, असा इशारा यावेळी श्री. जाधवने दिला. यानंतर श्री. जाधव यास पोलिसांनी अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com