राममंदिर, सिव्हिल चौकात फूटपाथ गायब

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

सांगली - साधारण दोन महिन्यांपूर्वी येथील राममंदिर चौकाजवळील अतिक्रमणे हटवल्यानंतर शहर अतिक्रमणमुक्त होईल, अशी आशा निर्माण झाली. मात्र त्यानंतर महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग पुरता कोम्यात गेला आहे. 

सांगली - साधारण दोन महिन्यांपूर्वी येथील राममंदिर चौकाजवळील अतिक्रमणे हटवल्यानंतर शहर अतिक्रमणमुक्त होईल, अशी आशा निर्माण झाली. मात्र त्यानंतर महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग पुरता कोम्यात गेला आहे. 

राममंदिर चौक परिसरातील रस्ता रुंदीकरणाचे याआधीच मार्किंग झाले आहे. मात्र एकाही बांधकामाला अथवा खोकीधारकाला महापालिकेने हात लावलेला नाही. काँग्रेस भवनपासून सिव्हिल चौकापर्यंतच्या रस्त्यांचे पदपथ हातगाडे, फेरीवाल्यांनी व्यापले आहेत. त्यांच्या कचाट्यातून वाचले असतील तर या रस्त्यावरील इस्पितळे, वडापवाले आणि व्यापाऱ्यांनी त्यावर आपली खासगी वाहने किंवा माल मांडला आहे. हेच करायचे होते तर या रस्त्याकडेला लाखो रुपयांचा खर्च करून पदपथ तरी कशासाठी बांधले? नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालत जावे लागतेय. मात्र पालिकेची ढिम्म यंत्रणा याकडे पाहायला तयार नाही. 

सिव्हिल चौकातील झाडे हटवण्यात आली. मात्र तिथला नारळ विक्रेता अथवा चहागाडे मात्र महापालिकेला हटवता आली नाही. इथल्या अनेक दुकानदारांनी पदपथापर्यंत शेड मारली आहेत. दुसरीकडे सिव्हिल इस्पितळाजवळील पदपथ रिक्षाचालकांनी कायमचा नावावर करून घेतला आहे. पुढे तर महापालिकेच्या बेकायदेशीर कारभारामुळे न्यायालयाच्या आदेशाने भर रस्त्यावर खोकी बसवण्यात आली आहेत. ही खोकी हटवणे दूर, आता हा संपूर्ण रस्ताच खोकीधारकांसाठी आंदण द्यावा, अशी भूमिका खुद्द महापौरांनी मांडली. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाच साकडे घातले. सिव्हिल हॉस्पिटलची जागाच खोकीधारकांना द्यावी, अशी भन्नाट मागणी केली. महापालिकेच्या जागा यांना पुरत नाहीतच, आता राज्य शासनाच्या जागाही हव्या आहेत. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्याच्या दोन्ही बाजूस दुकानदारांनी आपले धंदे थाटले आहेत. काहींची चार चाकी वाहनांचे गॅरेज रस्त्यावर थाटले आहे. काहींनी बारा महिने येथील फूटपाथचा पार्किंग म्हणून वापर सुरू ठेवला आहे. शंभर फुटीही असाच अतिक्रमणांनी गिळंकृत होत आहे. अतिक्रमण हा पूर्णत: आयुक्‍तांच्या अखत्यारितील विषय आहे. आता त्यांचे या विभागाचे प्रमुख रमेश वाघमारे यांना आदेश मिळत नाहीत की काय? महापालिका लहर आल्यासारखी कधी तरी अतिक्रमण काढते आणि त्यानंतर थांबते, नेमका हा कारभार काय चाललाय, ते जनतेला कळेना!

 

ठराविक जणांच्या सोयीसाठीच मोहीम?
महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी राममंदिर चौकालगत अचानकपणे अतिक्रमणे हटवली. येथील बेकरीचालक व पुष्पगुच्छ विक्रेत्यांनी व्यापलेले पदपथ रिकामे करण्यात आले. शेजारीच भाजपचे नेते शेखर इनामदार यांच्या खासगी दुकानासमोरील खोकीही हटवण्यात आली. मात्र, येथेच मोहीम थांबली. यापुढील फूटपाथ सायंकाळनंतर चायनीज गाड्यांनी अतिक्रमित होतात. त्यामुळे ही मोहीम फक्‍त ठराविक जणांच्या सोयीसाठीआखली होती का?

Web Title: footpath missing in sangli