'टेनिस हा क्षमतेची परीक्षा घेणारा खेळ '

'टेनिस हा क्षमतेची परीक्षा घेणारा खेळ '

कोल्हापूर - माझा आवडता खेळ हॉकी आणि पत्नीचा बास्केटबॉल. लियांडर पेस याला मात्र आवड टेनिसची. तो "ग्रेट मोटिव्हेटेड' प्लेअर असून, त्याने केलेले रेकॉर्डस केवळ आमची नव्हे, तर देशाची मान उंचावणारी आहेत, अशा शब्दांत माजी ऑलिंपियन वेस पेस यांनी आपल्या मुलाचे कौतुक केले. टेनिस हा शारीरिक क्षमतेची परीक्षा घेणारा खेळ असून, खेळाडू कोणताही असो, त्याचे "ग्लॅमर' तात्पुरते असते, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनतर्फे आयोजित टेनिस प्रशिक्षण शिबिरानिमित्त ते कोल्हापुरात आले आहेत. विभागीय क्रीडा संकुलात त्यांच्याशी संवाद साधता आला. 

श्री. पेस म्हणाले, ""लियांडर लहानपणी फुटबॉल खेळायचा. सांघिक खेळापेक्षा त्याने वैयक्तिक खेळात करिअर करावे, अशी आमची इच्छा होती; शिवाय सांघिक खेळातील संघ निवडीतील राजकारणाचा अनुभव पाठीशी होता. जेव्हा मी हॉकी खेळत होतो, तेव्हा कशा पद्धतीने निवडी व्हायच्या, हे पाहत होतो. लियांडरने वैयक्तिक खेळात करिअरचा मार्ग निवडला. चेन्नईतील ब्रिटानिया अमृतराज टेनिस ऍकॅडमीमधून त्याने टेनिसचे प्रशिक्षण घेतले. त्याचे प्रशिक्षक अमेरिकन होते. लियांडर टेनिसशी बांधिलकी असणारा खेळाडू आहे. त्याने टेनिस पूर्णत: लक्ष केंद्रित केल्याने त्याने टेनिसमध्ये भारताचे नाव ठळक केले आहे.'' 

ते म्हणाले, ""त्याला लागणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा आम्ही उपलब्ध केल्या. त्याचे करिअर खेळात असल्याने त्यातील आर्थिक गुंतवणुकीचा विचार केला नाही. ऑलिंपिक, आशियाई टेनिस स्पर्धांमध्ये खेळताना त्याने कसलीच कसूर ठेवली नाही. यश-अपयशाचा विचार न करणारा तो खेळाडू असून, स्वत:तील चुका शोधण्याची त्याची वृत्ती आहे. त्यामुळेच तो उत्कृष्ट पद्धतीने टेनिस खेळत आला आहे.'' टेनिससाठी कोल्हापूर हे उत्तम ठिकाण आहे. परदेशी पर्यटकांचे हे आवडते पर्यटन स्थळ आहे. इथली अर्थव्यवस्था ही क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देणारी आहे. त्यामुळे भविष्यात कोल्हापुरातून आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणारे टेनिसपटू नक्कीच घडतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. खेळाडूला मिळणारे ग्लॅमर हे तात्पुरते असते. जर त्याची वेळ कठीण आली, की ग्लॅमरला धक्काही लागतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टेनिस हा घाम गाळणारा खेळ 
शारीरिक तंदुरुस्तीशिवाय टेनिस खेळता येत नाही. टेनिसपटूचा घाम गाळणारा हा खेळ आहे. येथे टेनिसपटूला सातत्याने चेंडूवर नजर ठेवून हालचाल करावी लागते. पालकांनी या खेळात पाल्याला प्रोत्साहित करायला हवे. वैयक्तिक खेळात खेळाडूने आपले कौशल्य सिद्ध केले, की त्याला कोणीही आडकाठी घालू शकत नाही, असेही श्री. पेस यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com