चार दरवाजांचे ड्राफ्टिंग द्या; काम सुरु करु - खासदार संभाजीराजे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

कोल्हापूर - राज्यातील पाच किल्ले मॉडेल करण्याची कल्पना ही दुर्ग अभ्यासक भगवान चिले यांची आहे. मी जरी शासननियुक्त पर्यटन खात्याचा ब्रॅंड ॲम्बेसडर असलो तरी खरे ब्रॅंड ॲम्बेसडर श्री. चिले आहेत, या शब्दांत खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी चिले यांचे कौतुक केले. पन्हाळ्याच्या चार दरवाजांचे ड्राफ्टिंग चिले यांनी दिल्यास कामास लवकरच प्रारंभ करता येईल, असेही त्यांनी सांगितले. 

कोल्हापूर - राज्यातील पाच किल्ले मॉडेल करण्याची कल्पना ही दुर्ग अभ्यासक भगवान चिले यांची आहे. मी जरी शासननियुक्त पर्यटन खात्याचा ब्रॅंड ॲम्बेसडर असलो तरी खरे ब्रॅंड ॲम्बेसडर श्री. चिले आहेत, या शब्दांत खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी चिले यांचे कौतुक केले. पन्हाळ्याच्या चार दरवाजांचे ड्राफ्टिंग चिले यांनी दिल्यास कामास लवकरच प्रारंभ करता येईल, असेही त्यांनी सांगितले. 

येथील भवानी मंडपात शाहू यूथ फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘जागर इतिहासाचा’ या गडकोटांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन संभाजीराजे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. प्रदर्शनात सुमारे २८० छायाचित्रांचा समावेश आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी दिवसभर गर्दी राहिली. 
संभाजीराजे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजीराजे यांच्यात तुलना करणे चुकीचे आहे. दोघे आपापल्यापरीने पराक्रमी आहेत.

औरंगजेबाशी नऊ वर्षे लढा देऊन स्वराज्याला धैर्य देण्याचे काम संभाजीराजेंनी केले. त्यांच्या विचारांचे तरुण तयार होणे, ही आजची आवश्‍यकता आहे, जे प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवतील.’’ 
ते म्हणाले, ‘‘छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू, रणरागिणी ताराराणी यांच्या नावाने अनेक संस्था स्थापन होतात. त्यातील किती संस्था विधायक काम करतात, याचा उलगडा होत नाही. मात्र शाहू फाऊंडेशनचे कृतिशील काम नावाजण्याजोगे आहे.’’

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, ‘‘शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे साक्षीदार असणारे गडकोट ढासळत आहेत. मात्र आता संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली या गडांना पूर्ववत वैभव प्राप्त होणार आहे.’’ याप्रसंगी श्री. चिले यांनी गडकोटांचे महत्त्व सांगून त्यांच्या देखभालीची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे सांगितले. या वेळी रवी पवार व विनायक साळोखे यांचा सत्कार झाला. कार्यक्रमास पोलिस निरीक्षक अनिल देशमुख, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, अभिलेखापाल गणेश खोडके, माजी नगरसेवक ईश्‍वर परमार, फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप पाटील, इंद्रजित माने, सुशांत हराळे, हृषीकेश देसाई, स्वप्नील यादव, विजय अग्रवाल, सागर जाधव, दीपक घोडके, विनायक शिंदे, सागर पाटील, नरेश इंगवले उपस्थित होते. 

निधीसाठी कोल्हापुरी दबाव टाकू 
येत्या सहा जूनला होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याकरिता प्रशासनातर्फे दहा दिवसांत काम सुरू होणार आहे, असे सांगत संभाजीराजे यांनी गडकोटांच्या डागडुजीसाठी निधी कसा आणायचा हे कळाले असून कोल्हापुरी दबाव टाकून निधी मिळवत राहू, असे स्पष्ट केले.