बालभारतीकडून सोलापूरला मोफत पुस्तकांचे वितरण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

सोलापूर - सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात. त्यांचे वितरण पुणे येथील "बालभारती'ने गुरुवारी सुरू केले. पुणे विभागात पहिल्यांदा ही पुस्तके सोलापूर जिल्ह्याला दिली जात आहेत. उत्तर सोलापूर व मोहोळ तालुक्‍यात शुक्रवारी (ता. 12) पुस्तके येणार आहेत.

पुणे येथील "बालभारती'मध्ये शिक्षण आयुक्त डॉ. बिपिन शर्मा, बालभारतीचे संचालक सुनील मगर, भांडारप्रमुख नीलिमा नाईक, वाहतूक ठेकेदार अतुल धूत यांच्या उपस्थितीत सोलापूरकडे येणाऱ्या ट्रकचे पूजन करण्यात आले. त्याचबरोबर ट्रकचालकाचे स्वागत करून पहिला ट्रक सोलापूरकडे पाठविण्यात आला. जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा, खासगी अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या चार लाख 50 हजार 733 विद्यार्थ्यांना ही पुस्तके दिली जाणार आहेत.

मराठी, कन्नड, उर्दू या भाषांतील 24 लाख 53 हजार 881 पुस्तकांच्या प्रती विद्यार्थ्यांना मोफत दिल्या जाणार आहेत. तालुक्‍यातील लोकप्रतिनिधी, शालेय व्यवस्थापन समिती व पालकांच्या उपस्थितीत शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात येणार आहेत.

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जाणार आहेत, त्यामुळे पालकांनी खासगी दुकानदारांकडून पुस्तके खरेदी करू नयेत.
- सयाजीराव क्षीरसागर, उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक

Web Title: free book distribution to solapur by balbharati