मित्रत्व जिंकणार की राजकारण ? 

अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

गडहिंग्लज - मैत्रीचे धागे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही सूक्ष्म असतात; पण लोखंडाच्या तारेहूनही ते मजबूत असतात. तुटले तर श्‍वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातानेही तुटणार नाहीत. तीन मित्रांमधील मैत्रीचे बंधन भडगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघातील राजकारणामुळे पणाला लागले आहे. 

गडहिंग्लज - मैत्रीचे धागे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही सूक्ष्म असतात; पण लोखंडाच्या तारेहूनही ते मजबूत असतात. तुटले तर श्‍वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातानेही तुटणार नाहीत. तीन मित्रांमधील मैत्रीचे बंधन भडगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघातील राजकारणामुळे पणाला लागले आहे. 

पंचायत समितीचे विद्यमान सदस्य अमर चव्हाण (चन्नेकुप्पी), अनिकेत ऊर्फ विकी कोणकेरी (भडगाव) आणि माजी सरपंच सागर पाटील (जरळी) अशी या मित्रांची नावे आहेत. मित्रत्वाची महती सांगणारी अनेक प्रेरणादायी वाक्‍ये विविध माध्यमांतून कानावर पडतात. दुसरीकडे राजकारणामुळे मित्रत्वाच्या नात्यात दरी निर्माण झालेल्या घटनाही ऐकायला मिळतात. अशीच काहीशी वेळ जिल्हा परिषद निवडणुकीत भडगाव मतदारसंघातील वरील तीन मित्रांवर येऊन ठेपली आहे. 

राजकारणात कोणीही कायमचा मित्र अगर शत्रू नसतो, ही प्रचलित म्हणही यानिमित्ताने येथे प्रकर्षाने नमूद करावेसे वाटते. भडगाव गट व गण सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहेत. गटासाठी अमर यांची पत्नी सौ. अरुंधती, तर गणासाठी अनिकेत यांची पत्नी सौ. श्रेया यांना राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी मिळाली आहे. सागर पाटील हेसुद्धा राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते. गतवेळी अमर चव्हाणांच्या विजयात पाटील यांचाही हातभार लागला. परंतु या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात पाटील यांनी भडगाव गणातून आपली पत्नी शिल्पा यांची अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतरच तिन्ही मित्रांमध्ये समज-गैरसमजाची चुळबुळ सुरू झाली. 

जवळच्या मित्राने काहीच न सांगता घेतलेला हा निर्णय चव्हाण व कोणकेरींच्या पचनी पडलेला नाही. म्हणूनच अर्ज भरलेल्या दिवशीच या दोघांनीही तडक पाटील यांचे घर गाठले. अर्ज भरण्यामागच्या कारणांची विचारणा करण्यासह त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु पाटील यांनी दोन्ही मित्रांसमोर "मन की बात' न सांगितल्याने अडचण आली आहे. अधिक चौकशीत पाटील यांची नाराजी पक्षावर असल्याचे बोलले जाते. मोठ्या गावांचा बाऊ करून अनेक वर्षांपासून जरळीत उमेदवारी न मिळाल्याने गावावर अन्याय झाल्याची भावना गावकऱ्यांत आहे. त्यामुळेच गावातील सर्वपक्षीय प्रमुखांनी गावचा उमेदवार म्हणून पाटील यांना पुढे केल्याचे सांगण्यात येते. आता मित्रत्व श्रेष्ठ मानून पाटील माघार घेतात, की गाव सांगते म्हणून ते बंडखोरी करतात, हे आता माघारीदिवशीच स्पष्ट होईल. 

* माघारीसाठी गळ... 
पत्नीचा अर्ज मागे घेण्यासाठी पाटील यांना गळ घातली जात आहे. उमेदवारी रिंगणात राहिल्यास स्वत:सह पक्षालाही नुकसान असल्याचे सांगून राजकीय परिस्थितीची गणितेही सांगितली. राष्ट्रवादीच्या नेत्या डॉ. नंदिनी बाभूळकर, रामराज कुपेकर यांनी जरळीत येऊन पाटील व गावकऱ्यांच्या भावना ऐकून घेतल्या. पक्षातर्फे काही वर्षांपासून मिळालेली पक्षपाती वागणूक, सुचवलेल्या कामांना निधी न मिळणे यावर पाटील व कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. भविष्यात जरळीला विकासकामांत झुकते माप देण्याची ग्वाही नेत्यांनी दिली असून आता "बंडखोरी की माघार' या निर्णयाचा चेंडू पाटील यांच्या कोर्टात प्रलंबित आहे. 

Web Title: Friendliness of politics to win