योगेश कदम गोव्याच्या धेम्पो क्‍लबशी करारबद्ध

योगेश कदम गोव्याच्या धेम्पो क्‍लबशी करारबद्ध

प्रतिभावान फुटबॉलपटू - पाडळी खुर्द ते गोवा कौतुकास्पद प्रवास, जिल्ह्यातील पहिला खेळाडू

गडहिंग्लज - प्रतिभावान फुटबॉलपटू योगेश कदमला (रा. पाडळी खुर्द) गोव्याच्या बलाढ्य धेम्पो क्‍लबने करारबद्ध केले आहे. गोव्यासह देशातील मातब्बर मानल्या जाणाऱ्या धेम्पो क्‍लबमध्ये निवड होणारा योगेश हा कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. योगेशचा पाडळी खुर्द ते इंडियन फुटबॉल लीग (आयलीग) हा प्रवास कौतुकास्पद आहे. 

योगेशने कुडित्रेच्या डी. सी. नरके विद्यानिकेतनमधून प्रशिक्षक अमित पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली फुटबॉलचा श्रीगणेशा केला. शालेय स्पर्धा गाजविल्यानंतर महाराष्ट्र हायस्कूल, न्यू कॉलेजमधून राष्ट्रीय शालेय स्पर्धेसह अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धा गाजविली. कोल्हापूरच्या स्थानिक संघातूनही त्याने शाहू स्टेडियम गाजविले. याचमुळे फुलेवाडी क्रीडा मंडळाच्या राष्ट्रीय स्पर्धेत केलेल्या चौफेर खेळामुळे गोव्याच्या नामांकित सेसा फुटबॉल ॲकॅडमीने त्याच्याशी चार वर्षांचा करार केला. त्यानंतर गेली दोन वर्षे गोव्याच्याच कळंगुट संघाकडून तो खेळला. गतवर्षी कळंगुट संघाचा कर्णधार म्हणून गोव्याच्या व्यावसायिक साखळीत धडाकेबाज खेळ केला. तसेच मुंबईच्या केंकरे फुटबॉल क्‍लबकडून आयलीग द्वितीय श्रेणी स्पर्धेत तो चमकला.

गतवर्षी गोवा साखळीत आणि आयलीगमध्ये केलेल्या योगेशच्या बहारदार खेळाने प्रभावित झाल्याने धेम्पो क्‍लबने त्याला सर्वाधिक पसंती देऊन सामावून घेतले. आयलीगमध्ये सर्वाधिक यशस्वी संघ म्हणून धेम्पोचा नावलौकिक आहे. उद्योजक श्रीनिवास धेम्पो यांच्या कुटुंबीयांचा संघ म्हणून धेम्पो क्‍लबची ओळख आहे. तब्बल विक्रमी पाचवेळा आयलीग, ड्युरॅन्ड, फेडरेशन, सुपर कप, रोव्हर्स कप अशा देशातील सर्वच अव्वल स्पर्धांत धेम्पोने  विजेतेपद पटकाविले आहे. गोवा व्यावसायिक साखळी स्पर्धेचे तब्बल अकरा वेळा विजेतेपद मिळविले आहे. सध्या माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू समीर नाईक संघाचे प्रशिक्षक आहेत. धेम्पोत अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा भरणा आहे. या संघाच्या ५५  वर्षाच्या वाटचालीत कोल्हापूर जिल्ह्यातील योगेश कदम हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. 

अष्टपैलू खेळाडू 
योगेश हा मूळचा मध्यफळीतील उत्कृष्ट खेळाडू आहे. आघाडीफळीला उत्कृष्ट पास देऊन चाली रचण्यात त्याचा हातखंडा आहे. अलीकडे आयलीगसह  विविध स्पर्धांत उपयुक्त आघाडीपटू म्हणूनही संघाच्या मदतीला धावला आहे. त्यामुळेच त्याच्या या अष्टपैलू क्षमतेमुळेच मागणी वाढली आहे. यंदा गोव्याच्या फुटबॉल क्षेत्रात तो सहावा हंगाम खेळतो आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com