‘दौलत’ बुडविणाऱ्यांच्या दारात बसा

गडहिंग्लज - ‘केडीसीसी’च्या एटीएम सुविधा उद्‌घाटनप्रसंगी हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, संतोष पाटील, स्वाती कोरी, किरण कदम, बी. एन. पाटील, रामाप्पा करिगार, बनश्री चौगुले आदी.
गडहिंग्लज - ‘केडीसीसी’च्या एटीएम सुविधा उद्‌घाटनप्रसंगी हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, संतोष पाटील, स्वाती कोरी, किरण कदम, बी. एन. पाटील, रामाप्पा करिगार, बनश्री चौगुले आदी.

गडहिंग्लज - चंदगडचे ॲड. संतोष मळवीकर यांचे केडीसीसी बॅंक व कर्मचाऱ्यांबरोबर सुरू असलेले वर्तन कदापि खपवून घेणार नसल्याचा इशारा देत मळवीकरांत इतकीच हिंमत असेल तर त्यांनी दौलत साखर कारखाना बुडविणाऱ्या व चालवायला घेणाऱ्यांच्या दारात बसून दाखवावे, असे आव्हान आमदार हसन मुश्रीफ यांनी आज दिले. 

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या (केडीसीसी) येथील मार्केट यार्ड शाखेंतर्गत तालुक्‍यातील पहिल्या एटीएम सुविधेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. आमदार संध्यादेवी कुपेकर, नगराध्यक्षा स्वाती कोरी, बी. एन. पाटील-मुगळीकर, बाजार समितीच्या सभापती सारिका चौगुले, पंचायत समितीच्या उपसभापती बनश्री चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार कुपेकर यांच्या हस्ते एटीएम सुविधेचे उद्‌घाटन झाले.

श्री. मुश्रीफ म्हणाले, की ‘केडीसीसी’कडे दौलत कारखान्याचे ७४ कोटींचे कर्ज थकीत आहे. वसुलीसाठी बॅंकेकडून हा कारखाना विक्री व भाडेतत्त्वाने चालविण्यास देण्यासाठी ११ वेळा निविदा काढण्यात आल्या. अखेर गोकाकच्या न्यूट्रीयंटस कंपनीने एक कोटीची बयाणा रक्कम भरून निविदा घेतली. ४५ वर्षे कराराने त्यांना कारखाना चालविण्यास दिला. वास्तविक, उत्पादकांची एफआरपी, कामगारांना पगार देण्याची जबाबदारी त्यांची होती.

परंतु, ती त्यांनी पाळली नाही. बॅंकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील यांच्या पुढाकाराने ही कंपनी कार्यरत असून, शेतकऱ्यांची देणी देण्याचा प्रश्‍न आला तेव्हापासून ते बॅंकेकडेही आलेले नाहीत. बॅंकेचे ३४ कोटी व कारखान्यासाठी दहा कोटींचा खर्च करूनही ही कंपनी इतकी बेफिकीर कशी असू शकते, याचे कोडे मलाही उलगडलेले नाही. ही वस्तुस्थिती असताना चंदगडमधील एक कृती समिती बॅंकेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करीत आहे. समितीचे प्रमुख संतोष मळवीकर हे बॅंक व कर्मचाऱ्यांशी चुकीचे वर्तन करीत आहेत. नुकतीच त्यांनी बॅंकेच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.

कर्मचाऱ्यांच्या केसाला धक्का लागणे म्हणजे आमच्या केसाला धक्का लागण्यासारखे आहे. कारखाना बुडविणारे बाजूलाच असून, गरीब कर्मचाऱ्यांना तंबी देण्यापेक्षा मळवीकरांनी कारखाना बुडविणाऱ्यांच्या दारात बसावे.

आमदार कुपेकर यांनी, ‘केडीसीसी’ने नेसरी व हलकर्णी येथेही एटीएम सुविधा सुरू करण्याची सूचना केली. संचालक संतोष पाटील यांचेही भाषण झाले. श्री. रणनवरे यांनी स्वागत केले. बॅंकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. किरण कदम, सतीश पाटील, रामदास कुराडे, सुरेश कोळकी, राकेश पाटील, रामाप्पा करिगार, परगोंड पाटील, शिवाजी काकडे, हारून सय्यद, राहुल पाटील, महाबळेश्‍वर चौगुले, अमर मांगले, विठ्ठल भम्मानगोळ आदी उपस्थित होते. निरीक्षक रणजित देसाई यांनी आभार मानले.

बॅंकेचा काय दोष?
श्री. मुश्रीफ म्हणाले, की ‘दौलत’संदर्भात बॅंकेलाच आव्हान देत आहेत. बॅंक ही कर्ज देणारी संस्था आहे. हे कर्ज विविध पद्धतींनी वसूल करण्याचे अधिकारही बॅंकेला आहेत. जिल्ह्यात अनेक कारखाने चालवायला दिलेत. म्हणून काय सर्व जण बॅंकेच्या दारात बसत नाहीत. परंतु, चंदगड कृती समितीचे वर्तन राजकीय आहे. न्यूट्रीयंटस कंपनीचे पुढे काय होणार, हे माहीत नाही. परंतु, येत्या मार्चअखेर त्यांनी बॅंकेचे दहा कोटी भरले नाहीत तर करार रद्द होणार आहे. त्यानंतर पुन्हा हा कारखाना विक्री अथवा चालवायला द्यावा लागेल. कारखान्याचे कर्ज थकल्याने बॅंकेचे लायसन्स रद्द होणार होते. म्हणून बॅंकेने हा निर्णय घेतला तर यात बॅंकेचा काय दोष?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com