207 मंडळांच्या मिरवणुका निघणार डॉल्बीशिवाय 

राजेश मोरे
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - से नो टू सिस्टीम (डॉल्बी)... म्हणत शहर परिसरातील तब्बल 207 हून अधिक मंडळांनी विसर्जन मिरवणूक पारंपरिक वाद्यातच काढण्याचा निर्धार केला आहे. त्याबाबतचे हमीपत्रही पोलिसांना दिले. ध्वनिप्रदूषणाविरोधात मंडळांनी घेतलेली भूमिका आदर्शवत ठरणार आहे. 

कोल्हापूर - से नो टू सिस्टीम (डॉल्बी)... म्हणत शहर परिसरातील तब्बल 207 हून अधिक मंडळांनी विसर्जन मिरवणूक पारंपरिक वाद्यातच काढण्याचा निर्धार केला आहे. त्याबाबतचे हमीपत्रही पोलिसांना दिले. ध्वनिप्रदूषणाविरोधात मंडळांनी घेतलेली भूमिका आदर्शवत ठरणार आहे. 

गतवर्षी प्रबोधन करूनही 16 मंडळांनी डॉल्बी लावून डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाला "खो' घातला होता; पण यंदा तसे होऊ द्यायचे नाही. कोणत्याही परिस्थितीत यंदा डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचा निर्धार पोलिस प्रशासनाने केला. इतकेच नव्हे तर राजारामपुरीतील आगमन मिरवणुकीतही डॉल्बी वाजवू न देण्याचे आव्हान पोलिसांनी यशस्वीरित्या पेलले. तसा पोलिसांचा आत्मविश्‍वास वाढला. विसर्जन मिरवणूकही डॉल्बीमुक्त करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी एकापाठोपाठ एक मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन ध्वनिप्रदूषणाचे धोके पटवून दिले. ध्वनिप्रदूषणाबाबत दाखल होणारे गुन्हे, शिक्षेची तरतूद याचे गांभीर्य ज्येष्ठांसह महाविद्यालयीन तरुणांना दिले. एक डॉक्‍टर कम पोलिस अधिकाऱ्यांकडून आरोग्य व कायदा याबाबतची माहिती कार्यकर्त्यांना होत गेली, तसे डॉल्बीबाबतचे तरुणाईचे आकर्षण कमी होत गेले. तसा मंडळांनी डॉल्बी न लावण्याचा पवित्रा घेण्यास सुरवात केली. 

डॉल्बीचे धोके आम्ही जाणलेत... ध्वनिप्रदूषण करून कार्यकर्त्यांच्याच नव्हे तर तमाम जनतेच्या आरोग्याशी आम्ही खेळणार नाही. ध्वनिप्रदूषणाचे गुन्हे दाखल झाले तर तरुण कार्यकर्त्यांचे करिअर धोक्‍यात येऊ शकते, असा धोका आम्ही पत्करणार नाही. "से नो टू डॉल्बी' असे म्हणत गेल्या चार दिवसांत एकापाठोपाठ एक अशा शहरातील तब्बल 207 हून अधिक मंडळांनी डॉल्बी न लावण्याचा निर्धार केला. इतकेच नव्हे तर त्याबाबतचे हमीपत्र पोलिस उपअधीक्षक कार्यालयात दिले. यात छोट्या, मध्यमसह शहरातील नामवंत मंडळांचाही समावेश आहे. ध्वनिप्रदूषणाविरोधात मंडळांनी टाकलेले हे पाऊल स्वागतार्ह आहे. 

शहरातील नोंदणीकृत 745 मंडळांपैकी आतापर्यंत 207 हून अधिक मंडळांनी नो डॉल्बी... ची लेखी हमी दिली आहे. अजूनही मंडळांची संख्या वाढत आहे. डॉल्बीबाबत पोलिसांनी केलेले आवाहन आणि प्रबोधनाचे हे यश आहे. ध्वनिप्रदूषणाबाबतची ही जनजागृतीच म्हणावी लागेल. 
- डॉ. प्रशांत अमृतकर, शहर पोलिस उपअधीक्षक