ध्वनी प्रदूषणापेक्षा जनतेच्या एकीची ताकद मोठी : चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

शहरातील 1200 हून अधिक मंडळे आहेत. त्यातील 1100 हून अधिक मंडळांनी 'सिस्टीम' लावणार नसल्याचे सांगितले आहे. केवळ मूठभर लोकांसाठी कोल्हापूरची जनता वेठीस धरली जात असल्यानेच कठोर भूमिका घेतली आहे.

कोल्हापूर : ''समाजप्रबोधन हा एकच उद्देश ठेवून गणेशोत्सवातील सिस्टीमच्या (डॉल्बी) दणदणाटातून होणारे ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. अनेक वर्षे प्रबोधनाच्या माध्यमातून हा विचार कोल्हापुरात रुजला आहे. सिस्टीमच्या माध्यमातून होणारे ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी मूठभर लोकांविरुद्ध संपूर्ण कोल्हापूरकर एकटवले आहेत. 'शांत कोल्हापूर - विकासाभिमुख कोल्हापूर' हे येथील जनतेनेच दाखवून देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे आपण जनतेच्या व प्रशासनाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे,'' असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, ''कोल्हापूरच्या तरुणांनी गणेशोत्सव उत्साहात साजरा केला पाहिजे; परंतु तो साजरा करताना नियमांची पायमल्ली करून जनतेला त्रास होत असेल तर त्याबाबत कधीतरी ठाम भूमिका घेणे गरजेचे आहे. अनेक वर्षे पोलिसांनी येथील तरुणांचे करिअर बाद होऊ नये म्हणून मुंबई पोलिस कायद्यानुसार कारवाई केली; या वेळी मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ध्वनी प्रदूषण कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. सिस्टीमच्या दणदणाटाने तरुणांच्या करिअरचे नुकसान होण्याची शक्‍यता अधिक असल्यामुळेच तरुणांचे प्रबोधन करत आहोत. या ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणाम अनेक कुटुंबांनी भोगले आहे. मिरवणूक मार्गावरील अनेक कुटुंबांना त्याची झळ बसली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या जनतेमधूनच आता ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी या सिस्टीमला विरोध होऊ लागला आहे. प्रशासनाने नागरिकांच्या भावनेची दखल घेऊन कठोर कारवाईची भूमिका घेतली. शहरातील 1200 हून अधिक मंडळे आहेत. त्यातील 1100 हून अधिक मंडळांनी 'सिस्टीम' लावणार नसल्याचे सांगितले आहे. केवळ मूठभर लोकांसाठी कोल्हापूरची जनता वेठीस धरली जात असल्यानेच कठोर भूमिका घेतली आहे.'' 

ते म्हणाले, ''समाजात नेहमीच नगण्य टक्केवारी संपूर्ण समाजावर वर्चस्व गाजवते. चांगले नागरिक रस्त्यावर उतरून कधीच आपली बाजू सांगत नाहीत; परंतु ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी चांगल्या लोकांनाही रस्त्यावर उतरून आपली बाजू कशी आहे हे सांगितले. तसेच कोल्हापुरात या ध्वनी प्रदूषणाबाबत झाले आहे. मूठभर तरुण मंडळे व नेत्यांच्या अट्टहासापुढे आता कोल्हापूरची जनताच रस्त्यावर उतरून विरोध दर्शवत आहे. 'ध्वनी प्रदूषण नको, शांत कोल्हापूर हवे, विकासाभिमुख कोल्हापूर हवे,' अशी भूमिका येथील जनतेने घेतली आहे. त्यांच्या या मताची दखल पालकमंत्री म्हणून मी घेतली आहे.'' 

जे करायचे ते नीटच 
श्री. पाटील म्हणाले, ''राजकारण, सत्ताकारण करताना समाज प्रबोधनाला अधिक महत्त्व दिले. सवंग प्रसिद्धीसाठी काही केले नाही. नफा-तोट्यापेक्षा जनतेचे हित, विकास हाच माझ्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे. जे करायचे ते नीटच केले पाहिजे, ही माझी भूमिका आहे. त्यासाठीच सिस्टीमच्या माध्यमातून होणारे ध्वनी प्रदूषण रोखणे हे माझे काम नीटच करणार. विकासाभिमुख कोल्हापूरसाठी प्रयत्न करत असून यामध्ये निश्‍चितच यश मिळेल. माझे प्रयत्न प्रामाणिक असून एकीची ताकद आवाजापेक्षा मोठी असल्याचे येथील जनतेनेच सांगितले आहे.'' 

'सकाळ'ने लोकचळवळ बनविली 
कर्णकर्कश सिस्टीमच्या विरोधात 'सकाळ'ने भूमिका मांडली. या विरोधात लढणाऱ्यांचा 'सकाळ' आवाज बनला. मानवी साखळीच्या माध्यमातून या विषयाच्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधले. सातत्याने आग्रही भूमिका मांडताना सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल चळवळ उभी केली. ती आता लोकचळवळ बनली आहे.